मैत्रिणींनो आजचा माझा लेखनाचा विषय आहे active and inactive.
खास करून आपल्यासाठी म्हणजेच स्त्रियांसाठी proactive म्हणजेच सक्रिय असणे. बऱ्याच मैत्रिणी मला सांगतात की अंगात सतत आळस येतो काही काम करूशी वाटत नाही. घरात भरपूर काम पडलेले असते पण कामाला हात लावूशी वाटत नाही. अगदी बरोबर आहे हे सगळ्यांच्याच बाबतीत होते. पण हे कधीतरी होणे ठीक आहे. पण सतत जर असे होत असेल तर आपल्याला ती एक वाईट सवय लागून जाते. आपल्याला सगळे कळत असते की आता आपल्याला सोफ्यावरून किंवा बेडवरून उठायला पाहिजे आळस झटकायला पाहिजे घरातील सगळी कामे पटापटा उरकली पाहिजे.
कपाट अस्तव्यस्त झाले आहे ते व्यवस्थित केले पाहिजे. किचन व्यवस्थित लावले पाहिजे. मन सांगत असते पण शरीर मात्र जाग्यावरून हलत नाही. म्हणजेच आपले शरीर जवळजवळ Reactive व्हायला सुरुवात होते. आणि नंतर नंतर ती सवयच बनून जाते. मैत्रिणींनो ही सवय लागायच्या अगोदर आपण आपल्याला सावरले पाहिजे भरपूर केले इथून मागे मुले छोटी होती तेव्हा आराम मिळला नाही. आता मुले मोठी झाली आहेत म्हणून थोडासा आराम करू असं म्हणता म्हणता आपण स्वतःला निष्क्रिय करून घेतो.
नंतर नंतर ती सवयच बनून जाते.
त्यासाठी आपल्याकडे दिवसभराच्या कामाचे नियोजन आदल्या दिवशीच असले पाहिजे. उद्या सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंतचे कामाचे नियोजन आपल्याकडे अगोदरच असल्यावर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण ती कामे करण्यास सुरुवात करतो त्यासाठी आदल्या दिवशी रात्री आपले संपूर्ण घर आपण आवरून ठेवायला पाहिजे किचन ओटा एकदम साफ पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकदम स्वच्छ वातावरणात आपल्याला एकदम प्रसन्न वाटते.मस्त गाणी लावा आणि चहाचा आनंद घ्या.
आता ज्या मैत्रिणी जॉब ला जातात त्यांच्यासाठी तर हे करणे अतिशय गरजेचे असते. अन्यथा सकाळी उठल्यानंतर काय करावे हेच त्यांना सुचणार नाही. भारतामध्ये बऱ्याच कामांना मदतनीस ताई असतात त्यामुळे बऱ्याच जॉब न करणाऱ्या मैत्रिणींना जास्त नाही पण तरी थोडवेळ मिळतो अशा वेळेस त्यांनी त्यांचे छंद जोपासायला पाहिजे. लेखन वाचन,चित्र काढणे,घरातील कोपरे सजवणे कोणाला डान्स आवडत असेल तर युट्युब वर पाहून डान्सच्या स्टेप शिकणे, मेहंदीच्या डिझाईन शिकणे,रांगोळी शिकणे,साड्यांना किंवा ड्रेसला वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे लावणे जे आवडत असेल ते करा पण करा निष्क्रिय असे बसून राहू नका
मोबाईल खूप वेळ हातात घेणे टाळा. दिवसातून एक तास तुम्ही खास मोबाईल साठी द्या त्यात तुम्ही व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा आणखी दुसरे काही तेवढा वेळ संपल्यानंतर आपण आपोआपच दुसऱ्या कामाला सुरुवात करू शकतो. दिवसातून वीस मिनिटे तरी आपण आपल्या शरीरासाठी थोडासा व्यायाम केला पाहिजे. वीस मिनिटाच्या व्यायामाने दिवसभर आपल्याला अगदी प्रसन्न आणि छान वाटते.
आता ज्या मैत्रिणी जॉब करतात.. त्या नेहमी सक्रिय असतातच असे नाही. आठ तास किंवा दहा तास जॉब करून आल्यानंतर घरी खूप थकले म्हणून आपण बसून राहतो आणि अगदी जेवणाची वेळ येते तेव्हा आपण स्वयंपाकाला उठतो त्यामुळे दररोज जेवणाची वेळ बदलते त्यामुळे पुढील कामांची ही वेळ आपोआपच बदलते त्यामुळे अशा मैत्रिणींकडेही संपूर्ण दिवसाचे नियोजन आदल्या दिवशी असणे खूप गरजेचे आहे.
शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे निवांत उठणे व नाश्ता करणे यातच निम्मा दिवस निघून जातो शनिवार रविवार आपण जर लवकर उठून सगळे कामे उरकली तर दुपारची झोप काढायला वेळ मिळतो आणि दुपारपासून रात्रीपर्यंत निवांत सगळा वेळ आपल्या कुटुंबासाठी आपल्याला देता येतो. मैत्रिणींनो मी पण अजून शिकतच आहे. फक्त मला जे अनुभव आले ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. काही मैत्रिणीनां alredy हे सगळे माहित आहे.
मैत्रिणींनो सांगायचा मुद्दा असा… कि वेळ वाळू प्रमाणे हातातून सटकत चालली आहे. आज करू उद्या करू असं म्हणता म्हणता आयुष्याला कधी पूर्णविराम लागेल याचा भरोसा नाही त्यामुळे आपले छंद आणि आवडी जोपासा स्वतःसाठी थोडा वेळ काढा,स्वतःसाठी तुम्ही थोडा वेळ तेव्हाच काढाल जेव्हा तुम्हाला घरातल्या कामातून वेळ मिळेल. आणि घरातील कामातून वेळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुमची तुम्ही Proactive असाल हो कि नाही तर मग झटका आळस आणि जोपासा तुमचे छंद.
@सीमाशंकर