“ए हौशे आग ति शेपूरडी सुटली बग तुपली…. मुडदा बशिवला तिचा एकदाचा… पाळाया येत नाही तर कायाला पाळता ग. (Dream)बाहेरून कांतीचा आवाज ऐकून हौशी लगबगीन पळतच बाहेर आली.
“बया कांताक्का आताच आवळून बांधली हुती चऱ्हाट तोडलं तीन…हौशी गयावया करत कांताला म्हणली.
“दररोजचं नाटक हाय बाय तुझं. घेतलं सगळं बाजरीच शेंड खुडून काय करायच तूच सांग “ कांताक्का खूप रागात होती.पुण्यादा नायं होणार कांताक्का हौशी गयावया करत म्हणाली. हौशीन शेळीला धरून सपरात आणली आणि आवळून बांधली. “सपने ऊठ ना माय आता कवर झोपती. भीतीच्या कडला झोपलेल्या सपनिला हौशी म्हणाली.
“आयवं झोपूदे ना रातच्याला लई चावत हुत कायतरी. सपनि पायाला खाजवीतच म्हणाली. आजच्याला निरगुडीच्या पाल्या चा धूर करू बाय मंग नाय चावायचं.
“आई कोंबिडीला पिल्लं कधी होणार ग? सपनि बसवलेल्या कोंबडीच डाल उचकीत म्हणाली?” सपने हात नग लावूस कोंबडी चावलं तुला”. हौशी ओरडतच सपनि ला म्हणाली.
“अजून लय टाईम लागणार आहे. कोंबडीलाच लय व्हपा झाल्यात जणू. तशी कोंबडी वसकन सपनिच्या अंगावर आली. आयवं… सपनि मागे सरली.
लांब सडक काळेभोर कुरळे केस, गोरा पान रंग, सरळ नाक सहा वर्षाची सपनि खूपच गोड होती दिसायला. एका छोट्याशा झोपडीत सपनि आणि हौशी दोघीच राहत होत्या.मागल्या वर्षी भाऊ भाऊ वेगळे झाले होते. एक एकर जमीन असल्यामुळे दोघांना अर्धा अर्धा एकर वाट्याला आली.
राहतं घर बारक्या भावाला गेल.रंगाला आणि हौशीला गुरांच सपार वाट्याला आल होत. कर्ज फेडण्यासाठी सगळी जनावर ईकुन सपरात एक गाई आणि एक शेळी तेव्हडी राहिली हुती. हौशीन सपरातच एका कोपऱ्यात चूल मांडून संसाराला सुरुवात केली होती.यगळ निघाल्यावर अर्धा एकर मध्ये आपलं भागणार नाही. म्हणून हामाली काम करायला रंग्या एका मित्राकडे मुंबईला गेला.
चार-पाच महिन्यातून एकदा यायचा. थोडं फार पैस अडक हौशीकडं द्यायचा दोन दिवस राहायचा आणि निघून जायचा.हौशी लोकांच्या मोलमजुऱ्या करायची.कधीतरी आपलं स्वतःचं घर बांधू या आशेने हौशी आणि रंगा दिस ढकलत होते.सकाळी घरातल लवकर आवरून हौशी रमाताईंकडे शेणकूर करायला पण जायची. रमाताई म्हणजे गावाची पाटलीन बाई हौशीला आणि सपनि ला खूप जीव लावायची.
“सपने उरक ना बाय माझे चा आणि रातीची भाकर हाय चुरून खा चा मधी तवर मी येती रमा ताई कडून” आणि बादलीत गरम पाणी वतून ठेवल हाय आंघुळ करून घे.गाईला बाहेर बंधित हौशी म्हणाली.
“आयवं गुरुजींनी पैस मागितलं हाय “ सपने एकदम दबक्या आवाजात भीत भीतच हौशीला म्हणाली.व्हय बया दीन मी आल्यावर उरक तू मी जाऊन यीती तवर.सपरा बाहेर गाई बांधून हौशी गेली. पितळीत ओतून ठेवलेल्या चहा मधी भाकर चुरीत सपनी गपागपा खाऊ लागली.
“सपने चल की दुकानात मपल्या संग “ बाहेरून आवाज आला. सपनीची चुलत बहिण तेजी आवाज देत होती.नग बया मला आवरायचंय साळत जायला उशीर व्हइन. तेजी हातपाय आपटतच निघून गेली.सपनि न चहाच भगुलं पितळ्या गाळणी बाहेर आणून चिमुकल्या हातांनी अगदी लख्ख केलं. आणि घरात आणून फळकुटावर पालथ घातलं.
कोपऱ्यात पडलेला झाडू घेऊन चुलीपुढं झाडून घेतलं.सपराच्या बाहेर गोणपाट गोल गुंडाळून एक न्हानी केली हुती सपनी साळंची कापडं घेऊन न्हाणीत अंघोळीला गेली.भडाभडा अंगावर पाणी ओतून. कापड घालून हौशीची वाट बघत ती अभ्यास करत बसली.सपनी अभ्यासात हुशारच होती पहिलीत होती पण तिला सगळे वाचता लिहिता येत होते.
“हौसा उशीर केलास ग आज. रमाताई म्हणजेच पाटलीन बाई बाहेर येत हौसाला म्हटल्या. अख्या गावात रमाताई एकट्याच होत्या की त्या हौशी न म्हणता हौसा म्हणायच्या.“ घरच थोडसं काम उरकायला उशीर झाला ताईसाहेब.”शेणाचं घमेल कोपऱ्यातून उचलतच हौसा म्हणाली”आणि सपनीला ला कुठे ठेवलंस ग हौसा”. रमाताईंनी विचारलं.
अभ्यास करती ती …. रातभर डोळ्याला डोळा नाय लई व्हपा झाल्यात सगळं अंग लाल झालं य तीच हौसा शेन उचलत म्हणाली.”बया हौसा बारीक हाय ग लेकरू घरात कांयला कोंबडी बसवली बाहेर एखादं बारीक खुपार्ड करून बसवायचं नाय व्हय ग.
“रमा “ आतून आवाज आला.आले सासूबाईं असं म्हणत हौशीला खुणावत पाच रुपयाचा ठोकळा तिने दावनीच्या बाजूला ठेवला आणि आत निघून गेली. रमाताई जरी पाटलीन बाई असल्या तरी सगळी सूत्र रमाताईंच्या सासूबाई म्हणजेच भागीरथी ताई सांभाळत होत्या. भागीरथी ताई खूप तरुणपणीच विधवा झाल्या होत्या.
“रमा काय चालंय तुझं””कुठं काय सासूबाई” रमा एकदम घाबरतच म्हणाली.आम्हाला काही कळत नाही असं समजू नको. रमाच्या काळजात एकदम धस्स झालं.
क्रमश…..
Chhan
खूप छान ताई,…