आणि बुद्ध हसला |Buddha

“शांती सदन “आज या वास्तूच्या सर्वेसर्वा शांता दुर्गे ताईंचा अमृत महोत्सवी वर्ष पूर्ततेचा सोहळा आयोजित केला होता. शांता बाई गौतम बुद्धांना(Buddha) खूप मानत असे.शांता बाईंचे दोन सुपुत्र, दोन स्नुषा, दोन विवाहित नातवंडे आणि दोन विवाहीत नाती अशी सगळ्यांची गडबड सुरु होती. आणि सगळीकडे आनंदी वातावरण होते.

शांता ताई म्हणजे अगदीच शांत, संयमी व्यक्तिमत्त्व. लहानपणी इतिहासात गौतम बुद्धांचा धडा इतिहासात वाचला होता आणि त्यांच्या एकंदरीतच विचारांच्या प्रेमात शांता बाई पडल्या. खरे तर लहानपणीच आई वडील गेले होते. काका काकूंकडे रहाताना शांता बाईंनी खूप काही सहन केले होते. पण जसजशा त्या बुद्धांना जाणू लागल्या तसतसे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आणि प्रेमही.

परिस्थितीशी दोन हात करताना प्रत्येकवेळी आपण चिडले पाहिजे अथवा नाराजी व्यक्त केली पाहिजे असे नसून शांततेचा मार्ग स्वीकारला तर खूप काही साध्य होते हे त्यांना कळले होते.जबाबदारी कमी करण्यासाठी त्यांचे लग्न दुर्गे परिवारातील भाऊसाहेबां बरोबर लावून दिले. खरे तर चांगलीच गोष्ट झाली. कारण एक पूर्ण परिवार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या वर आली. कारण भाऊ साहेबांच्या आई या जगात नव्हत्या त्यामूळे सगळी जबाबदारी या दोघांवर होती शांततेने घेतलेले प्रत्येक निर्णय आणि त्यासाठी असणारा सुसंवाद यामुळे पूर्ण परिवार त्यांनी एकजुटीने बांधून ठेवला होता.

कालांतराने त्यांच्याही संसारात दोन जिवांचा समावेश झाला आणि एक सुंदर परिवार तयार झाला. आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारावर त्यांचे विचार हे घडत गेले ते केवळ बुद्धांच्या शिकवणी मुळे.भाऊ साहेब या जगात नाहीत पण त्यांचे सगळे व्यवहार व शेत त्यांचे चिरंजीव आणि नातवंडे सांभाळतात. साधारण आठ गुंठ्यामध्ये बांधलेल्या शांती सदन मध्ये प्रवेश केला की समोर दिसते ती गौतमांची शांत संयमी मूर्ती. ती मूर्ती बघूनच आत येणाऱ्या प्रत्येकाचे “मी”पण तिथे लिन होते आणि मग उरतो “सच्चा “माणूस.

त्यामुळे दुर्गे परिवाराने खूप गोतावळा जमा केला आहे . सगळ्यांत आधी राग येऊ द्यायचा नाही आणि अगदीच आला तरी एक दोन तिन चार असे शंभर पर्यंत आकडे मोजायचे, मन स्थिर करायचे आणि योग्य निर्णय घ्यायचा. अगदीच दुमत झाले तर काही दिवस ती गोष्ट मागे टाकायची आणि आपणं पुढे जायचे हे तत्व वापरून दुर्गे परिवारातील प्रत्येक सदस्य शांता बाईंच्या संस्कारांनी भरलेले आहे.बंगल्याच्या बाहेरच पाहुण्यांचे स्वागत होणारं होते त्यामुळे विशेष तयारी सुरू होती.

आज गौतम बुद्धांच्या मूर्ती जवळ विशेष सजावट केली गेली होती. तेथील विद्युत रोषणाई आणि रंगीत कारंजे हे मनाला प्रफुल्लित करत होते. शांता बाईंना त्यांच्या दोन्ही सुनांनी छान तयार केले आणि त्या शांता बाईंना घेऊन मंडपात आल्या. शांता बाईंनी बुद्धाच्या मूर्ती कडे पाहिले आणि खरचं आज गौतम हसत होते.येणारा प्रत्येक अतिथी आज नेहमीपेक्षा खूप वेगळा वाटत होता.

समाधानाचे तेज आणि शांततेचा सदरा घातल्या प्रमाणे त्या वातावरणात प्रसन्नता होती.खरचं या कलियुगात जेव्हा असे परिवार बघतो तेव्हा नक्कीच सगळ्यांना वाटते आयुष्यात मनःशांती किती महत्वाची आहे आणि ती मिळवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे.शांता बाईंनी येणाऱ्या सगळ्यांची आस्थेने चौकशी केली. आजचे विशेष अतिथी होते, जवळच असलेल्या अंध शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व त्याच बरोबर त्या शाळेतील शिक्षक. संपूर्ण दुर्गे परिवाराने त्यांचे स्वागत केले. यथाशक्ती मदत केली आणि त्या कार्यक्रमाची सांगता झाली.

2 thoughts on “आणि बुद्ध हसला |Buddha”

Leave a Comment