सारिपाट | Game

खरं तर जीवन म्हणजे एक सारिपाटच आहे.(game) जिंकलो तर सरळ रस्ता आणि हरलो तर खाचखळगे.

आज शामा ,माधुरी ,मीरा, आणि सुनिता या चौघीजणी भेटल्या . तसे पहिले तर या एकाच गावच्या मुली. लग्नानंतर मात्र त्या लांब लांब गेल्या. माहेरच्या ओढीनी वर्षातून एकदा या त्या गावात यायच्या. तेव्हाच्या काळी तर काही फोनची सोय नव्हती ,पण आता फोन असल्यामुळे एकमेकींची तारीख विचारून त्या त्याच वेळेला माहेरी यायच्या .

आता प्रत्येकीची आई थकली होती पण तरी माहेरची ओढ कधी कमी होत असते का बाईच्या जातीची ?अशाप्रकारे यावेळेसही त्या आल्या. खरे तर आखाडीचा कार्यक्रम होता. जावयांना जेवण असतं पण मुली म्हटल्या “आम्ही आधी जातो मग तुम्ही या” .नवऱ्याने पण परवानगी दिली तशा चौघीजणी आल्या . “विठ्ठलवाडी” हे अगदीच डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटस गाव. या गावातल्या या माहेराशीनी लहान असताना ग्रामपंचायतीच्या शाळेत जायच्या. व पुढे जिल्हा परिषदेच्या शाळेत जायच्या.

सुट्टीच्या काळात काय करायचं? असा प्रश्न यांना कधी पडलाच नाही कारण दुपार पर्यंत सगळी कामे उरकून म्हणजे दुपारच्या वेळी या सगळ्याजणी काचा कवड्या खेळायच्या. एक चौकोनी मोठा पाट उलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती घर आखली जायची खडूने .प्रत्येक जन आपल्या आपल्या आवडीच्या रंगाच्या काचा घ्यायच्या आणि कवड्या असायच्या .अगदीच कवड्या नाही सापडल्या तर दोन चिंचोक्याचे चार तुकडे करायचे आणि त्या कवड्या म्हणून वापरायचे असा यांचा खेळ.

त्यातली मीरा अगदी साधी आणि स्वभावाने गरीब तिच्या घरची गरीब होती .पण तिच्यामध्ये जन्मत: समजदारपणा इतका असावा की तिने कुठल्याच गोष्टीचा कधी आई-वडिलांकडे हट्ट केला नाही .लहान भावांच्या शिक्षणासाठी तिने प्राधान्य दिलं जेमतेम सातवीचे शिक्षण घेतले आणि पुढे तालुक्याच्या गावाला जायला लागेल व त्यासाठी जाण्या येण्याचा खर्च लागेल असा विचार करून तिने शिक्षण थांबवले.

बाकीच्या सगळ्या कमीत कमी दहावी शिकल्या. त्यातली माधुरी होती ती तर अगदी बारावी पण झाली. आणि यथावकाश खेडेगाव असल्यामुळे या मुलींची लग्न अगदीच 18 व्या वर्षापर्यंत झाली. आजही अशा या जमल्या. चला काय करायचं म्हणून काचा कवड्या खेळू या म्हणत सगळ्यांनी तयारी दाखवली.काचा कवड्यांचा डाव रंगायला सुरुवात झाली. मीरा ने नेहमीप्रमाणेच आपल्या आवडत्या लाल रंगाच्या काचा घेतल्या ,तर कोणी काडीपेटीच्या काड्या घेतल्या तर कोणी हिरव्या रंगाच्या बांगड्याच्या काचा घेतल्या तर कोणी चार चिंचोके घेतले .अशा पद्धतीने चौघी बसल्या .

खेळायला सुरुवात झाली कोणाला दोन फासे पडायचे कोणाला तीन पडायची . कोणाची काच मधल्या घराच्या दिशेने जायची, तर कोणी एकमेकींच्या काचांना मारायचं आणि मग ती काच परत तिच्या घरात येऊन बसायची .मीराच्या बाबतीत हे पहिल्यापासूनच व्हायचं.मीराला आता बालपण आठवले.आयुष्याचा बराच काळ हा अशाच पद्धतीने गेला होता. कायम तडजोड ,कायम तडजोड .माहेरी असताना पण आणि सासरी असताना पण. खेळ खेळता खेळता तिच्या नजरेसमोरन सगळा तिच्या आयुष्याचा पट गेला .मीराचे वडील तसे शेतीत काम करायचे .

आई तर घर कामच करायची आणि घरात मीरा मीराची एक बहीण आणि दोन भाऊ असे मिळून हे चौघ मुलं. मीराचा नंबर तसा दोन नंबरचा पण मोठी माया ही थोडीशी हट्टी होती .पहिलच अपत्य असल्यामुळे तिचा बऱ्यापैकी लाड पण झाला होता. परिस्थितीनुसार आई-वडिलांनी तिचा लाड केला. नंतरची मीरा दुसरी मुलगी झाली म्हणून थोडीशी नकोशी वाटणारी, तर तिसरा महेंद्र आणि चौथा मंगेश. मीरा नंतर दोन्ही मुले झाली म्हणून दोन्ही मुलांचेही लाड झाले .पहिली मुलगी म्हणून मायाचे लाड झाले .जे काय जबाबदारीचे काम असेल ते मीराच्या वाटेला यायचं.

माया तशी दिसायला खूप देखणी होती ,त्यामुळे ती सातवी झाली आणि तिने शिवण क्लास कर, मेहंदीचा क्लास लाव असं काम करायला सुरुवात केली .पण हे सगळं मीराच्या जीवावरती. मीराची सातवी झाली ती पुढे तालुक्याच्या गावाला वडिलांच्या परिस्थितीमुळे जाऊ शकली नाही.मुलांची जात आहे म्हंटल्यावर त्यांनी शिकले पाहिजे म्हणून मुले मात्र तालुक्याच्या गावाला जाऊन शिकत होती. आणि त्यासाठी आई-वडील दोघेही प्रयास करत होते .मीरालाही वाटायचं उद्या आपलं लग्न होऊन आपण परक्याच्या घरी जाणार ,जर आपल्या भावांचे शिक्षण चांगले झाले तर आपल्या आई-वडिलांची परिस्थिती सुधारणार .

असं होता दोघी मुली वयात आल्या .आणि मायाला एक स्थळ आलं बागातदार असणारे .घरची प्रचंड श्रीमंती गाई गुरडोर असं सगळं असणारे .मायाच्या देखण्या रूपाकडे बघून त्या लोकांनी होकार दिला आणि मायाचे लग्न करून घेतले.आई-वडिलांची तेवढीच जबाबदारी कमी झाली. आता नंबर होता मीराचा, सावळे रूप होते पण साजिर होते.तिचा स्वभाव अतिशय सुंदर होता .आई-वडिलांना जास्त खर्च नको ,आपल्या बहिणीचा चांगले झालंय याचा तिला खरंच आनंद होता.

त्यामुळे जेव्हा मीराला स्थळ आलं त्यावेळेस तिने सर्वसामान्य घरातल्या असलेल्या प्रमोदची लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्थळ आलं त्यावेळेस अक्षरशः मीराच्या गळ्यात फक्त काळेमणी आणि त्यातच दोन सोन्याचे मनी टाकून त्या लोकांनी मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घातले .पण मीराच्या नवऱ्याचा स्वभाव अतिशय छान होता .रूप काहीच नव्हतं पण व्यक्ती दिलदार होती .त्यांनी मीराला हसत हसत स्वीकारलं. मीराच्या माहेरी मात्र मीराचे जे काही दिवस होते ते बऱ्यापैकी तडजोडीतच गेले दोन्ही भावांचे शिक्षण वडिलांना करायचे असल्यामुळे मीराचं तसं काहीच हट्ट पुरवला गेला नव्हता .

पडेल ते ते काम करत होती .माया ला स्थळ चांगलं मिळाल्यामुळे माया जेव्हा यायची त्यावेळेस तिची उठ बस व्हायची तिच्या नवऱ्याची उठबस करावी लागायची आणि आई-वडिलांना कर्ज काढून तिचे सण साजरे करायला लागायचे व त्यासाठी कर्ज ही काढावे लागायचे.कारण ते श्रीमंत लोक होती आणि मायालाही मग त्या गोष्टीची हाव वाटत होती की आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी करावं. पण तिला ही जाणीव कधीच नव्हती की आपल्यापेक्षा लहान बहीण आहे तिचंही अजून सगळं व्हायचंय तर आपण एवढा हट्ट करणे बर आहे का?

याही बाबतीत मीरानी खूप समजदारपणा दाखवला की ,”ठीक आहे ताई साठी तुम्ही करताय ना केलंच पाहिजे तिला चांगलच घर मिळाले त्यांची मने जपलीच पाहिजे “.ह्या गोष्टीवरती ठाम होती .आई-वडिलांना धीर देत होती .शिवण क्लास केल्यामुळे आजूबाजूच्या बायकांचे ब्लाऊज शिवायला घ्यायची आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच आईला घर खर्चायला पैसे द्यायची.जेव्हा मीराचं लग्न झालं त्यावेळेस मीराचा नवरा ही ग्रामसेवक म्हणून काम करत होता तर सासू-सासरे शेतात काम करायचे .घरी दोन दीर ,जावा त्यांची मुले असे एकत्र कुटुंब होते .त्यामुळे शेण काढणे, दूध काढणे, गोठ्यात गाईगुरांना आंघोळ घालणे ही सगळी काम मीरा आनंदाने करत होती .

मीरानी कधीच तिच्या भावना व्यक्त नाही केल्या .तिला काय आवडतं ,तिला काय हवय नकोय आणि आई-वडिलांनी या संसाराच्या जबाबदारीतून तिचं मत कधीच विचारात नाही घेतलं, तिच्या भावना कधीच विचारात नाही घेतल्या. या गोष्टीचे मीरा ने कधी वाईट वाटून नाही घेतले. मात्र दरवर्षी आपल्या मैत्रिणींना भेटायला म्हणा आई-वडिलांना भेटायला म्हणा मीरा यायची ,आणि मग त्यावेळेस या चौघींनी ठरवले तसे या भेटल्या.अतिशय छान गप्पा रंगत होत्या. माया चे तसे नव्हते.ती एकच दिवस येणार आणि सगळी हौस करून घेऊन जाणार .कारण त्या श्रीमंती पुढे आता तिला ही गरीबी अगदीच नकोशी वाटायला लागली होती.

त्यामुळे आई-वडिलांचे घर हे तिच्यासाठी घर नसून एक छोटेखाली झोपडच वाटत होतं. मीरा मात्र अगदी हौसेनी यायची आई वडिलांसाठी काहीतरी करून आणायची, भावांसाठी काहीतरी आणायची .जाताना त्यांना कपडे वगैरे घ्यायची. आपल्या परिस्थितीनुसार, ऐपतीनुसार ती सगळं करत होती .सारीपाटाच्या डावात तरी काय जेव्हा दुसरे कोणी पुढे जाते आणि आपल्याला मारते तर आपण मुकाट्यांना आपल्या आपल्या जागी येऊन बसायचं असतं आणि मागच्या लोकांना पुढे जाऊ द्यायचं .

हाच तर डाव असतो आणि अगदी हाता तोंडाला हात आलेला डावावरून आपण परत आपल्या मूळ जागी कसे येऊन बसतो तसं मीराचा झालं होतं. बऱ्याच वेळा तिला खूप छान छान गोष्टी करायला इच्छा व्हायची पण परिस्थितीमुळे तिने कायम माघार घेतली आणि ती तिच्या मूळ पदावरच परत येऊन बसत होती. हातातून संधी गेल्याचे दुःख अतिशय वाईट असतं .हा तर खेळ होता सारीपाटाचा ,काचा कवड्यांचा. मधल्या घरात कोणाच्या चारही काचा आधी जातील ती जिंकली जाईल . अशा पद्धतीने आत्ताही चौघींनी डाव मांडला खरा, पण नेहमीप्रमाणेच मीरा हरली .पण त्या हरण्यात सुद्धा एक मजा होती असं तिला आता कळलं .

कारण या खेळाणीच तिला आयुष्याचा गाभा शिकवलेला होता. किती छान आहेत ना हे काही खेळ तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडित आहेत असं वाटतात.आता उद्या गावाला जायचं म्हणून आज चौघी मैत्रिणी एकत्र बसल्या. तिघींनी मीराची चौकशी केली मीराचा सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्या मनाला खरंच वाईट वाटलं की अरे सुख हा शब्द तुझ्या आयुष्यात आहे की नाही? पण मीरा आनंदी होती. म्हणाली ,”म्हणजे काय? मला इतकं छान घर मिळाले, एवढी सारी माणसं माझ्या अवतीभवती आहेत फरक एवढाच आहे की मला काम जास्त करायला लागतं.

मुलांच्या संगोपनामध्ये माझ्या थोड्याशा इच्छा आकांक्षा मागे पडतात इतकच .पण आता मुलं मोठी झाली ,ती त्यांच्या पायावर उभी राहिली की माझं पुन्हा आयुष्य खूप छान सुरळीतपणे पार पडेल “.उरलेल्या तिघींना वाटलं किती हा समजदारपणा ,हा एवढा समंजसपणा मीरामध्ये कुठून आला ?तर तसं नसतं परिस्थितीची जाण ही प्रत्येक मुलांमध्ये सारखी नसते. हाताची पाचही बोटे वेगळी असतात. मीराचे बहिण भाऊ स्वभावाने खूप वेगळे होते .त्यांच्या गरजा त्यांना पूर्ण व्हाव्यात यासाठी आई-वडिलांकडे केलेला हट्ट मीराला कधीही करावासा वाटला नाही, कारण जे आहे ते खूप छान आहे मी त्यात समाधानी आहे ही तिची वृत्ती तिला बळ देत होती.

डाव संपला आणि माधुरीची आई म्हंटली “चला आता मुलींनो मी सगळ्यांना चहा करते” त्यांनी चहा केला. मस्त आखाड महिना होता ,चहा बरोबर कापण्या दिल्या आणि ह्या चौघींची पण आईने ओटी भरली. गावाकडच्या रितीभातीच खरच वेगळ्या होत्या .वर्षांनुवर्ष मुली माहेरी आल्या तरी ते माहेरपण जतन केलं जायचं .किती आई थकली तरी तुझी लेक काय माझी लेक काय म्हणून एकमेकींना तेवढेच भरभरून प्रेम देत होत्या.आणि अशा पद्धतीने हा सारीपाटाचा डाव आयुष्यात प्रत्येक वर्षी त्या खेळत होत्या आणि प्रत्येक वेळेस मीरा हरत होती.

पण आता तिघींनी ठरवलं की पुढच्या वेळेस जेव्हा मीरा येईल ना त्यावेळेस आपण तिघींनी अशी काही रचना करायची की मीरा जिंकली पाहिजे .आणि तिथून पुढे तिचा आत्मविश्वास खरंच छान होणार होता .अशा पद्धतीने ह्या मैत्रीची गोष्ट या डावाबरोबरच सुफळ संपूर्ण झालेली आहे.

1 thought on “सारिपाट | Game”

  1. किती सुंदर कथा ताई… स्त्री चे अंतरंग उलगडून दाखवणारा… संसाराचा सारीपाट सर्व शिकवतो… सुख दुःख ची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार.. सगळंच गणित… म्हटल तर सोपं.. नाही तर कधीच न सोडवता येणारं..

    Reply

Leave a Comment