आता सिडनी वरून मुंबई ला निघण्याची वेळ झाली होती.(Sydney to Bombay)
बाईंचा अंत्यविधी व्हिडिओ कॉल वर पाहणे यासारखी धीराची गोष्ट सुमीच्या आयुष्यात कोणतीच नव्हती. अजूनही बाईंचा तो प्रसन्न चेहरा अगदी शांतपणे झोपलेला तिला आठवत होता . जो परत कधीच तिला दिसणार नव्हता.
शिवा 11 वाजता घरी आला आणि सुमी चा धीर सुटला शिवाच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हते. तेवढ्यातही तो सुमीला धीर देत होता. दोन्ही मुले एकदम रडवेला चेहरा करून बसली होती. सुमीला कुठेतरी कळत होते की आपण परिस्थिती सावरून नेली पाहिजे खूप प्रयत्न करून सुद्धा तिला ते जमत नव्हते.
बाई अशा कशा अचानक जाऊ शकतात. एव्हडच ती बोलत होती. शेवटी सुमीने विकीला गॅरेज मधून एक बॅग काढायला सांगितली. मुलीच्या बारावीच्या टेस्ट चालू असल्यामुळे तिला घेऊन जाणे शक्य नव्हते. तिला एकटीला ठेवता येत नव्हते त्यामुळे मुलालाही ठेवणे भाग पडले. बॅगेमध्ये दोघांचे थोडे वापरायचे कपडे भरले आणि ते एअरपोर्टवर जायला निघाले.
ऑस्ट्रेलिया मध्ये आल्यापासून पहिल्यांदा असे झाले होते की भारतात जाताना अजिबात आनंद होत नव्हता. कधी एकदा एअरपोर्टवर जाऊन विमानात बसून घरी पोहोचते असं सुमिला झालं होतं. एअरपोर्ट वरील सर्व प्रोसेस उरकून एकदाचे दोघे जण विमानात बसले.
सारखे डोळे भरून येत होते. आजूबाजूचे लोक काय म्हणतील असं वाटून सुमी वर पाहून डोळ्यातले पाणी आतल्या आत जिरवायची. हुंदके दाबून ठेवायची. भारतात जाताना नॉन स्टॉप तीन पिक्चर विमानात पाहणारी सुमीने आज स्क्रीन सुद्धा ओपन केली नव्हती. मनात इतका गोंधळ चाललेला होता. पण काहीच विलाज नव्हता.
विमान उडाले आणि सुमीच्या डोळ्यासमोरून… एक बावरलेली नवी नवरी आणि तिला आधार देणारी तिची सासू अशा दोघीजणी दिसू लागल्या. दोघींनी एकमेकींची केलेली टिंगल, वावरात दोघींनी केलेली एकत्र खुरपणी, गरोदरपणात सुमिला लावलेला जीव, सगळं कसं चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून हलू लागले. “बया आमच्या सुमीची कवा तब्येत होईन काय माहित? सोनल तिला उपवास धरायला लावू नको. तिला सारखी भूक लागती आणि खायला लागतं त्यामुळे तिला उपवास सहन होत नाही. तू नवरात्रीचे उपवास पकडत जा. अशा सांगणाऱ्या बाई तिला एकदम शेजारी बसल्या आहेत असे वाटू लागले.
आपला स्वतःचा संसार कोना एका नवीन मुलीच्या हातात सहजासहजी सोपवणे खरच इतके सोपे असते? पण ते बाईंसाठी खूपच सोपे होते. सुमीवर पहिल्या दिवसापासून दाखवलेला विश्वास त्यांनी शेवटपर्यंत दाखवला होता. कारण त्यांचे मनच तितके निर्मळ होते. सुमिवर त्यांनी कधीच अविश्वास दाखवला नव्हता कायम खंबीरपणे त्या तिच्या पाठीशी उभ्या होत्या.
कितीतरी आठवणी जशा आता तिच्यासमोरच घडत आहेत असे तिला वाटू लागले. झोपण्यासाठी डोळे झाकले कि आठवणी डोळ्यासमोर यायच्या.
विमान जवळजवळ साडेदहा तासाने श्रीलंकेमध्ये उतरले. फक्त एका तासाचा हॉल्ट असल्यामुळे पुन्हा एअरपोर्ट प्रोसेस मध्ये एक तास निघून गेला. पुन्हा श्रीलंका ते भारत या विमानामध्ये ते बसले. जसजसे अंतर कमी होऊ लागले तसंतसे काळजात खड्डा पडत होता. डोळ्यातले पाणी कुणालाही दिसू नये याची पुरेपूर खबरदारी ती घेत होती.
अडीच तासाने विमान मुंबईला लँड झाले. तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. आता मात्र डोळ्यातले अश्रू लपवणे फारच कठीण झाले. जॉब वर घेऊन जाणारी सॅक ती तशीच उचलून घेऊन आली होती. त्यामुळे त्यात गॉगल होता. अश्रूला लपवण्यासाठी हे चांगले साधन तिला सापडले. परत एअरपोर्ट वरल्या सगळ्या प्रोसेस उरकून सुमी आणि शिवा यांनी मुंबईच्या एअरपोर्टच्या बाहेर पाऊल टाकले.
एका ट्रॅव्हलची प्रायव्हेट गाडी बुक केल्यामुळे लगेच ड्रायव्हर तिथे त्यांना घ्यायला आला होता. त्याने दोघांना गाडीत बसवले आणि त्याचे रमजान चालू असल्यामुळे थोडं जेवून घेतो असे म्हणला. डबा घेऊन तो दुसऱ्या गाडीत एका मित्राबरोबर जेवत बसला. आता मात्र सुमीला हुंदके आवरणे खूपच अवघड होऊन गेले. दोघेजण गाडीच्या आत बसले. आत्ता मात्र 14 -15 तास दाबून ठेवलेला हुंदका तिला आवरणे शक्य झाले नाही आणि सुमिने मोठ्याने हंबरडा फोडला. “आत्ता घरी बाई नसणार काय करणार आपण घरी जाऊन “असं रडत म्हणू लागली तसे शिवाने पाठीवर थापटून सांत्वन केले. सुमीला सावरायला शिवा होता पण शिवाला सावरायला कोण होते? माहित नाही त्याच्या मनात काय चालले होते. वीस मिनिटानंतर ड्रायव्हर जेवून गाडीत आला. आणि मुंबई एअरपोर्टवरून ते गावाला यायला निघाले.
क्रमश:
खूपच मनाला चटका लावून जाते वाचताना मलाच रडू आले ….ताई काळजी घे ….सगळ्यांना सावरण्यासाठी तुम्हाला भगवंत ताकत देवो….
डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला सगळा 😔वाचून माझेच डोळे भरून आले. यातुन सावरण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना शक्ती देवो🙏🏻