रात्रीच्या अंधारात जुन्या आठवणींचे चांदणे चमकते….
छोटीशी झोपडी आपली त्यात लख्ख उजळून निघते.
काहीच नव्हते आपल्याकडे पण आनंदाची कमी नव्हती… तुझी ती अलगद मारलेली मिठी स्वर्गापेक्षा कमी नव्हती…
रात्रंदिवस कष्ट करणारा तू…. आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आसुसलेली मी…
कळ्या कुट्ट अंधारात हरवलेली मी….. आणि कंदील हातात घेऊन उभा असलेला तू….
एकमेकांना वाट दाखवत काट्यांची ही फुले होत होती…. एकमेकांच्या सोबतीत कशाचीच कमी नव्हती.
आता इतके पुढे आल्यावर मागे वळून पाहिले…. काट्यांची झालेली फुले अजूनही ताजीच होती.
नकळत हात तुझ्या कडक झालेल्या हातात गुंफला… आणि आपल्या जुन्या आठवणींचा बांध फुटला.
तक्रार माझी एकच आहे तू तक्रार कधी केली नाहीस….. माझ्या पायाखाली फुले टाकताना…. तुझ्या पायात बोचणारे काटे तू कधी काढले नाहीस.
अजूनही आपल्या झोपडीवर चांदण्यांची गर्दी होते….. आणि तू अलगद मारलेली मिठी अजूनच घट्ट होते.
@ सीमाशंकर.