देवाने समस्त महिला वर्गाला एक सुगंधी कुपी भेट म्हणून दिलेली आहे. (Sugandhi Kupi)”बाई तू चार दिवस बाजूलाच बस”आज्जीने फर्मान काढले आणि वंदना एकदम गोंधळली.”
अग आज्जी पण का असं”? मला शाळेत जायचय. आणि हे काय असे? एक तर हे सकाळी सकाळी असे काय झाले?”वंदना आता चांगलीच वैतागली.नववीत शिकणारी वंदना तशी एकदम छान दिसत होती. बाल सुलभ अवस्थेतून एका तारुण्य नामक कोषात ती आता गुरफटणार होती. आणि आईला आणि आज्जीला तिची काळजी वाटत होती. आताशा तिचे नटने मुरडणे वाढले होते. पण हे वय आहे असं समजून त्या तिला कधी समजून तर कधी रागावून कसे वागायचे ते सांगत होत्या.आणि आज तो दिवस उजाडला.झोपेतून उठल्या उठल्याच वंदना ने आईला ती गोष्ट सांगितली.
खरे तर आई ,आज्जी ला एका गोष्टीचे समाधान होते की योग्य वयात पोर शहाणी झाली पण त्याच बरोबर आता जास्त कटाक्ष ठेवून लक्ष द्यावे लागणार याची दोघींना काळजी वाटायला लागली. आईने सगळे समजून सांगितले पण आज्जी मात्र जुन्या पिढीची “तिला चार दिवस एका कोपऱ्यात बसू दे. इकडे तिकडे हात लावू देऊ नको. देवाच्या बाजूला जाऊ देऊ नको “वगैरे सूचना सुरू झाल्या.वंदना पण या गोष्टींनी वैतागली. खरं तर बाईच्या जातीला हे असे काही असते या विचारानेच ती घाबरली आणि गोंधळली होती.शहरा इतके ते गावं काही एवढे पुढारलेले नव्हते.
त्यामुळे मासिक धर्म या विषयावर फारसे कोणी मोकळेपणाने बोलत नव्हते. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलींना अर्धवट माहिती मिळायची आणि त्या अजूनच गोंधळून जायच्या तसेच काहीसे वंदना चे झाले.”तिला दोन दिवस शाळेत पाठवू नको “आज्जीने जरा खड्या स्वरात म्हटले. तशी आईही हो म्हटली. आता वंदना रडायचीच बाकी होती .तसे तर रोज गोडधोड करून तिला ताट वाटी केली जायची…. चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ घालुन त्या दिवशी तिची आईने ओटी भरली.
नवी साडी नेसायला सांगीतले होते. साडीत वंदना चे रूप अगदी दृष्ट लागण्या जोगे दिसत होते….एक पूर्ण स्त्री म्हणुन आता तिची ओळख झाली होती.आईचे दर महिन्याला तारखे कडे लक्ष असायचे तर आज्जी सणवार आणि हिची तारीख यांचे ताळमेळ बघत असायची.बघता बघता वंदना कॉलेज मध्ये जायला लागली. हळु हळु तिच्यावर बाजूला बसायची सक्ती कमी झाली.. त्यामुळे ती आता जरा बिनधास्त आणि तिला आवडणाऱ्या पेहरावात वावरू लागली.
शिक्षण संपले आणि तिला जॉब लागला.आता घरात लग्नाचे वारे घुमू लागले. होता होता सहा महिने गेले आणि महेश चे स्थळ तिला आले. अर्थात दोघेही सर्व्हिस करणारे असल्यामुळें विचारांची दिशा होती. दोघे एकमेकांशी बोलले आणि पसंती झाली. वंदनाच्यासा लग्नाला दोन वर्ष झाली आणि ती गोड बातमी तिने दिली. ज्या कूपी तून होणाऱ्या स्त्रावाला ती कंटाळली होती आज त्याच कुपीत एक बीज रुजले होते. ती गोड बातमी तिने आईला सांगितली आणि आई ने आज्जी ला. दोघींना खूप आनंद झाला. डोहाळे पुरवणे, तब्येतीची काळजी घेणे अशा सूचना तिला मिळू लागल्या.
आता सातव्या महिन्यात डोहाळे जेवण करून वंदना बाळंतपण करण्यासाठी माहेरी आली. खरे तर ज्या दिवशी ती शहाणी झाली त्या दिवसापासून आजीने आणि आई ने तिला या कुपीचे महत्व सांगितले होते आणि तिची कशी काळजी घ्यायची हे पण सांगितले होते. त्यामुळे ती ही या बाबतीत खूप सजग होती.बरोबर नऊ महिने नऊ दिवसांनी एका गोंडस मुलाला वंदना ने जन्म दिला. सगळयांना आनंद झाला म्हणून त्याचे नाव ही आनंद ठेवण्यात आले त्या नंतर तिन वर्षांनी एक कन्या झाली आणि तिचे नावं तेजश्री ठेवण्यात आले मात्र या वेळी आजी नव्हती कारण तिने या जगाचा निरोप घेतला होता.बघता बघता आता तेजश्रीचं ही लग्न झाले आणि वंदनाची रजोनिवृत्ती सुरु झाली आताशा तिला खूप त्रास होत होता.
खूप रक्तस्त्राव होऊन अशक्तपणा आला होता. खूप तपासण्या झाल्या नंतर डॉक्टरांनी सांगितले गर्भ पिशवी काढावी लागेल त्या क्षणी वंदनाला खूप वाईट वाटले. एवढी वर्ष जतन केलेली ही कुपि जीने दोन जीवांना जन्म दिला तिला आता शरीरा पासून लांब करायचे तिला खूप वाईट वाटत होते. पण शेवटी डॉक्टर सांगतील तसेच करायचे या निर्णयावर एकमत झाले. आणि ऑपरेशन चा दिवस ठरला.वंदना जेव्हा शुध्दी वर आली तेव्हा एका ट्रे मध्ये ती कुपी तिला दाखवण्यासाठी ठेवण्यात आली होती.
तिने ती पाहिले.. तिला खूप वाईट वाटले आणि वयाच्या चौदाव्या वर्षापासून आता पन्नास वर्षाची होई पर्यंत त्या कुपीची काळजी वंदना ने घेतली होती आणि वंदना चे चैतन्य कायम रहावे म्हणुन या कुपिने तिची काळजी घेतली होती पण आताशा त्या कुपिची कार्यक्षमता बिघडली आणि त्याचा त्रास वंदनाला होऊ लागला होता आणि आज खऱ्या अर्थाने त्या एकमेकीपासून वेगळया झाल्या होत्या कायम स्वरुपी. वंदना ने मनातल्या मनात त्या सुगंधी कुपीचे आभार मानले आणि तिथून ती रुम मध्ये शिफ्ट झाली तिच्या शिवाय.