“सून बाई तेवढे कॅलेंडर बघून सांगता का अमावस्या कधी आहे’? (Ashadi Amawasya)
देवाची पूजा करता करता वसुंधरा ताईंनी आपल्या मोठ्या सूनबाई म्हणजेच दिपालीला विचारले.”आत्या, पाच तारखेला आहे हो”दिपाली ने उत्तर दिले.वसुंधरा ताईंनी आरतीचे ताट खाली ठेवले.मनोभावे नमस्कार केला आणि संपूर्ण परिवारासाठी प्रार्थना करुन त्या सोफ्यावर बसल्या.त्यांनी दिपालीला सांगितले “आता मेघना येईल भाजी घेऊन, आपल्या तिघिंसाठी कॉफी कर”.दिपाली ने कॉफी ची तयारी केली आणि ती मेघनाची वाट बघत होती.
मेघना म्हणजे वसुंधरा ताईंची धाकटी सून, दिपाली ची धाकटी जाऊबाई.एप्रिल मध्येच वसुंधरा ताईंच्या धाकट्या लेकाचे म्हणजेच अभय चे लग्न झाले. मेघना लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली.वसुंधरा ताईंना हे स्थळ त्यांच्या बहिणीने सुचवले होते.त्यांच्या बहिणीच्या शेजारी राहणाऱ्या सुमतीची मेघना पुतणी होती. मेघना चौथीत असताना तिचे वडील गेले आणि सातवीत असताना आई…. अगदी वयात यायच्या वयात ती आई वडिलांच्या मायेला पोरकी झालेली मेघना खूप दुखी झाली होती. तिच्या काकांनी तिला आपल्याकडे नेले खरे पण सुमती ला ते मान्य नव्हते. पण शिक्षण घ्यायचे या एकाच उद्दिष्टाने ती सुमती कडे रहात होती. तिचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि काकांनी तिच्या लग्नाची बोलणी करायला सुरु केले. वडिलांच्या जागी राहून त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडायचे असे ठरवले.
आपली पत्नी अजिबात समजून घेत नाही मेघनाला याची पुरेपुर जाणिव त्यांना होती म्हणून त्यांनीच मालती ताईंना स्थळ बघायला सांगीतले होते.मालती ताईंना ही माहिती होते की, वसुंधरा ही अभय साठी स्थळ बघत आहे. म्हणून त्यांनीच हे स्थळ सुचवले,सगळ्यांची पसंती झाली आणि आपणं लग्न करून घेऊ असा विचार वसुंधरा ताईंनी घरात बोलून दाखवला, त्याला सगळ्यांनी संमती दर्शवली आणि विवाह संपन्न झाला.आता पहिला आषाढ येत आहे म्हंटल्यावर नवऱ्याचे आणि सासऱ्यांचे तोंड बघायचे नाही या विचाराने मेघना थोडी अस्वस्थ होती कारण तिला काकू कडे जायची इच्छा नव्हती आणि काकूने ही फोन केला नव्हता. आता घरात काय निर्णय घेतील याची थोडी भिती तिला होती.
आज मुद्दाम वसुंधरा ताईंनी तिला भाजी आणायला पाठवले. त्या दिपाली ला म्हणाल्या,”सून बाई तू आणि मेघना आपल्या शेतातल्या घरी जा पाच दिवस, राघोबा आणि मंजुळा आहेतच तिथे तुमच्या सोबतीला”.सासू बाईंचा हा निर्णयही दिपालीला खूप आवडला आणि ती म्हंटली,”चालेल आत्या, मी जाईल तिच्या बरोबर “वसुंधरा ताई म्हंटल्या “आजच संध्याकाळी मी सगळ्यांशी बोलते तुम्ही निघायची तयारी सुरु करा”.तेवढ्यात मेघना भाजी घेऊन आली. तिचा उतरलेला चेहरा बघून वसुंधरा ताईंनाही भरुन आले. त्यांनी आधी आपण कॉफी घेऊ म्हणून सांगितले, त्याप्रमाणे दिपाली ने तिघींसाठी कॉफी आणली. तिघींनी कॉफी घेतली. आता थोडे मेघनाला ही बरे वाटले.
संध्याकाळी सगळे घरी आल्या नंतर वसुंधरा ताईंनी त्यांचा विचार बोलून दाखवला. “जग कितीही बदलले तरी काही रिती आहे त्या आपणं पाळू या, त्यामुळे अमावस्येला नव्या नवरीला माहेरी पाठवायची रीत असली तरी आपण आपल्या दोन्ही सुनांना आपल्या शेतातल्या घरी पाठवू. राघोबा ला तसे मी सगळे सांगितले आहे”.त्यांच्या या विचाराचे सगळ्यांनी खूप कौतुक केले आणि स्वागत ही केले . मेघनाच्या डोळ्यातून तर नकळत अश्रू वाहू लागले. तिच्या मनात आला विचार आला परमेश्वराने माझ्या आईला लवकर नेले पण मला समजून घेणाऱ्या सासू रुपी आईची भेट घडवली.. तिने वसुंधरा ताईंच्या पायावर डोके ठेवले, वसुंधरा ताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला उठवले आणि आपल्या मिठीत घेतले.”बाळा, तुझी सगळी परिस्थिती बघूनच आम्ही तुला या घरात आणले, तुला हक्काचे घर, हक्काची माणसे हवी होती ना”असे म्हणून त्यांनी तिच्या तोंडावरून हात फिरवला.
दिपालीच्या डोळ्यातून अश्रू वहात होते कारण तिन वर्षापूर्वी ती या घरात लक्ष्मी म्हणून आली तेव्हा पासून वसुंधरा ताईंनी तिला आईच्या मायेनेच सांभाळले आणि सांभाळत आहेत. दिपाली ही वीना आईची पोर, पण कमीत कमी तिच्या पाठी दोघी बहिणी आहेत म्हणुन अधून मधून ती त्यांच्याकडे जात असते आणि तिच्या बहिणी ही हक्काने येत असतात. त्यावेळी ही वसुंधरा ताई त्या बहिणींचे ही माहेरपण करतात. शिवाय त्यांच्या नणंद आणि भाच्यांना ही तेवढाच जीव लावत त्यामुळे खऱ्या अर्थाने माणसांची श्रीमंती त्या अनुभवत होत्या. या सगळ्यांत सगळ्यात जास्त आनंद आज माधवरावांना झाला होता कारण वसुंधरा सारखी पत्नी त्यांना लाभली होती.
दिपालीच्या डोळ्यातून अश्रू वहात होते कारण तिन वर्षापूर्वी ती या घरात लक्ष्मी म्हणून आली तेव्हा पासून वसुंधरा ताईंनी तिला आईच्या मायेनेच सांभाळले आणि सांभाळत आहेत.एक स्त्रीचं एका स्त्रीच्या भावना समजून घेऊ शकते या विचाराने चालणाऱ्या वसुंधरा ताई म्हणजे समस्त स्त्री वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहेत असेच या दोन्ही सुनांना वाटत होते. घराचे गोकुळ होत असताना तो मायेचा झरा आटता कामा नये ही शिकवण वसुंधरा ताईंच्या आईनी त्यांना त्यांचे लग्न झाले त्यावेळी दिली होती. ती त्यांनी पाळली आणि आता सुनांनाही त्याच विचाराने त्या घडवत आहेत. म्हणूनचं लक्ष्मी तिथे खऱ्या अर्थाने वास करते. आईच्या प्रेमाला पारख्या झालेल्या मेघनाला त्यांच्या रूपात एक आई आणि दिपाली च्या रूपात एक मोठी बहीण मिळाली. आता तिला जगातली सगळ्यांत नशीबवान मीच आहे या भावनेने घेरले, तिचा हसरा चेहरा अभय तिरप्या नजरेने पहात होता, आणि त्याच वेळी त्याची नजर आपल्या आईकडे गेली. आई देवा कडे पहात होती आणि तो आईकडे…. कारण त्या लक्ष्मीचे रूप त्याला आपल्या आई मध्ये दिसत होते.