सपान |Dream part 13

“मपल्या बाबा ला काऊन जाळू रायले भाजन ना त्याला “सपनी जोरजोरात रडत सरनाकडं पळतं होती रमाने तिला घट्ट पकडून ठेवले होते.(Dream)

आपल्या मैत्रिणीची अवस्था तिला बघवत नव्हती. हौसाच्या हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या.कपाळावरच कुंकू पुसण्यात आलं. हौसाला कशाचीच शुद्ध नव्हती. तिला नक्की काय चालंय तेच कळेना.

आत्या जोरजोरात रडत होती. स्वतःच्या मुलाला अग्निडाग देताना पाहणे यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते. हौसाचे आईवडील भाऊ आले होते. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांची मुलगी विधवा झाली होती. पोट पीळवटून निघत होते त्यांचे मुलीची ही अवस्था पाहून.

काय करावं दुःख तर वाटून घेऊ पण पोरीचं पुढं कसं होणार याची काळजी त्यांना वाटत होती.सगळं उरके पर्यंत पहाट व्हायला आली. सगळी आपापल्या घरी गेली हौसाच्या घरात आता आत्या, कमळी,तिचे आईवडील भाऊ आणि भागीरथी ताई होत्या. सपनीला रमा वाड्यावर घेऊन गेली होती. हौसा एका कोपऱ्यात पडली होती.

“काशे आणि कमळे जा बर थोडं आंग टाका खाली. “ भागीरथी ताईं म्हणाल्या.“तुमच्या पोरीला तुमच्या घरी घेऊन जा परत असली आवदसा मपल्या दारात नको” आत्या एकदम रागात हौसाच्या आईकड बघत म्हणाल्या.

“काशे ही येळ हाय का हे समदं बोलायची आणि याच्यात हौसाची काय चूक हाय ग तिला वाटत व्हत का असलं व्हावा म्हणून. कायाला चार चौघात असलं वाईट वांगाळ बोलती. “भागीरथी ताई आत्याला समजावत होत्या. हौसाची आई एकदम घाबरली. विहीन आस कां बोलत आहेत तेच त्यांना कळेना.

त्यांना फक्त एवढेच कळले आपल्या पोरीचा आता इथं टिकाव नाही. हौसा एकदम कोमात गेल्यासारखी छताकड बघत होती. हायपाय एकदम स्थिर. भागीरथी ताईंनी कमळीला खुणावलं तशी ती आत्या च्या हाताला धरून बाहेर गेली.

“ताई तुमी बी पडा वाईच “ हौसाची आई भागीरथी ताईंना म्हणाली. सगळ्यांनी जमिनीवर ती तसंच अंग टाकल. झोप तर कुणालाच येत नव्हती.कोंबडा आरवला तशी हौसा ताडकन उठली आणि बाहेर आली. रात्री टाकलेली फुल पाचोळा वट्यावर पडला होता. तीन शेळी सोडली लांब नेऊन बांधली आणि वटा झाडाया लागली.

“हौसा बाय माये काय करू रायली बाय….आज वटा नाय झाडावा.” हौसाची आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि तिला हाताला धरून घरात आणू लागली.

“आयवं काय केलंत ग म्या कोणाचं वाईट कधी चितल नाय मंग मपल्या संग कां झालं आस. काय करू म्या आता कस जगू सपनीला काय सांगू “ हौसा आईच्या गळ्यात पडत मोठ्या मोठ्याने रडू लागली.“

आस कायाला म्हणू रायली तू बाय….आमी नाय कां तुला पोर हाईस तू आमची तुला घर नाय कां आपलं जस सुधीर च घर तस तुपल पण हाय आशी परक्यासारखी का बोलू राहिली “ तिच्या आवाजाने सगळेजण उठले. हौसाच्या बापाला हौसाच्या तोंडाकडे पाहायची हिंमत होत नव्हती.

आपण आपल्या हाताने पोरीचं वाटोळ केलं असा अपराधीपणाचा भाव त्यांच्या मनात होता. “ताई आजपासून आपण दोघ जीवाला जीव देऊआणि तू सपनाची काय बी काळजी करू नग. तिचा मामा तिला खम्बिर हाय” सुधीर हाऊसचा हातात हात पकडून तिला समजाऊ लागला.

सकाळचे आठ वाजले स्मशानभूमीत जाऊन सगळेजण सावडून आले. हौसाला आंघोळ घालण्यात आली. शेजारच्या आयाबाया भाकरी घेऊन आल्या. भागीरथी ताई तशाच त्यांच्या घरी गेल्या. रात्रीपासून त्याही खूप ताठून न गेल्या होत्या. त्यांनी रमाला भाकरी घेऊन परत पाठवले.

रमा सपनी ला घेऊन आली. सुधीरने लांबूनच रमाला येताना पाहिले. तसा तो पुढे आडवा गेला आणि सपनी चा हात पकडून तिला तिथेच थांबवले. हौसा पार गळून गेली होती. ती भाकर सुद्धा खाईना. काय करू मी आता कोणाच्या भरवशावर इथ राहू. माहेरी जाणं तिला पटनार नव्हत. आता सपनीची काळजी वाटत होती.

रंगाच आणि हौसाचं खूप मोठं स्वप्न होतं. सपनी ला खूप शिकवायचं मोठं करायचं. काय…काय चुकलं माझं देवा कधी कुणाच्या अध्यात्त ना मध्यात कां आस मरान द्याव…..इतकं हाल करून…किती तरास झाला आसन? किती अंग पाखडल् आसन? किती दुखलं आसन? जीव जाताना मला काय सांगायचं आसन कां? सपनीला पाहावा आस वाटलं आसन का?

असे अनेक प्रश्न तिला स्वस्थ बसून देत नव्हते. रंगा त्याच्या वाटेने गेला. पण वेदना मात्र हौसाला होत होत्या. किती संसार असावा 7-8 वर्षाचा? कस आयुष्य काढायचं आता ज्याच्यासाठी आई बापाचं घर सोडून आले तोच नाही राहिला. काय करायचं कस जगायचं.

क्रमश….

Leave a Comment