आई वडिलांचा आदर करा (Respect your parents)हे जेव्हा घरातल्या एखाद्या कारभाऱ्याला सांगायची वेळ येते. तेव्हा खरंच आपन कलियुगाकडे चाललेले आहोत याची खात्री पटते.
कारभारी या शब्दाला गावाकडे खूप महत्त्व आहे. प्रत्येक घरात एक कारभारी असतोच. जुन्या काळातले कारभारी पाहिले की त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखे नक्की असायचा घरातला मोठा मुलगा किंवा ज्याला व्यवहारातले जास्त कळते त्याला कारभारी म्हंटले जायचे. जो कारभारी असेल त्याला संपूर्ण घराचा विचार करूनच प्रत्येक व्यवहार करायला लागायचा तो कधीही स्वतःबद्दल स्वार्थीपणाने विचार करत नव्हता. जे संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या भावांसाठी योग्य असेल तेच तो करायचा.
आताच्या काळात मात्र कारभारी या शब्दाचा वेगळाच अर्थ झालेला आहे आणि एकत्र कुटुंब सुद्धा आता जास्त पाहायला मिळत नाही. आई वडील आणि दोन मुले इतकेच कुटुंब आता राहिले. आई वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे करावे. चांगली कामे केले तर शाबासकी द्यावी वाईट काम केले तर हक्काने रागवावे. अशी आपली पिढी. आई वडील रागवतील म्हणून बरेचदा आपण मनात असूनही आपली खूप सारी स्वप्ने कधी पहिली नाहीत.वाईट वळणावर जाण्याचा तर प्रश्नच नाही.
वडिलांनी नुसते डोळे मोठे करून पाहिले तरी चार-पाच दिवस त्यांच्या पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. पेनातल्या शाई पासून तर यात्रेच्या कपड्यापर्यंत सगळं आई वडीलच पाहत असे. लग्न जमवण्यापासून तर लग्न पार पडेपर्यंत सगळे कारभार आई-वडिलांच्या हातातच होते. माझ्या दृष्टीने ते खरंच खूप छान दिवस होते. कारण कारभार वडिलांच्या हातात होता. किंवा घरात जे मोठे असेल त्यांच्या हातात असायचा.
मात्र नंतरच्या काळात खूप लहान वयात काही मुलांच्या हातात कारभार आला आणि ते स्वतःला आई-वडिलांच्या वर चढ समजू लागले. मोठं मोठ्या श्रीमंत मित्रांबरोबर फिरणे… लांब लांब देवाला जाणे आणि घरात आई-वडिलांचा अपमान करणे याचे प्रमाण वाढले.
ज्या आईने आपल्याला जन्म दिला रात्रंदिवस ती कुटुंबासाठी इतक्या खास्ता खाते. तिचा येता जाता पान उतारा होऊ लागला. वडील म्हणजे फक्त एक घरगडी म्हणून राहू लागला. असंख्य उदाहरणे मी अगदी जवळून पाहिले आहेत. सुरुवातीला आई-वडिलांना मुलगा कारभार सांभाळतो म्हणून खूप आनंद होतो. आणि झालं ही पाहिजे. पण ते कधी मुलगा स्वतः कमवायला लागला कि…. अजूनही काही ठिकाणी माहेरी जायचे असले किंवा बहिणीकडे जायचे असले तरी आई मनमोकळेपणाने विचारू सुद्धा शकत नाही की मी जाऊ का म्हणून. खरंतर विचारायची वेळ सुद्धा पडू नये तू त्याची आई आहेस. आता मुलगा मोठा झाल्यामुळे ती आता मुलाला घाबरू लागते. खरंतर चुकी त्या मुलाची अजिबात नसते. चूक आई-वडिलांचीच असते. त्याला इतका बाबा बाबा म्हणून डोक्यावर चढवून घेतात. आणि तो मुलगा मात्र सर्रास आई-वडिलांचा चार लोकांसमोर अपमान करत असतो. खूप वाईट वाटते हे सगळे पाहून.
पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांनी खूप लवकर मुलांच्या हातात कारभार देवुच नये. मला बाई काय यातलं कळत नाही… असं शिकलेल्या आया सुद्धा म्हणतात. तेव्हा मात्र डोक्यात रागाची तिडिक जाते. जर तुम्ही स्वतः म्हणत असाल मला काही कळत नाही तर बाकीच्यानाही म्हणायला वेळ लागणार नाही.
बाहेर चालले की घरात कुठे चाललो आहे हे सांगून न जाने. दिवसभर मित्रांबरोबर चकाट्या पिटून संध्याकाळी घरी येऊन आईकडून गरम गरम जेवणाची अपेक्षा करणे. की जी आई दिवसभर शेतात राब राब राबून संध्याकाळी जनावरे पाहून स्वयंपाक करून कधी एकदा पाठ जमिनीला टेकते असं तिला होऊन गेलेला असते. आई-वडिलांबरोबर दोन प्रेमाचे शब्द तर सोडा निदान बोलले तरी खूप मोठे नशीब. मोठमोठे देव करायचे कीर्तने प्रवचने ऐकायची आणि घरात आई-वडिलांबरोबर नोकराप्रमाने प्रमाणे व्यवहार करायचा.
कुणाला जरी दिसत नसेल तरी वरचा मात्र बघत असतो याची सुद्धा त्यांना भीती वाटत नाही. खूप वाईट वाटते जेव्हा असं समोर दिसते. नका वागू असे. यामुळे आई-वडिलांचे चार चौघात हसूच होते हे मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काही मोठेपणा मिळत नाही. तुम्ही जे कर्म करणार आहात त्याचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. म्हणूनच मुलांना मुले म्हणूनच ठेवा. अगदी लहान वयात त्यांच्या हातात कारभार देऊन. तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका.
एखादे महत्त्वाचे काम करायचे असेल तर आई-वडिल सुद्धा अभिमानाने सांगतात आमचा कारभारी घरी आल्यानंतर बघू. तो कारभारी की ज्याला एक पैसा कमवायची अक्कल नाही. अशा आई-वडिलांना खरंच कळकळीची विनंती आहे. नका इतक्या लवकर मुलांच्या हातात कारभार देऊ.
खरच आई-वडिलांचा धाक होता तेच खूप बरे होते आणि तेच सर्वांच्या हिताचे होते असे कधी कधी वाटून जाते.
तुझं लिखाण वाचताना, माझंच मन मी वाचतेय असं वाटतं.
खूप सारं प्रेम.
अशीच लिहीत रहा.