मैत्रिणींनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा (give time to yourself) घरातील सर्व कामे ही आईचीच कामे असतात हे जवळजवळ गृहीतच धरलेले आहे. कधीतरी आईला विश्रांती पाहिजे असते त्यावेळेस मात्र ती मुलांना काम सांगते.
“आई तू बस आम्ही किचन स्वच्छ करतो..
“हॊ हॊ करा सावकाश चांगल स्वच्छ करा… ” आईचे हे शब्द ऐकून मुले आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात.
राहू दे तुम्हाला नाही जमणार माझं मीच करते असं म्हणणारी आई आज अचानक किचन स्वच्छ कर असे म्हणते.
हॊ आई दमली बर आत्ता…..
मैत्रिणींनो कितीतरी ठिकाणी आपण पाहतो,मला तर बाई मुलांनी काम केलेले आवडतच नाही,साधी भाजी कापायला सांगितली तरी तिच्यावर पसारा घालून ठेवतात… त्यापेक्षा आपल्या आपण केलेलेच बरे….हो की नाही मी सुद्धा त्यातलीच एक बर का. पण आताशा शरीर झिजत चालले आहे याची जाणीव व्हायला लागली. आरशासारखं घर स्वच्छ ठेवून आपल्याला खरच कोणी पुरस्कार देतं का?आपल्या मनाला समाधान वाटते अरे वा घर खूप स्वच्छ झाले आहे मी अजून थोडा हात मारला तर अजून स्वच्छ होईल. अजून म्हणता म्हणता आपण थांबतच नाही.
माझी सून बघ सकाळी चार वाजता उठते सगळ्यांचा स्वयंपाक भांडी धुणे घर अगदी चकाचक करते… सगळ्यांच्या पोळ्या मोदक अगदी एकटे करते कुणाची मदत न घेता असं जेव्हा सासू शेजारच्या मैत्रिणीला सांगते तेव्हा सून अगदी कौतुकाने आणि अभिमानाने स्वतःकडे पाहते. मग दुसऱ्या दिवशी अजून लवकर उठून बरीच कामे तीच करते. का तर सासूने केलेले कौतुक वाया जाऊ नये. पण त्यातच आपण आपल्या शरीरावर किती ताण देत आहोत हे मात्र आपल्या लक्षातच येत नाही.
मला ना कोणाच्या हातचे आवडतच नाही.. मला भांडी अगदी स्वच्छ घासून लख्ख लागतात. असे आपण जेव्हा आपल्याला सांगतो… तेव्हा आपल्या लक्षात येत नाही. त्या लख्खपणाच्या नादात आपण आपल्याला विनाकारण कामात डुंबवून घेत असतो. काम केल्याने कोणी मरत नाही. आपले शरीर हे काम करण्यासाठी बनलेले आहे. असे अनेक समज गैरसमज आपण आपल्या मनात साचवून ठेवतो. वयाच्या पन्नाशीनंतर जेव्हा एकही पोळी करण्याचे त्रानं आपल्या शरीरात राहत नाही. त्यावेळी ज्यांच्यासाठी इतक्या स्वयंपाक केलेला असतो ते सगळे कुठे जातात? सगळे आपापल्या ठिकाणी एन्जॉय करत असतात तू मात्र कुठे राहतेस आहे तिथेच. आता तुला खूप एन्जॉय करायचा असतो परंतु तुला तो करता येत नाही कारण तुझ्या शरीराची झालेली झीज.
त्याचवेळी जेव्हा एखादी सून म्हणते माझ्या त्याने इतके काम होणार नाही मला कुणाची तरी मदत लागेल.. त्यावेळेस सगळे तिच्याकडे टवकारून पाहतात आणि हिला काही शिकवले नाही हिला कामच करता येत नाही असे अनेक शेरे तिला मारले जातात. खरंच ती चुकीच्या असते का त्यावेळी? मी तर म्हणेल आपल्याच्याने होत नसेल तर असे स्पष्ट बोललेले कधीही चांगलेच. माझी सून तर मला जेवलेले ताट सुद्धा उचलून देत नाही.. असं सुनेचे कौतुक करणाऱ्या सासवांनो ही अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का?
ती हे चांगलं करते ते चांगलं करते असं कौतुक करून करून तिला एवढे व उंचावर नेले जाते… कितीतून तिला खाली परत येणे अगदी अशक्य होऊन जाते. म्हणून सांगते मैत्रिणींनो तुम्हाला झेपेल तितकीच कामे करा. तुमची शरीराची झालेली झीज कुणीही भरून काढू शकत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला जपा.
तरुणपणी आपल्याला खूप काही करायचे असते. आपल्याला बॅडमिंटन खेळायचे असते, आपल्याला डान्स शिकायचा असतो, रांगोळ्या शिकायच्या असतात, मेहंदी काढायला शिकायची असते, नवनवीन प्रकारचे ड्रेस शिवायला शिकायचे असतात परंतु मुले लहान असल्यामुळे व घरातली जबाबदारी खूप असल्यामुळे आपल्याला ते करणे जमत नाही. जेव्हा मुले मोठे होतात. घरातल्या कामांपासून आपल्याला थोडा रिकामा वेळ मिळतो तेव्हा आपली वय वाढलेले असते. बॅडमिंटन खेळायला गेले तर हात दुखायला लागतो. नवीन प्रकारचे ड्रेस शिवायचे म्हटले तर सुई ओवायला दिसत नाही. म्हणजेच जेव्हा आपल्या अंगात ताकत असते आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला वेळ मिळत नाही. आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वय वाढलेल्या असते शरीर साथ देत नाही. म्हणून मैत्रिणींनो तरुणपणीच स्वतःसाठी वेळ काढून आपापल्या आवडी जोपासल्या पाहिजे. चणे आहेत तर दात नाही आणि दात आहेत तर चणे नाही. अशी अवस्था व्हायच्या आतच आपण शहाण्या होऊया. आणि स्वतःसाठी थोडासा वेळ राखून ठेवून आपापले छंद जोपासूया.
मुलांचे आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालते… पण आपलं काय आपला आयुष्य तर त्यांच्या वेळापत्रकावर चालते ना. आपल्याला काही वेळापत्रकच नाही. सतत दुसऱ्यांची वेळापत्रक जपण्यापेक्षा जर आपण आपली वेळापत्रक जपली तर पन्नाशी नंतर आपल्याला कुणाचाही आधार लागणार नाही आपण आपले सक्षम असू.
काय म्हणताय मैत्रिणींनो पटतंय का?