मुक्ता ने बाळाला आंघोळ(Baby Bath) घालण्यासाठी मांडीवर घेतले आणि त्याच्या टाळूवर तेल टाकून टाळू भरायला सुरुवात केली.तशी तर मुक्ता चाळीस बेचाळीस वर्षाची. पण तिने लहान बाळांना अंघोळ घालायला सुरुवात केली. खरं तर गरज म्हणून केली कारण पदरात तिन मुली आणि एक मुलगा होता. या कामामध्ये पैसै जास्त मिळतात त्यामुळे धुणे भांड्यांची कामे करता करता ती ही कामे सुद्धा करायची.आणि तिला ते आवडायचे ही.
अगदी पोटच्या पोरासारखे सगळं करायची.नवरा दारू पिऊन यायचा आणि दिवसभराची कमाई दारूत उडवायचा.बाळाची अंघोळ झाली आणि थोडी शेक शेकोटी करुन दुपट्यात गुंडाळून बाळाला झोळीत टाकले आणि पाच मिनिट झोळी हलवली अन् बाळ झोपून गेले.आता मुक्ता ने बाळंतीनीला अंघोळ घातली आणि दोघांचे कपडे धुवून ती पुढच्या घरी निघणार होती.तेवढ्यात नीलू ने तिला आवाज दिला…
,”मावशी, आईने तुम्हाला थांबायला सांगितले”. खरं तर मुक्ता ला घाई होती कारण अजून दोन घरी तिला जायचे होते बाळांना अंघोळ घालायला. पण ती थांबली.तेवढ्यात नीलू ची आई दोन डिश मध्ये बदामाचा शिरा आणि डिंकाचे लाडू घेऊन आली. एक डिश त्यांनी आपल्या लेकीला दिली तर दुसरी मुक्ताला.मुक्ताला हे अनपेक्षित होते कारण तिला खूप कामे होती म्हणून ती पटकन अंघोळ घालून निघून जायची…पण आज नीलूच्या आईने म्हणजेच दमयंती काकूंनी तिला थांबवून घेतले.
खरं तर तिला ही या पौष्टिक पदार्थाची गरज होती. पण नशिबात कधी ते मिळालेच नाही. अगदी बाळंतपणात पण नाही. माहेरची परिस्थीती ही गरीब असल्यामुळे पहिले बाळंतपण सरकारी दवाखान्यात झाले पण आईकडे आणि बाकीची सासूने केली ते पण सरकारी दवाखान्यात… घरी आली की बारावी पुजली की मुक्ता कामाला लागायची.आज शिऱ्या ची डिश हातात घेतांना नकळत तिच्या डोळ्यातून त्या आठवणीने पाणी तरळले. तिने दोन घास खाल्ले आणि ती दमयंती काकूंना म्हंटली “बाकीचा मला बांधून द्या.. घरी लेकरं खातील”.आणि ती डबा घेऊन पुढे निघाली.
बोलता बोलता दोन महिने झाले.. आणि नीलू सासरी जायला निघाली. खरे तर एकाच गावात सासर माहेर होते, त्यामुळे तिला इतके वाईट वाटले नाही पण तरीही सातव्या महिन्यात आल्यामुळे घर खाली खाली होणारं होते.दुसऱ्या दिवशी मुक्ताचा बाळाला आंघोळ घालण्याचा शेवटचा दिवस होता… ती नेहमीच्या वेळी गेली. पण आज जातांना तिने बाळाला चांदीचे पैजण आणि नीलू ला साडी नेली होती. कारण मुक्ताची बहीण दमयंती काकूंकडे धुणे भांडी करत होती. आणि तिच्या मुळेच मुक्ताला हे अंघोळी चे काम मिळाले होते.आज दमयंती काकूंनी तिची ओटी भरली, तिचा पगार दिला आणि बांगड्या भरण्यासाठी पैसै दिले.तिने आज बाळाला पावडर आणि काजळ लावले.. बाळाची पापी घेतली आणि आणलेले पैजण बाळाच्या पायात घातले.
नीलू दुसऱ्या दिवशी सासरी गेली.काही दिवस गेले आणि भल्या पहाटेच दमयंती काकूंचा फोन मुक्ताला गेला. मुक्ता झोपेतच होती. तिने पटकन फोन उचलला तेव्हा दमयंती काकू म्हंटल्या,”अग जावई येत आहेत आपल्याला न्यायला, बाळ अख्खी रात्र खूप रडत आहे, नीलूला काही सुचत नाही आणि तिच्या सासू बाईंना पण काही कळत नाही”.मुक्ता ने सासू ला सांगितले. सासू पण म्हंटली आवाज न करता जा, तुझा नवरा उठला तर शिव्या द्यायला सुरुवात करेल “. मुक्ता तयार होऊन बसली, आणि दमयंती काकूंची वाट बघत होती. एवढ्यात दमयंती काकूंचा फोन आला आम्ही आलो म्हणून, मुक्ता तिच्या वस्तीतून मेन रोड ला आली आणि गाडीत बसून दोघी नीलू कडे गेल्या.
आताही बाळ रडतच होते… मुक्ता ने पटकन बाळाला उचलले आणि जवळ घेतले.. एक चादर घेतली त्याची एक घडी घातली आणि आता नीलू ला सांगितले ,”तू एका बाजूने धर मी एका बाजूने धरते, आणि आपण बाळाला गोल गोल फिरवायचे आहे”. नीलूला तर खरं म्हणजे भिती वाटली पण तिने तयारी दर्शवली . आणि काय आश्चर्य की बाळ क्षणात रडायचे थांबले… सगळ्या घराला खूप धीर आला आणि मुक्ताचा आधार वाटला.नीलू ने तिचे आभार मानले आणि चहा आणि थोडे पैसै तिला दिले..मधले कैक वर्ष गेली आणि आता मुक्ता म्हातारी झाली होती.
मधल्या काळात मुक्ताच्या दोन मुलींची लग्ने झाली. सासू गेली, नवरा गेला… नीलू चे बाबा गेले आणि दमयंती काकू खूप वयस्कर झाल्या होत्या.आज नीलू च्या मुलाचे लग्न होते आणि त्या लग्नाला मुक्ता गेली होती. आपल्या सुरकतलेल्या हाताने त्यांनी नीलू च्या मुलाच्या तोंडावरून हात फिरवला आणि नविन सून बाईंना सांगितलेआहे की,” तुझ्या नवऱ्याला मी अंघोळ घातली “आता नवी नवरी हसायला लागली… तेवढ्यात नीलू म्हंटली “आता तुम्ही गोड बातमी दिली की पुन्हा मुक्ताला बोलवायचे अंघोळ घालायला.मुक्ता हसली, आता हातपाय थकले म्हणत होती… आणि खरचं ती थकली होती. पण अशा कितीतरी लेकरांना अंघोळ घालून तिने किती पुण्य जमा केले होतोय.
आता तिचे डोळे लागले आपल्या लेकी कडे, जिचे तिन वर्षापूर्वी लग्न झाले होते पण अजून दिवस रहात नव्हते… तिचे ते स्वप्न अर्धवटच राहिले आणि ती गेली कायमची….. पुन्हा न येण्यासाठी.. आता मुक्ताची मुलगी स्वतः अंघोळ घालते आपल्या बाळाला…. तयार होत होती नवी मुक्ता… लेकीच्या रूपात.