धुणं | Washing cloths

धुणं या विषयावर मला कधीतरी लिहायला लागेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.How to wash clothes by hand असे काय दिवसांनी गुगलवर मुली टाकतील .धुणे हे सुद्धा कधीतरी काळा आड जाईल आणि चुलीवरच्या स्वयंपाकासारखे इथे हाताने धुणे धुऊन मिळेल अशा सुद्धा पाट्या वाचायला मिळतील की काय असे वाटायला लागले आहे.

आता धुणं ह्याच्यावर लिहिण्यासारखं असं काय आहे. खरं सांगायचं झालं तर पूर्वी ओढ्यावर नदीवर विहिरीवर हापश्यावर बायका कपडे धुवायला जायच्या. खरंतर हे फारच नीगुतिचं आणि कष्टाचं काम आहे. परंतु तरीही धुणं धुवायला जायचं म्हटलं की बऱ्याच बायका खुश असायच्या. मी पण बर का. का बर??? तर धुणं धुवायला जायचं म्हटलं की कधीच एकटं जायचं नाही. जाताना बरोबर दोन-चार मैत्रिणी घेऊनच जायच्या. म्हणजे कसं सध्या जगात काय चालले आहे? भारतात काय चालले आहे? महाराष्ट्रात काय चालले आहे? जिल्ह्यात काय चालले आहे? तालुक्यात काय चालले आहे आणि त्यानंतर आपल्या गावात सध्या काय चालले आहे. याची संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी मिळत असे. थोडक्यात धुणं धुवायला गेल्यावर बायकांचे जनरल नॉलेज वाढत असे.

विनोदाचा भाग सोडा पन याचा आनंद ज्या ज्या बायकांनी घेतला आहे त्या खूप नशीबवानच म्हणायच्या. पण काहीही म्हणा खळखळणाऱ्या पाण्यात कपडे धुवायची मज्जाच काही वेगळी होती. बरं कपडे धुवायची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. कपडे भिजत घालून दगडावर सपासप आपटून नंतर चांगले घसरे द्यायचे अगदी कपडे पांढरे शुभ्र निघेपर्यंत. त्यात जर पांढरे सदरे आणि धोतर असेल तर मात्र बायकांची कसोटीच असायची. मग गप्पा मारता मारता एकमेकींची सुखदुःख वाटत. हसत खिदळत हा कार्यक्रम चालायचा.

धुणं धुवून झाल्यानंतर हातपाय घासायचा एक कार्यक्रम असायचा. कारण धुणं धुताना हात पाय चांगले भिजायचे. धुणं धुवून बायका एकदम फ्रेश होऊन जायच्या आणि शेतीच्या दिवसभराच्या कामासाठी तयार व्हायच्या…. अगदी जशी काही नवीन शक्ती मिळाली असे वाटायचे. जशा कॉलेजच्या मैत्रिणी असतात तशा आमच्या धुन्याच्या खुप सार्‍या मैत्रिणी. कपडे धुऊन घरी आल्यानंतर परत एकदा कपडे हाताने करकचून पिळायची आणि मस्त झटका देत दोरीवर वाळत घालायचे.

एकही अढी न पडता जेव्हा कपडे दोरीवर वाळत घातले जायची तेव्हा बायकांचे समाधान व्हायचे. आणि उन्हामध्ये ते कपडे एकदम कडक वाळून निघायचे. कडक झालेल्या कपड्यांच्या घड्या घालने म्हणजे एक प्रकारचे सुखच असे. आता नवीन पिढीतील मुली म्हणतील कपडे हाताने धुऊन वाळून कडक झालेल्या कपड्यांच्या घड्या घालण्यात कसले आले आहे सुख? परंतु हे सुख त्यांनाच कळेल ज्यांनी याचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे.

हाताचे व्यायाम पाठीचे व्यायाम दोन पायावर बसल्यामुळे पायांचे व्यायाम हे आपोआपच होत होते. व्यायामासाठी वेगळा वेळ देण्याची गरजच वाटत नव्हती. आता गावाकडील थोडाफार भाग सोडला तर सगळीकडे वॉशिंग मशीन आलेल्या आहेत. काहीजणांना वॉशिंग मशीन मधली कपडे धुतलेली आवडत नाही तर काहींना पर्याय नसतो म्हणून त्यात टाकावी लागतात. वॉशिंग मशीन मी सगळ्यात पहिल्यांदा वापरली ती ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर. सुरुवातीला वाटायचे खूपच चुरगळतात कपडे यात. पण नंतर हळूहळू सवय होत गेली. पण अजूनही मला हाताने धुतलेले कपडेच आवडतात.

आता तर कपडे वाळत घालायचा ही त्रास कमी होऊन त्यासाठी वॉशिंग मशीन मध्ये ड्रायर चाही पर्याय आलेला आहे. म्हणजे एकदम मशीन मध्ये कपडे टाकली की डायरेक्ट कपडे सुकून निघतात मग घड्या घालण्यासाठीच बाहेर काढायची. काही दिवसांनी डायरेक्ट घड्या घालून कपाटात कपडे जाणारे मशीन नाही आले म्हणजे मिळवले.

थोडक्यात काय प्रत्येक कामामध्ये गावाकडच्या बायका आनंद शोधतात नव्हे निर्माण करतात.मग ते धुणं असूदया ,भांडी घासणे असूदया किंवा शेतात काम करणे असू दया. कोणत्याही कष्टाच्या कामात त्या आनंदच शोधत असतात.

1 thought on “धुणं | Washing cloths”

  1. खरं आहे ग ताई 😍 या सर्व गोष्टी आता लुप्त होत चालल्या आहेत 😍 आपलं जीवनच सुखकर होत 💕❤️ जुन्या मैत्रिणींची आठवण आली ☺️

    Reply

Leave a Comment