प्रथा (एक भावना आपलेपणाची) | Tradition

गावाकडे ज्यांच्या घरातले माणूस गेले आहे त्यांच्या घरी भाकरी घेऊन जाणे ही प्रथा(Tradition)फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. खरं तर याला प्रथा म्हणता येणार नाही. ही एक आपलेपणाची आणि माणुसकीची भावना असते जी दुःखाच्या प्रसंगी खूप मोठा आधार देऊन जाते.

आसपास असलेले भाऊबंद तर असतातच परंतु गावातल्या सगळ्या लोकांचे एकमेकांबरोबर काही ना काही नाते असतेच. इतक्या वर्ष एकत्र एकाच गावात राहिल्यामुळे ती नाती आपोआपच तयार होतात.
कुणाची आत्या, कुणाची मावशी, कुणाची मामी, कुणाच्या वन्स, सासू, अशी अनेक नाती गावात तयार होतात. नुसती तयार होत नाही तर ती पाळलीही जातात. बाईंची गावामध्ये खूप नाती तयार झाली होती. गावात आलेल्या नवीन मुली म्हणजेच सुना त्या सुद्धा ही नाती मानतात हे पाहून खूप छान वाटते.

गावाकडे सुद्धा खूप उच्चशिक्षित मुली सुना म्हणून आलेल्या आहेत. त्या सुद्धा भाकरी घेऊन जाणे ही प्रथा पाळतात ते पाहून खरच खूप बरे वाटते.
सकाळी शेतात जायच्या अगोदर ज्या घरी दुःखद घटना झालेली आहे त्या घरी भाकरी आणि भाजी घेऊन घरी येतात आणि सर्वजणी मिळून जेवतात. त्यानिमित्ताने घरात बोलने होते. दुःखाच्या वातावरणामध्ये माणसांची येजा झाल्यामुळे त्या घरातील माणसांनाही थोडे बरे वाटते.
सुमी जेव्हा गावाकडे राहायची तेव्हा असे काही झाले की भाजी भाकरी घेऊन जायला ती नेहमी तयार असायची.

सकाळ संध्याकाळ दोन दोन टोपले भाकरी आणि मोठे टोप भरून कालवन म्हणजेच पातळ भाज्या सुक्या भाज्या यायच्या.
आता तर दूर दूरचे नातेवाईक सुद्धा इतक्या लांबून भाजी भाकरी व्यवस्थित येणार नाही वातावरणामुळे खराब होतात म्हणून ज्यांच्या घरी दुःखाचे वातावरण आहे त्यांच्याकडे थोडा किराणा घेऊन येतात.

साखर, चहा पावडर, साबुदाणे, गव्हाचे पीठ,बाजरीचे पीठ, डाळ असे काहीसे. खरंच ही दूरदृष्टी पाहून खूपच कौतुक वाटते. दररोज सकाळ संध्याकाळ 50-60 माणसे जेवायला घरी असतात.


सुमीला इतकी सगळे माणसे घरी आल्यावर खूप बरे वाटत असे. त्यानिमित्ताने गप्पा होत असत. दुःखाचा थोडा विसर पडत असे. बायका भाकरी आणि कालवून घेऊन आल्यानंतर शेजारच्या जावा लगेच उठून त्यांनी आणलेल्या भाकरी व्यवस्थित टोपल्यात ठेवून आणि भाजी एका मोठ्या पातेल्यात ओतून लगेच त्यांची भांडी धुवून घासून देत असत. ही गोष्ट दिसायला खूप छोटी आहे. जर खोलवर विचार केला तर दररोज या बायका भाजी आणि भाकरी घेऊन येतात तेव्हा दररोज ताटे किंवा भाकरी बांधून आणलेले फडके तिथेच ठेवून न देता परत दुसऱ्या दिवशी सुद्धा ते फडके आणि भांडे लागणार आहे म्हणून घासून लगेच देऊन टाकतात.

जवळजवळ 50- 60 बायकांचे दररोजचे भाकरी आणि भाजी ची भांडी घासून देणे. हे काम सुद्धा दिसते तितके बारीक नाही. तरीसुद्धा हे काम मोठ्या जावा छोट्या जावा खूप मनापासून करतात. एवढेच नाही तर
सगळेजण जेवून गेल्यानंतर घर व्यवस्थित झाडून पुसून भांडी घासून आवरून ठेवत असत.


खरंच या सगळ्याची ज्या घरात दुःख झाले आहे त्या घराला खूप गरज असते. आपल्यापेक्षा मोठा असलेल्या जावा… छोट्या जावा सगळ्या कशा एकत्र येऊन सगळी कामे भराभर आवरतात. हे सुमी खूप कौतुकाने पाहत असे. आणि तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवायला लागले. गावात असे काही झाले की सुमी बाईंबरोबर भाकरी घेऊन जात असे.

बाई गेल्यानंतर खर तर या सगळ्याचा अर्थ सुमीला उमगला.

दिवसभर घर अगदी गच्च भरलेल असायचं.
सर्वजण बाईं बरोबर त्यांना आलेला अनुभव सांगत असे. तेव्हडाच जुन्या आठवणीना उजाळा मिळत असे. काही गमतीशीर प्रसंग सुद्धा सांगितले जायचे आणि चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटून जात असे.
खरच बाईंनी माणसे खूप कमावली. चुकूनही कधी कोणावरही ओरडल्या नाहीत. भांडण हा शब्द तर खूप लांबची गोष्ट. दहा दिवसात सुमिला माहित नसलेल्या बाई सुद्धा कळाल्या.
आणि गावातल्या नवीन आलेल्या सुना आणि जुन्या सुना सगळ्यांजणी भाकरी घेऊन जाणे ही प्रथा सुद्धा अजूनही पाळतात आणि इथून पुढे पाळतील अशी खात्री आहे.

क्रमश :

6 thoughts on “प्रथा (एक भावना आपलेपणाची) | Tradition”

  1. खुप चांगल्या प्रथा आहेत आपल्या समाजात अजुनही अश्या प्रकारच्या 🙏
    आमच्या कोळी समाजात तर अशी प्रथा खुप पूर्वी पासुन चालत आली आहे आणि अजुनही त्या प्रथेनुसार आम्ही चालतो अगदी जग कीतीही आधुनिक झाल असले तरीही आणि मला ह्याचा सार्थ अभिमान आहे ♥️
    खरंच आपलं हक्काचं माणूस जेव्हा अचानक आपल्या सगळ्यांना सोद्दून जात तेंव्हा आपले नातेवाईक अश्या प्रकारे भाकरी आणि सोबत भाजी वगैरे असं आपलेपणाने घेवून येतात आणि आपल्या दुःखात सहभागी होवून आपल्या सोबत ते खातात खुप मोठं मन लागतं हे सगळं करायला पण जिथे आपलेपणाची भावना सच्ची आहे तिथे सगळंच सहज सोप होवून जाते ❤️❤️

    Reply
  2. खरचं माणसाची ओळख आणि त्याने कमवलेली आर्थिक संपत्ती या वरून न ठरता त्याने कमवलेली माणसे आणि त्यांच्याशी जपलेले नाते या वर ठरते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले… “बाई “एक माणुसकीचा झरा होत्या आणि आता तुमच्या रूपात तो असाच वाहत रहाणार….

    Reply
  3. अशा प्रथा खरंच खूप छान आहेत.. बाईंनी जे आयुष्यात कमावलं.. ते ह्या प्रेमरूपी कृतीतून दिसले.. तुम्ही, सोनल त्यांचं च प्रतिबिंब आहात…

    Reply
  4. Khup chan pratha ahet aplya kade. Ikde amchya kade pan asa ch kartat. Ata dabe antat bharun n Tu mhante tas lagech clean karun detat.

    Reply
  5. हो अगं अजूनही ह्या प्रथा खेड्यात पाळल्या जातात त्यामुळे ज्या घरात घटना घडलेली असते त्यांना खरंच खूप गरज असते.. दुःख वाटलं जातं..मन थोडं हलकं होतं…. आमच्या कडे गावाला पण अशा प्रथा आहेत अजून

    Reply

Leave a Comment