श्रावणी शुक्रवार |Shrawan Friday

श्रावणी शुक्रवार……(Shrawan Friday )”मेघना अग लवकर आवर आज लखन चे औक्षण करायचे आहे ना?श्रावणातला पहीला शुक्रवार आहे “”हो आई आहे माझ्या लक्षात , तो खेळून आला की तोंड हातपाय धुवायला सांगते आणि मग औक्षण करते.

तयारी करून ठेवली आहे “बेबी ताई हॉल मध्ये बसून मेघनाला सांगत होत्या.मूलांना कितीही इंग्रजी शाळेत घातले तरी आपले संस्कार विसरायचे नाही ही शिकवण बेबी ताईंनी पहिल्या पासून जपली आणि पुढच्या पिढीनेही ती जपली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा.विचार करता करता बेबी ताई भूतकाळात गेल्या.

खरे तर बेबी ताईंच्या पतींचे सोळा वर्षा पूर्वीच निधन झाले. राव साहेबांचे बेबी ताईंशी झालेले हे दुसरे लग्न. रावसाहेबांच्या प्रथम पत्नीचे निधन झाले तेव्हा शंतनु दिड वर्षाचा होता. त्याला आईची माया मिळावी म्हणून त्यांनी घरच्यांच्या आग्रहाखातर दुसरा विवाह केला.बेबी ताईंच्या माहेरची परिस्थीती खूप नाजूक होती. आणि या पाच मुली होत्या. त्यात बेबी ताई पाच नंबरच्या. मोठ्या बहिणींची लग्ने कशी तरी पार पडली आणि बेबी ताईंचे वडील गेले.

बेबी ताई आणि त्यांच्या पेक्षा मोठी बहीण लग्नाची राहीली होती. दोघींनी आईला घरकाम करायला मदत करून परिस्थीती सावरली पण यात दोघींचे वय वाढत होते. चार नंबर ची बहीण म्हंटली ,”बेबी मी लग्न नाही करणारं , मी आणि आई राहू तू लग्न कर, कारण तुला माहिती आहे माझा प्रॉब्लेम”यमी म्हणजेच बेबिताईंची बहीण हिला मासिक धर्म येतच नव्हता, त्यामुळे तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.बेबी ताईंच्या दोन नंबर बहिणीच्या सासऱ्यांनी राव साहेबांचे स्थळ आणले. खरे तर बेबी ताईंचे असे काहीच झाले नव्हते पण परिस्थीती समजून घेऊन त्या लग्नाला तयार झाल्या.

आईपण अनुभवायच्या आधीच त्या शंतनु ची आई म्हणून त्या घरात आल्या. अतिशय प्रेमाने त्यांनी शंतनुला जीव लावला. रावसाहेबांना आपण घेतलेला निर्णय योग्य होता याचा आनंद झाला.एके दिवशी बेबी ताईंना त्यांच्या नणंद बाई म्हंटल्या,”वहिनी तुम्हालाही आई व्हायची इच्छा असेल तर नक्की विचार करा” बेबी ताई हसल्या, म्हणाल्या “नऊ महिने डोहाळे पुरवून घ्यायचे म्हणजे आईपण नाही, पुढे जाऊन दोन्ही मुलांच्या असंख्य प्रश्नांना आम्हाला सामोरे जावे लागेल. त्यापेक्षा शंतनु ला मी प्रेमाने वाढवेल “. त्यांच्या नणंद बाईंच्या डोळयात पाणी आले आणि किती भाग्यवान आहोत की अशी वहिनी लाभली असे म्हणून त्यांनी देवाला हात जोडले.

शंतनु मोठा होत होता. त्याचे बालहट्ट पुरवताना बेबी ताईंची दमछाक व्हायची पण धार्मिक संस्कार द्यायला त्या कुठे कमी पडल्या नाहीत.वेळप्रसंगी हक्काने त्यांनी आईपण गाजवले ही पण त्याचा त्रास ना शंतनुला झाला ना राव साहेबाना. अगदी रात्री आईच्या कुशीत शिरून झोपणार म्हणजे झोपणार.तोच शंतनु मोठा झाला. आता त्याला सत्य सांगणे गरजेचे होते. म्हणून त्याच्या आत्या ने पुढाकार घेऊन ही गोष्ट हाताळली.

शंतनुला खरे नव्हते वाटत पण तेच सत्य होते.त्याने जेवढे ऐकले होते सावत्र आई बद्दल त्याच्या एक टक्का एवढेही बेबी ताई कधी वागल्या नव्हत्या. तो त्यांच्या कुशीत शिरून खूप रडला आणि बेबी ताईही.आता शंतनु छान नोकरीला लागला. शहरात छान फ्लॅट घेतला. बेबी ताईंना घेऊन तो शहरात आला. आईच्या हातचे जेवण म्हणजे त्याच्या साठी अमृत होते.बघता बघता शंतनु चे लग्नाचे वय झाले आणि मेघनाचे स्थळ आले. शंतनु ने एकच सांगितले आई मुलगी कितीही शिकलेली असू दे पण तिच्यावर तुझ्यासारखे संस्कार झालेले असावे.

मेघना ही अगदी तशीच होती . उलट तिच्या माहेरचे सगळे म्हणायचे अशी सासू मिळायला भाग्य लागते. आणि मेघना बरोबर शंतनु चे लग्न झाले. दीड वर्षांत” लखन “च्या रूपात त्यांच्या संसार रुपी वेलीवर फुल उमलले. बघता बघता लखन ही पाच वर्षाचा झाला. पण मेघनाला बेबी ताईंनी असे तयार केले होते की आता देवाचे कधीही आमंत्रण आले तरी त्या जायला तयार होत्या.”आई आज्जी मी आलो ग ” लखन ने आवाज दिला आणि त्या भानावर आल्या.

त्यांनी डोळे पुसले. त्या म्हंटल्या पाटावर बस आई छान औक्षण करेल. मेघनाने छान साडी नेसली होती. ती म्हंटली,”आई तुम्ही करा आधी औक्षण”त्यावर बेबी ताई म्हटल्या ,”मी तर शंतनु चे करतच आले आता तू कर पहिल्यांदा मग मी करते “मेघना ने औक्षण करुन ताम्हण बेबी ताईंच्या हातात दिले. बेबी ताईंनी औक्षण केले आणि लखन ची छान पपी घेतली.त्या म्हंटल्या चल आता मी पुरण पोळी करायला घेते, तू भजी कर म्हणजे शेजारच्या शालू ताई जेवायला येतील. त्यांची ओटी भर सवाष्ण म्हणुन.”मेघनाने मान हलवली आणि दोघी स्वयंपाक घरात गेल्या.

Leave a Comment