“मंजी “एक अवखळ मुलगी. दिसायला तशी सावळी पण नाकी डोळी नीटस. असंख्य स्वप्न (Dream)डोळ्यात असणारी सगळ्यांत महत्वाचे म्हणजे हसत मुख.
त्यामुळे तिचा रंग तिच्यासाठी गौण होता. खरे तर रंगांनी ती तिच्या वडिलांवर गेली होती त्यामुळे तिची आई गोरी होती आणि तिचे बहीण भाऊ पण तिच्या पेक्षा गोरे होते.लहान असल्यापासूनच मंजी हसली म्हणजे तिच्या दोन्ही गालांवरती खळ्या उमटत होत्या. आणि त्याच तिच्या सौंदर्याचं खरं प्रतिनिधित्व करत होत्या.
रंग म्हणायला गेले तर गोरा, काळा ,गव्हाळ असे प्रकार ,पण लोकांना गोऱ्या रंगाबद्दल विशेष आकर्षण, आणि यावर मात केली होती मंजिने .रंगाने भले सावळी असू देत पण मनाने अतिशय निर्मळ होती, स्वच्छ आतून बाहेरून. त्यामुळे लहान असल्यापासूनच तिला पाहिले की सगळ्यांना खूप आनंद वाटायचा. इतकं तेज होतं तिच्या चेहऱ्यावरती आणि या सगळ्या मागे कारण होतो तिचा हसमुख चेहरा. कुठल्याही गोष्टीचे ती टेन्शन कधीच घेत नव्हती .अगदी शाळेत असतानाही ,कारण तिच्या आत मध्ये एक आत्मविश्वास दडलेला होता.
परिस्थिती कशीही असू देत पण मी अभ्यास करून चांगल्या मार्कांनीच पास होणार हे ध्येय मात्र कायम तिच्या समोर होते. आणि ती त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्टीला सामोरे जात होती. त्यामुळे अपयश हे सध्या तरी तिच्या अवतीभवती घुटमळत नव्हते ,आणि त्यामुळेच तिला यशाच्या पायऱ्या हळूहळू का होईना सर करता येत होत्या विना कोणाची मदत घेत. फक्त आपल्या आई-वडिलांनी आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे रहावे असे तिला कायम वाटायचे, आणि तिचे बाबा त्या गोष्टीला तिला साथ द्यायचे .
आपल्या मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि थोडे निराळे क्षेत्र निवडून त्यामध्ये प्राविण्य मिळवावे असे त्यांना नेहमी वाटायचे .त्यासाठी ते कष्टाला कधीच मागे पुढे बघायचे नाहीत आणि त्यासाठी त्यांच्या पत्नीने ही त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. पण आपल्या मुलीनी हवाई सुंदरी हे क्षेत्र निवडलं त्यावेळेस मात्र म्हणजे मंजीची आई थोडीशी नाराज होती अर्थात त्यामागे काळजी होती म्हणूनच.
तशी तर ती मधली. म्हणजे मोठी बहीण माधवी, मग ही मंजिरी, आणि शेवटी भाऊ महेश. का काय माहीत पण मंजी चे पहिल्या पासूनच कधी लाड झाले नाही. वडीलांना खूप प्रेम वाटायचे तिच्या बद्दल. पण माधवी पहिली मुलगी म्हणुन तिचे लाड झाले तर महेश शेंडेफळ आणि वंशाचा दिवा म्हणून त्याचेही लाड झाले.मात्र मंजी खूप समजदार होतीतिने कधी हट्ट नाही केला. पण जशी ती वयात आली तसा तिला ध्यास लागला होता हवाई सुंदरी बनण्याचा.वडील म्हणायचे,”अग ते आपले क्षेत्र नाही”तर आई म्हणायची,”चेहरा रंगवून लोकांच्या हातात काय चहा नाश्ता देणारं काय?”मंजी ला वाईट वाटायचे खूप पण तरीही तिने स्वप्न बघणे सोडले नाही.
माधवी चे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि तिचे लग्न झाले. पण मंजी ने निर्णय बदलला नाही. वडिलांना वारंवार ती समजावून सांगत होती.तिने खूप माहिती काढली. त्या संदर्भात कोर्स घेणारे कॉलेज, त्यांची फी याची सगळी चौकशी केली. खरे तर आईला या गोष्टी मान्य नव्हत्या पण वडीलांनी आईला समजून सांगितले.तिचे बाबा आईला म्हणाले,”लहापणापासूनच तिने आपल्याला काहीच त्रास दिला नाही. बरेचदा माधवी चे लहान झालेले कपडे तिने वापरले आणि आपण माधवी ला नविन कपडे घेत होतो. महेश साठी पण तिने खूप सपोर्ट केला.
त्याने छान अभ्यास करावा म्हणून तिने त्याला चांगल्या कॉलेज मध्ये टाका म्हणाली”.आता आईलाही वाटू लागले की तिला ज्यात इच्छा आहे ते क्षेत्रात तीने जावे.सगळयांच्या सहकार्याने दोन वर्षाचा हवाई सुंदरी साठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम तिने मोठ्या हिमतीने पूर्ण केला.आज तिच्या श्रमाचे चीज होणारं होते कारण आज ती हवाई सुंदरी म्हणून ओळख मिळवणार का याचा निकाल होता. ज्याची वाट बघत होते सगळे तो क्षण जवळ आला आणि तिने तिच्या अभ्यासक्रमात उत्कृष्ठ कामगिरी केली होती. ती यशस्वीरित्या सगळ्या टप्प्यातून पास झाली आणि हवाई सुंदरी म्हणून तिची ओळख निर्माण झाली.
मंजीचे बाबा तिला म्हणाले,” बेटा आपल्याकडे जी उणीव आहे तीच आपली ताकत असते आणि ती ओळखूनच आपण आपलं क्षेत्र निवडायचं असतं. खरे तर हे क्षेत्र असं आहे की आपल्या समाजात आजही खूप मुलींना इच्छा असूनही त्यांच्या पालकांमुळे इकडे जाता येत नाही ,परंतु आम्ही तुझ्यातली इच्छाशक्ती ओळखली आणि तुला साथ दिली. त्याचे तू चीज केलेस आणि स्वप्नांना पंख दिलेस. म्हणूनच आज तुझी इच्छा पूर्ण झाली. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असणार आहेत.
अभिमान आहे तुझ्यासारखी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली याचा.,”आज विमानातून प्रवास करण्याचा पहिला दिवस. ती जेव्हा पूर्ण तयार होऊन तिच्या आई वडीलांसमोर आली तेव्हा तिच्या बाबांची छाती उंचावली. तर आईच्या डोळयात आनंदाश्रू होते.सध्या ती देशांतर्गत विमानसेवेमध्ये रुजू झाली होती. लवकरच आंतरराष्ट्रीय विमान सेवेत ती रुजू होईल. खरंतर आपल्या आई-वडिलांचे स्वप्न होते एक ना एक दिवस विमानात बसायचं ते आपण पूर्ण करू शकू याचा आनंद तिला खूप मोठा होता.
पुढच्याच महिन्यात पुणे ते चेन्नई हा विमान प्रवास तिने आपल्या आई-वडिलांसोबत केला आणि आई-वडिलांना आपली मुलगी हवाई सुंदरी म्हणून काम करताना बघतांना अतिशय आनंद झाला. खरंतर अशी रत्न जन्माला येणे हे मोठे भाग्य .मुलगी असो वा मुलगा, त्यांच्यावर उत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण असेल तर पुढे जाऊन आपली ओळख त्या मुलांचे आई-वडील म्हणून होण्याची मजा असते ना ती काही औरच असते.
खूप छान लिखाण 🥰🥰