हरतालिका | Hartalika

“आये मी औंदा हरतालिकेचा (Hartalika) उपवास नाही करणार “नाकाची पाळी फुगवून हेमा आईला म्हंटली.”बाय, असं म्हणू नये. हे शंकराचे व्रत केले की सौभाग्याचं दान पदरात पडते “.”व्हय काय?

मग आता मला सदोतीसावे वर्ष लागले तरी मला कोणी शंकर भेटेना झाला. चौदाव्या वर्षी मी शहाणी झाले तसे हे व्रत तू मला करायला लावले.रात्री जागरण करुन कहाणी वाचून उपवास करुन काय फळ मिळाले “?हेमा ने कमु ताईंना प्रश्न केला. कमू ताई म्हणजे हेमाची आई.खरं तर हे व्रत सुवासिनी करतातच पण ज्यांचे लग्न व्हायचे अशा मुली पण करतात.

सुरवातीला हेमा खूप मनापासून उपवास करायची. अगदी पाच वर्ष तर तिने निरंकार उपवास केला. पोथी, उपवास असे सगळं करायची जसजसे लग्नाचे वय पार होत गेले तसतसे तिची या गोष्टी वरची श्रद्धा उडाली. आणि आता तर पस्तिशी पण पार झाली. कमु ताई ही आता सत्तावन वर्षाच्या झाल्या होत्या.आपल्या मुलीचे लग्न जमत नाही याची खंत त्यांना कायमच वाटत राहायची.

वाड्यातल्या बाया पापड्या चर्चा करायच्या, पण खरे तर प्रत्येकाच्या घरात एका तरी मुलीची नाही तर मुलाची ही व्यथा होती. त्यामुळे सगळ्या समदुखी दुपारच्या वेळी कोणा एकीच्या घरात जमून मन रमवायच्या .वाडा संस्कृती असल्यामुळे सगळे सण उत्साहात साजरे व्हायचे. आणि स्त्रियांचे सण तर अती उत्साहात. सगळ्या बायका मिळून एकत्र व्रत वैकल्ये करायच्या. एकत्र फराळ करायच्या.काळ लोटला तसे आधीची पिढी वयाने मोठी झाली आणि आता त्यांची मुलेबाळे एकमेकांच्या बरोबरीने वाढत होती.

पण असेच काही प्रोब्लेम वाड्यातल्या तिन चार बिऱ्हाडात होते. कवठे परिवारातील शारदा आणि हेमा बरोबरीच्या. दोघींचे ही लग्न जमत नव्हते तर जवळकर परिवारातील दिलिप यांच्या वयाचा त्याचेही लग्न होत नव्हते. पण वाड्यात एकत्र राहिल्यामुळे बहीण भावाच्या नात्याने एकमेकांशी बोलत होते.नर्मदा ताई म्हणजे वाड्यातील सगळ्यांत ज्येष्ठ व्यक्ती. त्यांनी शारदा आणि हेमा ला समजून सांगितले. या व्रताचे महत्त्व, कहाणी सगळे सांगितले.

पण दोघीही खूप नाराज झाल्या होत्या. तेव्हा नर्मदा ताई त्यांना म्हणायच्या, “अग लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. वेळ आली तर आठवड्यात लग्न जुळतील तुमची, करा व्रत.”नर्मदा ताईंचे वय झाले होते. त्यामुळे सगळे जण त्यांचा सल्ला, विचार, अनुभव ऐकत असत. त्याचा सगळयांना खूप मोठा आधार वाटत होता. हेमा आणि शारदा ने त्यांच्या सांगण्यावरून व्रत केले.

हरतालिका | Hartalika

अगदी नाही नाही म्हणणाऱ्या दोघी छान तयार होऊन पूजेची तयारी करत होत्या.कमु ताई आणि माला ताई म्हणजे शारदा च्या आई दोघीही खुश झाल्या. त्यांनीही व्रत केले. कहाणी वाचली आणि पुढच्या हरतालीके पर्यंत दोघींचं शुभ मंगल घडवून आण असं मागणे केले. वाड्यातल्या सगळ्या बायकांनी मिळून दूध फळ खाल्ली. दुसऱ्या दिवशीच्या गणपती ची तयारी करायची म्हणुन वाड्यातली मुले एकमेकांकडे मखर सजावट करण्यासाठी जात होती. एकंदरीतच माहोल मस्त तयार झाला होता.गणपति बसले आणि वाड्यातल्या दिवटे परिवारात पाहुणे आले नाशिकहून. म्हणजे दिवटे काकूंच्या मोठ्या नणंदेचा मुलगा आला, त्याचे नावं अरविंद. त्याचेही वय ३९ होते. बहिणी शिकत होत्या म्हणून त्यांची लग्ने उशिरा झाली आणि त्यामुळे अरविंद चे लग्न जमत नव्हते .

त्याने हेमा ला पाहिले आणि आपल्या मामी ला म्हणजेच दिवटे वहिनींना विचारलें,”मामी हिचे लग्न नाही झालं का? त्यावर त्या म्हणाल्या हो ना जमतच नाही”. तशी ती रूपाने देखणी शिक्षण चांगले आहे, जॉब करते पण घोडं कुठे पेंड खाते काय माहिती?”हे ऐकले आणि अरविंद म्हंटला,”मामी आजच तू माझ्याबद्दल त्यांना माहिती दे. मला हेमा पसंत आहे “दिवटे काकूंना खूप आनंद झाला.

त्यांनी ताबडतोब हेमाच्या आई वडिलांना बोलवून घेतले. विचार विनिमय झाला आणि अगदी दोन दिवसात हेमाचे लग्न ठरले.शारदालाही एक वर्षापूर्वी जे लोकं बघुन गेले होते, त्यांनी परत निरोप धाडला होता. पहिली वेळ जेव्हा ते आले होते तेव्हा मुलाला कायमस्वरूपी नोकरी नव्हती त्यामुळे शारदा ला पसंत असलेले स्थळ तिच्या आई वडिलांनी नाकारले होते. पण आता तो नोकरीत कायम झाला होता. त्यांना शारदा पहिल्या भेटीतच आवडली होती आणि अजूनही तिचे लग्न झाले नाही असे कळल्यावर ती लोकही तिला मागणी घालायला परत आली.

गणपति पावला आणि व्रत सत्कर्मी लागले आसे म्हणत दोघी मैत्रिणींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली आणि दोघी नर्मदा ताईंच्या पायावर डोके ठेवायला गेल्या .आता पुढच्या वर्षीचे व्रत त्यांच्या भोळ्या शंकराच्या साक्षीने दोघी साजरे करणारं होत्या.

Leave a Comment