गोष्ट आहे दिलेल्या वचनाची (Promise) “अण्णा तुमच्याशी थोडे बोलायचे होते, माई सोबत असणे पण गरजेचे आहे” मकरंद ने ऑफीस ला निघतांना व्हरांड्यात पेपर वाचत बसलेल्या आपल्या वडिलांना सांगितले.
अण्णा म्हणाले “अरे आज एवढा गंभीर होऊन का बोलत आहेस?काही त्रास आहे का तुला? ऑफीस मध्ये काही टेन्शन चे काम आहे का?””नाही ओ अण्णा, ऑफीस मध्ये तर काम खूप असतेच पण… बोलू या ना दुपारी. तुम्ही माई ला घेऊन माझ्या ऑफीस जवळच्या रेस्टॉरंट मध्ये या. आपणं एकत्र जेवण करू “.अण्णा म्हंटले”ठीक आहे, येतो आम्ही”.आणि मकरंद निघाला. तो गेल्यानंतर त्यांच्या दोन नंबर च्या सून बाईंनी चहा आणून दिला.
पण त्या ही थोड्या नाराज दिसत होत्या.राधा बाई देवपूजा करून व्हरांड्यात आल्या आणि अण्णांच्या बाजूच्या खुर्चीवर बसल्या. त्यांनी अण्णांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले की काहीतरी घडले आणि त्याचा विचार अण्णा करत असावे.तेवढ्यात रसिका तिथे आली, तिने माईंना विचारले “माई आज भाजी काय करू?”तेव्हा अण्णा तिला म्हणाले की आज दुपारी आम्ही दोघे बाहेर जाणारं आहोत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळातले जोशी काका आहेत त्यांच्या कडे जेवायला बोलवले आहे”.रसिका बरं म्हणून आत निघून गेली.
रसिका म्हणजे मकरंद ची बायको. अतिशय शालिन, सोज्वळ पोर.माई अण्णांना म्हणाल्या,”तुम्ही काही बोलला नाहीत मला काल आज आपल्याला जायचे आहे असे”त्यावर अण्णा म्हणाले बाहेर पडलो की सांगतो.माई म्हंटल्या “ठीक आहे” एवढे बोलून त्या ही आत निघून गेल्या.आता अण्णा झोक्यावर बसले, झोका जसजसा मागे पुढे होऊ लागला तसतसा अण्णांच्या नजरे पुढे आयुष्याचा पटल सरकू लागला.अण्णा घरातले कर्ते पुरुष, पाठच्या बहीण भावांना प्रेम देणारे आणि त्यांचे पालन पोषण करणारे. कारण अण्णांचे वडील अण्णा पाच वर्षाचे असताना गेले तर आई अण्णांच्या पंधराव्या वर्षी…. तशी सगळी जबाबदारी अण्णांवर येऊन पडली.
अण्णांचे धाकटे बंधू नवनाथ यांचे लग्न झाले आणि त्यांची पत्नी कमल लग्न होऊन घरी आली. आता राधा बाईना बहिणीच्या रूपात एक जाऊ मिळाली… सुरुवातीचे वर्ष दिड वर्ष खूप छान गेले. गावाकडच्या वातावरणात दोघी मिळून सगळे छान पार पाडत होत्या. आणि तो दिवस उजाडला जेव्हा कमल आई होणार अशी बातमी मिळाली. सगळे आनंदी होते.महिने सरत होते तसे मात्र थोडी काळजी वाढत होती. कारण कमल साठी हे गरोदरपण थोडे त्रास दायक होत होते..आता तो महिना उजाडला जिथे एक नविन जीव जन्माला येणार होता. पण कमल चा रक्तदाब खूप वाढत होता.
त्या काळी गावाकडे एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले एक तर बाळ राहील नाही तर आई….आणि त्यांचे म्हणणे खरे ठरले. कमल बाईं आपल्या नुकत्याच जन्मलेल्या लेकाला सोडून गेल्या कायमच्या.. जाण्या पूर्वी त्यांनी राधा बाईंच्या हातात हात घेऊन सांगितले होते आता या लेकराची आई तुम्ही व्हा… आणि तेव्हा पासून मकरंद ची आई झाल्या राधा बाई. कालांतराने मकरंद दहा वर्षाचा झाला आणि नवनाथ राव ही हे जग सोडून गेले.अण्णांचे दोन चिरंजीव व मकरंद.. जो पर्यंत अविवाहित होते तो पर्यंत सगळं आलबेल सुरु होते. तिघेही एकमेकांचे मित्र बनून रहात होते.
कधी त्यांच्यात अजिबात सख्खा चुलत असा भेदभाव नव्हता. हळु हळु एक एकाची लग्न होत गेली आणि घराचे गोकुळ व्हायला सुरुवात झाली. मकरंद चे लग्न एका सर्व सामान्य घरातल्या रसिका बरोबर ठरले. तशी मकरंदचीच इच्छा होती की मला घर सांभाळणारी आणि माणसे जोडणारी सहचारिणी हवी. आणि रसिका ही अगदी तशीच होती.नोकरी निमित्त सगळे शहरात आले. शहराच्या उपनगरात अण्णांनी जागा घेऊन एक बंगला बांधला होता. आणि बंगल्याला नावही दिले होते गोकुळ.जसजसा परिवार वाढत गेला तसतसा कामावरून,पैशा वरून सूनांमध्ये कुरबुरी वाढत होत्या.
हे राधा बाईंकडून अण्णांना समजत होते.पण अण्णांना वाटायचे घर म्हंटल्यावर भांड्याला भांडे लागणार. आणि राधाबाई पण तीनही सुनांना समजून घेत होत्या.पण त्यांना हे ही जाणवत होते की आपल्या सूना या रसिकाशी थोड्या तुटक वागतात.बघता बघता 12:30 वाजायची वेळ झाली आता अण्णा आणि माई दोघेही निघाले आणि मकरंद ऑफिस जवळ येऊन थांबले .मकरंद आला आणि जवळच्या एका हॉटेलमध्ये ते गेले.ऑर्डर दिली जेवणाची आणि ऑर्डर येईपर्यंत मकरंद ने विषय काढला “अण्णा,माई आज तुम्ही आहात म्हणून हे सोन्याचे दिवस आम्ही बघत आहोत पण आता काळ बदलला परिस्थिती बदलली तशी माणसांची मनस्थिती बदलली.
तुम्हाला तर माहितीच आहे रसिकाची माहेरची सर्वसामान्य परिस्थिती असल्यामुळे आणि तिचा स्वभाव थोडा वेगळा असल्यामुळे ती ऍडजेस्ट करून राहते पण तरी आता मला तिच्या मनाची थोडीशी काळजी घेणे भाग आहे. याचा अर्थ कोणी वाईट आहे असा नाही, परंतु प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यात एक स्वतःची जागा लागते तर ती जागा मी तिला द्यावी असं मला वाटते.म्हणूनच मला असे वाटते की माझा परिवार आता थोडासा बाजूला होतोय, याचा पण याचा अर्थ असा नाही की आपण मनाने लांब जातोय .
आपण मनाने जवळच असणार आहे पण काही गोष्टी ह्या पर्याय म्हणून निवडलेल्या केव्हाही चांगल्या असतात “.अण्णांना आणि माईंना त्याचे म्हणणे तसे तर पटले होते. मग अण्णांनी त्याला सांगितलं की “तुझं बरोबर आहे मकरंद, आम्ही हाच विचार केला पण जोपर्यंत आहे आपलं गोकुळ सारखे घर आहे तर आपण कशाला असा विचार करूयात ह्या हेतूने आम्ही बोललो नव्हतो. पण तुला म्हणून सांगतो फार पूर्वी मी आपलं गोकुळ बांधायच्या वेळेसच आणखीन एक दीड गुंठा जागा घेऊन ठेवली होती आणि तिथे छोटे खानी घर बांधलेला आहे हे तर तुला माहीतच आहे.
मग दुसरीकडे घर का घ्यायचं?”मकरंद म्हटला “अण्णा तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केले आहे, आता आम्हाला आमची जबाबदारी पार पाडू दे.” पण अण्णा म्हटले ” जबाबदारी पार पाडणार आहात,आमचा सांभाळ हा तुम्ही सगळ्यांनीच करायचा आहे पण आता आपले आहे ना स्वतःचं घर मग कशाला पैसे खर्च करतोस” ?असे म्हणून तिघेही जेवण करून मकरंद च्या गाडीत निघाले आजमकरंदनी खरंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती.आणि तिघे जण बंगल्यावर गेले जिथे त्यांनी सध्या भाडेकरू ठेवले होते. अण्णांनी भाडेकरूंना सांगितलं “आता आम्हाला खरच गरज आहे आम्ही थोड्या दिवसांत इथे राहायला येतोय तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे व्यवस्था करा”.
भाडेकरूंनी संमती दाखवली आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितले की ,”हो आम्ही बघतो दुसरीकडे आम्हाला एक महिन्याची मुदत द्या “.मकरंद अण्णा यांनी सगळ्यांनी संमती दिली आणि खुशी खुशी ते तिथून बाहेर पडले .घरी जाताना अण्णा म्हटले, “आपल्याला एका ठिकाणी जायचे “मकरंद ने विचारले कुठे?” अण्णा म्हटले ,”आपल्या घराला नाव द्यायचे त्याची पाटी तयार करायला जाऊयात” मकरंद नी गाडी घेतली तिकडे, “अण्णा इतक्या लवकर तुम्ही नाव ठरवलं पण? अजून आपण घरात कोणालाच नाही विचारलं”. अण्णा म्हटले” ठरवायचे काय आणि विचारायचे काय? ते गोकुळ आहे हे वृंदावन आहे”. मकरंद ला खूप छान वाटले, तिघेही घरी पोहोचले तोपर्यंत अण्णांचे दोन्ही मुलेही घरी आले होते.
तिन्ही मुलं सुना एकत्र बसून अण्णांनी खुशी खुशी त्यांना निर्णय सांगितला. त्या दोन भावांना थोडे वाईट वाटले,पण अर्थात लग्न झाल्यानंतर थोडी परिस्थिती वेगळीच होते याची सगळ्यांना खात्री होती आणि विश्वासही होता की आपण शरीराने दूर जातोय मनाने नाही त्यामुळे सगळ्यांनी एक संमती ने या गोष्टीचा विचार केला .रसिका या सगळ्या गोष्टी ऐकत होती आणि नकळत तिचा डोळ्यातून पाणी आले ,उशीर झालाय पण मला समजून घेणार कोणीतरी आहे असे तिला वाटले.
त्या दोघी जावा त्या दिवसापासून तिच्याशी खूप छान वागत होत्या. हे गोकुळ आणि ते वृंदावन असच बहरत राहावं. अण्णांनी जाहीर केलं की ,”मी आणि माई काही दिवस इकडे आणि काही दिवस मकरंद कडे राहणार .आम्हाला सगळ्या नातवांना सारखंच प्रेम द्यायचं आहे “त्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणात मात्र काहीतरी वेगळं होतं, त्या दिवशीच्या अन्नाला खूप छान चव होती आणि तृप्तीचा आनंद होता .जेवण झाल्यानंतर अण्णांनी आकाशाकडे पाहिलं आणि आपल्या भावाचे आणि वहिनीचे स्मरण करून नकळत त्यांचे हात जोडले गेले आणि मी माझे कर्तव्य पूर्ण केले याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकले .
हे माईंनी हेरले आणि त्यांचेही नकळत हात जोडले गेले . जावेला दिलेला शब्द पाळला याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होते. खरंच आहे ,बऱ्याचदा परिस्थिती काही निर्णय घ्यायला भाग पाडते पण यामध्ये मनभेद होत नाही ना याची काळजी मात्र ज्येष्ठांनी घेतली तर सगळं काही सुरळीत होते याचे अण्णा आणि माई ही खूप छान उदाहरण आहे. हे गोकुळ ,वृंदावन असंच छान बहरत राहो हीच प्रार्थना त्यादिवशी माईंनी आणि अण्णांनी परमेश्वराकडे केली.