गोष्ट आहे रक्तापलीकडील नात्याची (Relation) विचार करायला लावणारी.
“जानकी देशपांडे आपल्याला भेटायला कोणी आलेले आहे ऑफिसच्या जवळ या” असा आवाज माईक मधुन आला आणि जानकी ताईंना आनंद झाला.
हो आश्रमातली रूम नंबर 104 यामध्ये राहत होत्या जानकी ताई. माइक वरचा आवाज ऐकला तसा जानकी ताई हळूहळू ऑफिस जवळच्या व्हरांड्यात गेल्या, त्यांना वाटले की आपल्याला भेटायला रंजू आली आहे. रंजू त्यांच्याकडे जयवंतराव असताना त्यांची व जानकी ताईची सेवा करायला असायची. ती आपल्याला भेटायला आली की काय असा त्यांचा समज झाला. जानकी ताईंचे मिस्टर जयवंतराव आठ महिन्यांपूर्वीच देवाघरी गेले. त्यांचा एकुलता एक मुलगा जयेश अमेरिकेत स्थायिक झाला होता तर एक मुलगी जिचे नावं राजश्री ती पुण्यातच रहात होती.
खरे तर जयेश इथे नसताना एका मुलाचं सगळं कर्तव्य रंजू पार पाडत होती .पण जयवंतराव गेले आणि त्यांच्या कार्यासाठी म्हणून जयेश आला आणि त्यांनी काय ठरवलं माहित नाही आईला म्हंटला ,”तू काही दिवस ताईकडे रहा मी तुला घ्यायला येतो, तुझा पासपोर्ट काढतो सगळं करून आपण अमेरिकेला जाऊया या घरी आता राहून तू काय करतेस”? पासपोर्ट व्हिजा सगळी प्रोसेस झाल्यानंतर जानकी ताई मुलाबरोबर अमेरिकेत गेल्या. काही महिने तिथे त्यांना छान वाटले. परंतु त्यांना तिथले वातावरण आणि इकडच्या माणसांची आठवण काहीही स्वस्त बसू देईना आणि हट्ट करून त्या पुण्यात परत आल्या. आई परत येत आहे असं बहिणीला फोन करून सांगितले. हो हो येऊ दे आल्यानंतर ती माझ्याकडेच राहील असं तिने जयेश ला फोनवर सांगितलं.
सगळं होईपर्यंत राजश्री हो हो म्हणत होती आणि शेवटच्या दिवशी मात्र असा निर्णय झाला की आईला वृद्धाश्रमात ठेवण्यात यावे.कारण राजश्री च्या घरी ही तिचे सासू सासरे होते आणि मुलांना सेप्रेट रूम लागतात या कारणास्तव तिनेही नेणे टाळले.जानकी ताईंना खूप वाईट वाटले त्यांनी विचार केला ठीक आहे मी तर परत अमेरिकेला जाऊ शकत नाही कारण तसेही मला तिकडचे वातावरण आणि दिनश्चर्या सूट होणारं नाही.
एकुलती एक मुलगी तिलाही माझी अडचण आहे तर मी वृद्धाश्रमाचा रस्ता धरते. त्यांनी आपल्या जवळच्या दागिन्यांची वाटणी केली .मुलीला काही दिले, मुलाला काही दिले आणि फक्त एक सोन्याची नथ होती त्यांच्या लग्नातली ती त्यांनी स्वतः जवळ ठेवली होती. त्यांना त्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर आल्या आणि डोळ्यात पाणी आले .त्या व्हरांड्यात गेल्या तर समोर दिसली त्यांना राजश्री आणि तिची मुलगी नेहा .जानकी ताईंना कोण आनंद झाला अरे आज आपली मुलगी आपल्याला भेटायला आली पण तिची वागणूक आणि ती वागली हे त्यांना ते दिवस आठवले आणि वाईट वाटले .आज कोणत्या कारणासाठी ती आली असावी असा प्रश्न त्यांना पडला. वरकरणी त्या हसत होत्या , तिने एक पेढा त्यांच्या हातात दिला. आई तुझ्या नातीचं लग्न ठरलय बर का ,जानकी ताईंना तो पेढा घेतांना हात थरथरत होते की आपली पोटची पोर सुद्धा आपल्याला परकी झाली.
आपण एवढं शिकवलं तिचे छान लग्न लावून दिलं आज तिला आपली अडचण झाली ,तेही सगळं मी मान्य केलं पण आज मुलीचं लग्न ठरलं त्या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला दोन तास घरी नाही नेलं .जानकी ताईंचा आवाज थरथर करत होता पण त्यांनी मनाने हिय्या केला की आता ह्या आनंदाच्या क्षणी तिला काहीच दुःख द्यायचं नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तिनी पेढे दिले थोडे लाडू चिवडा दिला. गप्पा मारल्या अवांतर, आणि म्हटली मी परत पुढच्या आठवड्यात भेटायला येते असं म्हणून राजश्री आणि नेहा गेल्या. जानकी ताई भिंतीचा आधार धरून धरून आपल्या बेड वर आल्या. रूम मधल्या त्यांच्या सहचरणी खूप उत्सुक होत्या ,त्यांना कळेना की नेमकं काय घडलं ?असेल काय म्हटली असेल जानकी ताईंची लेक .जानकी ताईंना घ्यायला आली होती का ?असे खूप सारे प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होते .जानकी ताईंच्या डोळ्यात पाणी वाहत होतं . ती फक्त आनंदाची बातमी सांगायला आली होती .पण त्या क्षणी त्यांना रंजूची खूप आठवण येत होती ती यायची डोक्यावरून हात फिरवायची, वेणी घालून द्यायची हे सगळं त्यांना आठवायचं आणि गेले आठ दिवस झाले रंजू का नाही येत याकडे त्यांचं लक्ष लागलं.
चार वाजताची वेळ झाली सगळ्यांना चहासाठी बोलवण्यात आलं .जानकी ताई गेल्या, खुर्चीवर बसल्या तिथे चहा घेतला पण माहित नाही आज त्या खूप उदास झाल्या होत्या .असं करत एक चार-पाच दिवस गेले आणि परत एकदा राजश्री जानकी ताईंना भेटायला आश्रमात आली यावेळेस येताना ती एकटीच होती आणि आनंदी दिसत होती .आईला म्हटली आई तू आठ दिवस आधीच यायचे आणि नेहाच्या लग्नासाठी मी तुला खूप छान साडी घेतलेली आहे जानकी ताई वरकरणी हसल्या . पण मनातून खूप दुःखी होत्या. तरी पण त्यांनी ते दुःख लपवलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर राजश्रीने विषय काढला,” आई तुझी सोन्याची नथ कुठे आहे “?आणि मग मात्र जानकी ताई सावध झाल्या त्या म्हटल्या “का ग”? तेव्हा राजश्री त्यांना म्हटली “आई, तुझी आठवण म्हणून नेहाला ती देणार का तुझी नथ “?जानकी ताईच्या चेहऱ्यावरती जे हसू होतं ना ते अतिशय केवीलवान होतं .त्या एवढेच म्हटल्या” मी, विचार करते” असे शब्द येतात राजश्रीचा चेहरा अगदी बघण्यालायक झाला होता.
माणसांपुढे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असाव्यात का असा प्रश्न त्यांना पडला .त्या विचार करून सांगते असं म्हटल्या आणि तिला टाटा करून त्या परत एकदा आपल्या रूममध्ये आल्या. आता शेजारील त्यांच्या बेडवरती कमळाबाई येऊन बसल्या .”काय जानकी काय एवढी उदास आहे “?मग जानकीने सांगितलं “अहो काय सांगायचं ?एकुलती एक मुलगी शिकवलं सवरलं, चांगलं स्थळ मिळून मोठ्या घरात पडली पण आईसाठी तिला एक रूम नाहीये तिच्याकडे तिच्या हृदयात माझं स्थान नाहीये तिच्या लेकीसाठी सोन्याची नथ तिला माझीच हवी आहे”. मग कमळाताईंनी सगळ्यांना जवळ गोळा केलं आणि सांगितलं ,”हे बघा आपले जी आठवण असते आपल्या आई वडिलांची ती आपल्यापाशीच ठेवा ,इथून पुढे कोणीही आले भावना विवश होऊन तरी त्याला तसं महत्त्व देऊ नका. मी कदाचित तुम्हाला सांगते हे तुम्हाला पटणार नाही पण मी खूप व्यवहारी बाजू तुमच्या पुढे मांडत आहे “.सगळ्याजणी माना डोलवत होत्या.
काय केलं आपण? कुठे कमी पडलो मुलांच्या संगोपणात की त्या मुलांनी आपला सांभाळ ही करू नये .ठीक आहे, शिकलात म्हणून तुम्ही परदेशी गेलात पण आज आपले आई वडील कशा परिस्थितीत राहतात याचा साधा विचारही करू नये या लोकांनी? आणि या मुली ज्यांना आई ची आई होऊन रहाता येत नाही. सगळ्यांना शेवटी जानकी ताईच म्हटल्या “ती जरी किती काही म्हटली तरी माझ्या मनाशी मी पक्क ठरवलेला आहे ती नथ नक्की कोणाला देणार “असं म्हणून सगळ्या परत एकदा गप्पा मारायला लागल्या .काही जणी फुलवाती वळायला लागल्या आणि आपलं मन रमवायला लागल्या. पण जानकी ताईंच्या डोक्यातून काही तो विचार जातच नव्हता. बरं रंजू का नाही आली एवढ्या दिवसात असंही त्यांना वाटून गेले .सहसा आठवड्यातून एकदा येणारी रंजू यावेळेस दहा दिवस उलटून गेले तरी आली नाही .तो दिवस तसाच गेला.
दुसऱ्या दिवशी जानकी ताईंनी सकाळी आंघोळ केली, देवाची स्तोत्र म्हटले आणि नाश्त्यासाठी म्हणून निघाल्या .नाश्ता घेत असतानाच पुन्हा तिथे त्यांना बोलवण्यात आलं त्यावेळेस मात्र रंजू तिथे आली होती. आणि तिच्या हातात पेढ्याचा पुडा होता .तिने जानकी ताईंच्या रूम मधल्या सगळ्या मैत्रिणींना पेढे दिले का तर रंजूचे लग्न ठरले होते .जयवंतराव होते आणि जानकी ताई होत्या तेव्हा रंजू एखाद्या मुलासारखी सगळी कर्तव्य त्यांची पार पाडत होती अगदी त्यांना दवाखान्यात घेऊन आणणं ,त्यांना सूप बनवून देणे त्यांची औषध आणून देणे त्यांना वेळेवर ते देणे ह्या सगळ्या गोष्टी रंजू करत होती. आणि जानकी ताईंना त्यांच्या मुलीची कमी कधीच जाणवली नाही. आज तिचं लग्न ठरलं होतं, ती खूप खुश होती आणि जानकी ताईंच्या पाया पडली. त्यांच्या सगळ्या सख्यांच्याही पाया पडली मला भरभरून आशीर्वाद द्या म्हटली.एवढं बोलून रंजू आपल्या घरी गेली. मी पुन्हा तुम्हाला घेण्यासाठी येत आहे हे सांगून.
आता मात्र जानकी ताईंना खूप आनंद झाला होता, तो त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता .त्यांच्या सगळ्या सख्या सुद्धा खूप आनंदी होत्या. जानकी ताईंची स्वप्न रंगवायला सुरुवात झाली होती . मी रंजूच्या रुखवतासाठी हे मांडणार आहे असं सगळं त्यांचं मनाशी ठरवून झालं होतं आणि तो दिवस आला .रंजू तिच्या आईला घेऊन आली. खूप मानापाणाने तिने त्यांना रिक्षेत बसवलं आणि आपल्या घरी घेऊन गेले .जानकी ताईंना खूप खूप समाधान वाटलं डोळे भरून आले ,अरे कोण कुठले आणि आपल्याला एवढा जीव लावतात हे बघून त्यांना गलबलून आले. हळद फोडण्याचा कार्यक्रम झाला, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला ,देवकार्य झालं आणि आता उद्या लग्न म्हणता आज सगळे कार्यालयात रवाना झाले.
घरी फक्त जानकी ताई ,रंजू चे आई बाबा आणि रंजू इतकेच होते .जानकी ताईंनी आपल्या पर्स मधून एक छोटी पुडी काढली आणि त्यापुडीत होती त्यांच्या लग्नात त्यांच्या आईने दिलेली तीच नथ जी राजश्री त्यांना मागायला आली होती. जानकी ताईंनी स्वतःच्या हाताने ती नथ रंजूच्या नाकात घातली आणि तिच्या कपाळावरून ,डोक्यावरून हात फिरून आपल्या स्वतःच्या डोक्यावरती बोटे मोडली आणि तिची नजर काढल्यासारखं केलं. काय देखणं रूप दिसत आहे नाही रंजूचे असं त्यांनी स्वतःच मनाशी म्हटलं .आज खऱ्या अर्थाने त्यांना जन्म सार्थकी लागल्यासारखं झालं आणि रंजूच्या रूपात त्यांना मुलगी भेटल्याचं समाधान वाटलं .आजकाल या व्यवहारी दुनियेत नात्यांना सुरुंग लावावा अशा वृत्तीची लोक आहेत हे बघून खरंच वाईट वाटतं. जिथे रक्ताचं नातं रक्ताला विचारत नाही तिथे परकी लोक जीव लावतात आणि कधी आपले होऊन जातात हे कळतही नाही याची प्रचिती जानकी ताईंना आली.
खरच या दुनियेत देव आहेत की नाही माहित नाही असं म्हणत देवासारखी मात्र माणसे मात्र नक्की आहेत यावर त्यांचा विश्वास बसला आणि सगळे मिळून लग्नाच्या कार्यालयात निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला आणि सनईचे सूर कानाला ऐकू येत होते. जानकी ताईंनी पण छान साडी नेसली होती गळ्यात मोत्याची माळ घातली होती. आणि शालू नेसलेली रंजू ,मंडवळ्या घातलेली रंजू आणि त्याच्यावर ठसठशी नथ घातलेले तिचे रूप काय खुलून दिसत होते.जानकी ताई एकटक तिच्याकडे बघत होत्या .पूर्ण दिवस सगळा सोहळा पार पडल्यानंतर जानकी ताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा अस म्हणत आशीर्वाद देत होत्या.
हा आशीर्वाद देत असतानाच रंजूचे मिस्टर मात्र म्हटले “जानकी ताई काही दिवसांचाच प्रश्न आहे, आम्ही नवीन घर बुक केलेले आहे त्या घरात माझ्या आई-वडिलांबरोबर तुम्ही असणार आहात “हे वाक्य ऐकलं आणि संपूर्ण उपस्थित लोकांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होते.जगात काहीच बरोबर येत नाही ,प्रेमाचे दोन शब्द बरोबर येतात ह्या गोष्टींवर विश्वास असणाऱ्या जानकी ताईंना हा सुखाचा खूप मोठा धक्का होता .पण हे नुसतं बोलणं नव्हतं लग्नानंतर बरोबर एक महिन्यांनी रंजू आणि तिचे मिस्टर जानकी ताईंना आश्रमात घ्यायला आले .जानकी ताईंची बॅग भरली, जानकी ताईंनी आपल्या सख्यांचा निरोप घेतला. रंजुनी आणलेलं प्रेझेंट जानकी ताईंनी स्वतःच्या हाताने सगळ्या आपल्या मैत्रिणींना दिलं आणि जानकी ताई रंजू बरोबर तिच्या नवीन वास्तूमध्ये निघाल्या. खरंच हे नातं रक्तापलीकडचे आहे त्याला कुठलेही नाव नाही .