खरंतर प्रत्येकाकडे खूप गुपितं (secret)असतात. जे आपण इच्छा असूनही कुणाला सांगू शकत नाही. अशीच गोष्ट आहे एका गुपिताची आणि मनातल्या विश्वासाची.
राधिकाच्या लग्नाला पाच वर्ष झाले. खरे तर देशमुख परिवार म्हणजे बागायतदार. खानापूर हे त्यांचे गावं. पण त्यांचा मुलगा रोहीत हा उच्च शिक्षणासाठी पुण्याला आला आणि इथेच राहिला. त्यामुळे बाबासाहेब म्हणजेच रोहीत चे बाबा आणि त्याची आई म्हणजेच शकुंतला ताई हे ही शहरात राहिला आले.
पण गावाकडे शेतात बंगला बांधलेला आहे त्याच प्रमाणे आजुबाजुला सगळे चुलत भाऊ त्यांची मुले असे रहातात. त्यामुळे कधीतरी सुट्टीला हा देशमुख परिवार गावाकडे जायचा.राधिका जरी पुण्यात रहात होती तरी तिच्या वडिलांकडे ही शेती होती. तिचे बाबा नोकरी निमित्त पुण्यात आले. तसे तर त्यांचेही घर आहे त्यांच्या नांदे गावात. राधिका तशी उच्च शिक्षित असली तरी घरात भरपूर धार्मिक कार्य होत असल्यामुळे परमेश्वरा वर तिची श्रद्धा आणि भक्ती खूप आहे.
सगळे सण वार तिच्या माहेरी व्यवस्थित साजरे व्हायचे, त्यामुळे तिच्यावर त्या संस्कारांचा पगडा आहे.रोहीत चे स्थळ सांगून आले तेव्हां राधिकाच्या वडिलांना खूप आनंद झाला. एवढ्या मोठ्या देशमुख परिवारात आपली लेक जाणारं म्हंटल्यावर त्यांना कोण आनंद झाला होता. एक संस्कार क्षम मुलगी आपल्या घरात येत आहे म्हंटल्यावर देशमुख परिवार हि आनंदात होता.लग्न झाले आणि पहिल्या आषाढी अमावस्येला राधिका, बाबासाहेब, रोहीत आणि शकुंतला ताई गावाला गेले.
कारण या दिवशी त्यांच्या शेतात असणाऱ्या देवळात आणि आजूबाजूच्या देव देवतांना पुरणाचा नैवेद्य असतो. तो दाखवायला म्हणून सगळे जण गेले होते.स्वतःचाच बंगला असल्यामुळे राहण्याचा तसा काही प्रश्न नव्हता .दुसऱ्या दिवशी श्रावण लागणार होता आणि श्रावणातलाच पहिला सोमवार. राधिका उठली तिने बाहेर अंगणात झाडलोट केली एक छोटेखानी रांगोळी काढली आणि ती उठून आत येणार तेवढ्यात तिचे लक्ष गेले .
तिथे एक नागदेवता म्हणजेच नाग आणि नागिन यांचा वेटोळ घातलेलं आणि फणा काढलेलं जोडपं तिला नजरेला पडलं .ती किंचित घाबरली कारण शहरात ह्या गोष्टी कधी दिसल्याच नाहीत .तिनी मनोमन नमस्कार केला आणि ती आत गेली. तिने शकुंतला ताईंना सांगितलं शकुंतला ताई बाहेर येईपर्यंत ते नाग नागिन नाहीसे झाले होते. सगळे आवरल्यानंतर राधिका अशीच झोपली आणि तिला स्वप्न पडलं.
स्वप्नात तेच नागदेवता तिच्या नजरेत दिसले. अग मुली आम्ही तुला दर्शन द्यायला आलो होतो .आम्हाला काहीच नको पण आम्ही आलो की तू आम्हाला थोडेसे दूध दे हळद-कुंकू वहा आणि मनोभावे नमस्कार कर .आणि तुझ्या ज्या इच्छा असेल ते बोल आम्ही तुला आशीर्वाद देऊन निघून जाऊ .फक्त ही गोष्ट तुझ्यात आणि आमच्यातच असू देत. तेवढ्यात राधिकाला जाग आली, अरे हे तर स्वप्न होते पण तिला ते वाक्य आठवलं आणि तिने त्या दिवसापासून ही गोष्ट कोणाला सांगायची नाही असं ठरवलं.
तिला आता दरवर्षी आषाढी अमावस्येचे वेध लागायचे कधी आपण गावाला जातो आणि कधी त्यांचे दर्शन घेतो असं व्हायचं .लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर आर्यन चा जन्म झाला .आता प्रत्येक आषाढी अमावस्येला तोही तिथे दर्शनाला यायचा. यंदा गेली खरी ,नैवेद्य झाला आणि शेजारचे चुलत सासरे यांच्याकडे येऊन बसले, बाबासाहेबांबरोबर गप्पा मारायला .बाबासाहेबांना त्यांनी सांगितले की ,”बाबासाहेब आता आपण असं करूया आपल्या शेताची वाटणी करूयात त्याचप्रमाणे आपल्या बंगल्यांच्याही हद्दी आपण आखून घेऊयात” .राधिकाला थोडसं वाईट वाटलं की अरे बापरे आता काय करायचे?
कारण राधिकाला हळूहळू माहिती झालं होतं ते ज्या वारुळात ते नाहीसे व्हायचे ते वारूळ राधिका ने पाहिलं होतं. आता घरांच्या वाटण्या झाल्या आणि तिथे बांध पडला तर ते वारूळ आपल्या चुलत सासऱ्यांच्या हद्दीत जाईल आणि ते चुलत सासरे ते वारुळ नष्ट करतील अशी तिला भीती वाटत होती .तिला खूप उदास वाटत होतं .आता काय करायचं असा प्रश्न तिला पडला. खरं तर या वेळेस पहिला सोमवार आला नाही त्यामुळे पुढच्या सोमवार पर्यंत तर राहता येणं शक्य नव्हतं ,पण राधिका शहरात आली आणि पुढच्या रविवारी रोहितला घेऊन पुन्हा गावी केली .कारण काही झालं तरी तिला नागदेवतांचे दर्शन घ्यायचं होतं.
ठरल्याप्रमाणे तिने सकाळी सडा रांगोळी केली आणि त्या दोघांनी दर्शन दिले .तिने मनोभावे पूजा केली थोडं दूध ठेवलं हळद-कुंकू व्हायले,दोन्ही हात जोडले आणि ते निघून गेले .पण राधिकाला आता प्रश्न पडला की पुढच्या श्रावणात काय असेल? नेमकं त्या रात्री राधिका झोपली तेव्हा राधिकाच्या स्वप्नात पुन्हा ते नागदेवता आले ,”तू काहीही कर पण आमच्या वाटण्या करू नकोस आम्ही सदैव तुझ्याबरोबर असणार आहे आणि आम्हाला तुझ्याबरोबरच राहायचं आहे .एक काम कर तुमच्या शेतात एकाकडे ला आमच्यासाठी मंदिर बांध शंकराचे आणि आम्ही तुला तिथे दर्शन देत जाऊ “.
राधिका ताडकन जागी झाली . पण आता आपण ह्या गोष्टी आपल्या सासऱ्यांशीच म्हणजे बाबासाहेबांशी कशा बोलायच्या असा तिला प्रश्न पडला. तिने रोहितला एक गोष्ट सांगितली की ,”बघ मी शंकराची निस्सीम भक्त आहे आणि मला असं वाटतं की देवांचे देव महादेव हे आपल्या घराचे, शेताचे रक्षण करतील त्यामुळे मी कधीही गावाला आले तर आपल्या महादेवाची यथा सांग पूजा करू शकेल अशा पद्धतीने एक छोटे मंदिर आपल्या शेतात बांध “.रोहितला थोडसं अवघड वाटलं कारण इथे लक्ष द्यायला काहीच नाही. आपण तर शेतात राहणारच नाही मग हे सगळं का करायचं ?पण तरी त्यानी ही गोष्ट आपल्या वडिलांची म्हणजेच बाबासाहेबांशी तो बोलला.बाबासाहेबांनाही थोडसं वेगळं वाटलं की ,”अरे तुम्ही कधी येणार इथे ?आपण वर्षातूनच क्वचित येतो “.पण राधिका म्हटली ,”बाबा बांधा ना मंदिर .त्या मंदिराच्या ओढीने तरी माझं नेहमी येणं होईल “.बाबासाहेबांनी गोष्ट मनावर घेतली आणि व्हायचं तेच झालं जे वारूळ होतं ते त्यांच्या चुलत भावाच्या हद्दीत गेलं .
राधिकाला आता खूप मोठा प्रश्न पडला की अरे बापरे तिथे तर भिंत उभी राहिली तर हे लोक मला दर्शन द्यायला येणार कसे ?राधिका खूप रडायला लागली पण तिला घरात काही या गोष्टी सांगताच येत नव्हत्या. राधिका मनोभावे पाया पडली त्यांच्या आणि सांगितलं ,”तुम्हाला मला दर्शन द्यायचं आहे ना आता तुम्हीच यातून मार्ग काढा “आणि बाबासाहेबांना बुद्धी द्या मंदिर बांधायची . खरे तर बाबासाहेबांनी खूप आढेवेढे नव्हते घेतले त्यामुळे तेही मंदिर बांधायला तयार झाले .आणि अशा पद्धतीने एक वर्षभर राधिकाला वाट बघावी लागली .
पुढच्या आषाढ महिन्याच्या अमावस्येला जेव्हा राधिका गावात नैवेद्य द्यायला म्हणून गेली त्यावेळेस मंदिर पूर्णपणे झालेलंच होतं तसं ते आधीच झालं होतं कारण महाशिवरात्रीचा उत्सव तिथे पार पडला होता पण त्यावेळेस राधिकाला एवढे दिवस राहता येत नव्हतं. हे मंदिर बघून राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं .”बाबा मी आता थोडी ऑफिसमध्ये रजा काढली माझा विचार आहे की पहिला सोमवार मी इथेच करेल मग आपल्या शंभू महाराजांना इथेच अभिषेक करेल आणि मग मी पुण्याला येईल तोपर्यंत तुम्ही सगळे पुढे गेला तरी चालेल” बाबासाहेबांनाही वाटलं आजूबाजूला आपलेच भाऊबंद आहेत राधिका एकटी राहू शकते .
असं म्हणून सगळेजण पुण्याला गेले .त्या रात्री नागदेवता तिच्यासमोर आल्या आणि त्यांनी त्यांचे रूप दाखवलं की ,”बालीके तुझी श्रद्धा तुझी भक्ती बघून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहोत. तू मागच्या जन्मी ही शंकराची सच्ची भक्त होतीस आणि त्यामुळे या जन्मातही तुझी भक्ती आम्ही फलद्रूप होण्यासाठी तुला मी दर्शन देत आहोत. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील फक्त तु ही गोष्ट तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाला सांगू नकोस .ज्या क्षणी असं होईल त्या क्षणापासून आम्ही तुला दर्शन देणे बंद करू”.राधिका मनोभावे त्यांच्या पाया पडली आणि म्हटली ,”मी अगदी कितीही कठीण प्रसंग आला तरी माझ्या मुखातून हे कधीच निघणार नाही पण तुम्ही मला दर्शन देणे बंद नका करू “.त्यांनी तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि ते नाहीसे झाले.
कालांतराने मधले बरीच वर्ष गेली. राधिका न चुकता तिथे येत होती आता त्या जोडप्या बरोबर एक पाच सहा पिल्लं पण यायला लागली. राधिकाला खूप आश्चर्य वाटायचं. आता आर्यन बऱ्यापैकी मोठा झाला होता. आणि तो क्षण आला की आता राधिका सासु झाली आणि आर्यनच्या बायकोच्या रुपात सई घरी आली.एक दिवस नागदेवतांनी राधिकाच्या स्वप्नात येऊन सांगितलं ,”राधिका तुला जसं पाहिजे तसं वैभव तुला प्राप्त झालेला आहे .आम्ही तर तुझ्या सदैव पाठीशी आहोतच पण आता तुझ्या पुढच्या पिढीलाही या श्रद्धेत भक्तीत तल्लीन होण्यासाठी आम्ही आता हा वारसा आमच्याही पुढच्या पिढीला देतोय त्यामुळे तुझ्याही पुढच्या पिढीलाच म्हणजे आता तुझ्या सुनेला आम्ही दर्शन देत जाऊ.
आम्ही आता थकलो आता आमची मुलं तुमच्या सुनेला दर्शन देतील”. राधिकाला खरंच खूप वाईट वाटलं .इतक्या वर्षाची आपले हे संबंध एका क्षणात नाहीसे होणार का अशी तिला खंत वाटत होती.आता आर्यन ,सई,राधिका आणि रोहित गावाला आले होते. राधिकाचही आता वय झालं होतं त्यामुळे राधिका आणि रोहित आराम करत असतानाच सई आणि आर्यन बागेत काम करत होते. आणि आर्यन म्हंटला आता मी आत जातो आणि माझं काम करतो, त्यावेळेस दारात सई रांगोळी काढत होती .आणि त्या नागदेवतांनी सईला दर्शन दिलं.
जी गोष्ट राधिकाला सांगितली होती तीच गोष्ट त्यांनी सईलाही सांगितली ,”ही गोष्ट कोणाशी बोलू नको”. मात्र सई आत मध्ये आल्यानंतर राधिकाने तिचा चेहरा पाहिला. थोडासा घाबरलेला पण बराचसा उत्कंठा वाढवणारा तिचा चेहरा राधिकाने ओळखला .चला तर मग आशीर्वादाचे हात आणि आशीर्वादाची ही साथ आपल्या पुढच्या पिढीकडेही आहे असं समाधान मानून राधिका किंचित हसली.
खूप छान कथा….. मनापासून भक्ती केली की देवता नक्की आशिर्वाद देतात…. माझ्या सासर्यांची अशीच खूप श्रद्धा होती… त्यांनी खूप मोठं मंदिर बांधले आहे गावी…ते पण ज़ंगलात…शंकराचं 🙏🙏