सुखदेव रावांनी आज आपल्या “जीवा “ला खूप तेल लावून मॉलिश करुन न्हाऊ माखू घातले.त्याच्या पायाशी चांगली मशागत केली.कारण आज होता बैलपोळा.(Bailpola)
त्याच्या साठी अगदी सुंदर अशी झुल शिवून घेतली कारण आज त्याचा दिवस होता. घरात पुरण पोळीचा घाट सुरु होता. गावात प्रत्येकाच्या घरी आज खूप प्रसन्न वातावरण होते कारण गावात सगळेच शेतकरी होते.त्यांची मुलेबाळे शिक्षणासाठी शहरात गेली तरी गावातल्या माणसांना शहराची रहाणी मनाला पटत नव्हती. म्हणून ते आपल्या गावातच रहात होते.
आज प्रत्येकाच्या दारातील बैलांची जोडी खूप आनंदात दिसत होती. कारण आज त्यांना कष्ट नाही तर आपल्या मालकांकडून लाड करुन घ्यायचे होते.आज खास शहरातून तरुण मंडळी गावात आली. आपल्या शेतकरी आई वडिलांचा त्यांना अभिमानच होता. पण निसर्गाचे चक्र आणि शेतकऱ्यांचे हाल बघुन घरातील एकाने तरी चांगली नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे मुले पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात गेले.
असे असले तरी मातीची ओढ प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली आहे.घरातील सुवासिनींनी आता जी जोडी शेतात काम करते त्या हैबर आणि ढोल्या ची पूजा करुन औक्षण केले .आणि पुरणपोळीचा घास त्यांच्या तोंडात भरवला. तसेच जिथे “जीवा “होता त्या ठिकाणीही त्या गेल्या. त्याचेही त्यांनी औक्षण केले आणि त्यालाही पोळी भरवली. का कोणास ठाऊक पण “जीवा “च्या डोळयात त्यांना पाणी दिसले. तसेच सुखदेव रावांच्या डोळ्यात देखील पाणी आले.
जेवण झाल्यावर सगळे थोडे विश्रांती घेत होते कारण संध्याकाळी पाच वाजता बैलांची वाजत गाजत मिरवणूक निघणार होती. दुखदेव राव मात्र झोपले नाही. ते हळूच मागच्या दारी गेले जिथे “जीवा “विश्रांती घेत होता.सुखदेव रावांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्यांना हुंदका अनावर झाला. त्यांनी त्यांच्या मानेवर डोक्यावर हात फिरवला आणि कृतज्ञता व्यक्त केली.
खरे तर शेताची वाटणी झाली तेव्हा सुखदेव रावांना अतीशय टोकाची आणि बरेच खडक असणारी जमीन मिळाली. पण सुखदेव रावांच्या मनगटात जोर होता आणि मनात प्रचंड इच्छा सक्ती. गावात पावसाचे पाणी तसे कमीच होते. दरवर्षी काही सुधारणा करुन करुन सुखदेव रावांनी धान्य पिकवण्या इतपत जमीन तयार केली. आणि मग त्यांनी गुजरात वरुन हा “जीवा “आणला होता.
आता खऱ्या अर्थाने सुखदेव रावांचा शेतकरी म्हणुन प्रवास सुरु झाला. जीवा ने त्यांना खूप साथ दिली. अगदी प्रामाणिकपणे अव्याहत कष्ट केले. त्यासाठी किती रट्टे पाठीवरती झेलले ह्याची मोजदाद त्या मुक्या प्राण्याने ठेवली नाही.तसे तर सुखदेव राव त्याची काळजी पण घ्यायचे.
मुके जनावर असले म्हणुन काय झाले? जीव तर त्यालाही आहेच की म्हणत ते रोज संध्याकाळी शेतातून आल्यावर त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचे.दोन चार वर्षातच सुखदेव रावांच्या चुलत भावाने त्याचीही शेती सुखदेव रावांना विकत दिली. आता त्यांचे काम दुपटीने वाढले. पण आवडते काम होते आणि जोडीला जीवा आणि भोला होते.
भोला ला त्यांनी नंतर आणले. नविन शेती घेतल्यावर.सगळं छान सुरु होतं. आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब होत होता पण पारंपरिक पद्धत बंद पडूच शकणार नव्हती.मागच्या वर्षी भोला अचानक गेला आणि जीवा एकटा पडला. खरे तर तसा तो दोन वर्षापूर्वी पासूनच थोडा गतीने कमी झाला होता. माणसाचे वय वाढते तर मुक प्राण्याचे पण वाढतच असते ना हा विचार सुखदेव राव नेहमी करायचे.
जेव्हा सावित्री बाई आणि सुखदेव राव बैलगाडीतून निघायचे सावित्री बाईंच्या माहेरी तेव्हा भोला आणि जीवा जाम खुश असायचे. आपल्या मालकीण बाईंच्या माहेरी चाललोय तर शान मधेच जायचे असेच जणू काही ते म्हणत असतील. असाच आविर्भाव असायचा. त्या दिवशी सावित्री बाईना पण बैलगाडी काही वेगळाच वेग घेते असे वाटायचे.
त्यांच्या माहेरचे पण बैल होते “साहेबराव” आणि “बुंदेल पहिलवान “. जीवा, भोला, आणि ते दोघे त्यांच्या भाषेत जणू एकमेकांशी चर्चा करायचे असेच वाटायचे. ते बघुन सावित्री बाईंच्या माहेरची माणसेही खुश होत होती.त्यांच्या बैलांबरोबर यांनाही खुराक मिळायचा. त्यामुळे ते दोघे अजून खुश व्हायचे.
आज सुखदेव रावांना सगळ्या आठवणीं डोळ्यासमोर आल्या. त्यांची नजर जीवा कडे गेली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. सुखदेव राव ही रडले. आज माणूस माणसाला ओळखेना झाला तिथं हे प्राणी किती प्रामाणिक कष्ट करुन आपल्या मालकाशी इमानदारीत रहातात असे त्यांना वाटले. त्यांनी प्रेमाने त्याच्या अंगावरची झुल नीट केली.संध्याकाळी मिरवणूक निघाली.
जीवा ला थोडे चालवून आणल्यानंतर पुन्हा बांधून ठेवले. खरे तर आता तो ते घर आणि ती माणसे सोडून कुठेच जाणारं नव्हता पण तरीही त्यांनी काळजीपोटी तसे केले.दोन दिवसांनी सकाळी नेहमीप्रमाणे सुखदेव राव जीवा पाशी गेले तर जीवा निपचीप पडला होता कधीही न उठण्यासाठी.
सुखदेव राव रडत रडत घरात गेले. घरातील सगळी मंडळी बाहेर आली. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी वहात होते. गावात बातमी पसरली. सुखदेव रावांचे सोबती येऊन गेले. शेताच्या बांध्याच्या किनारी वर खड्डा खणून तिथे जीवा ला ठेवण्यात आले. त्यावर माती ढकलली गेली.आज हैबर आणि ढोल्या पण उदास दिसत होते. सुखदेव रावांनी दोघांच्या पाठीवरून हात फिरवला आणि थोडे त्यांना प्रेमाने थोपटले.काम थांबवून कसे चालणार होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुखदेवराव निघाले शेतात. ज्या ठिकाणी” जीवा”चा देह ठेवला होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नमस्कार केला आणि सांगितले या मातीची काळजी तू घेतली तशीच पुढे तू घेत रहाणार आशिर्वाद रूपाने.