आज जुन्नर तालुक्यातर्फे बायजाला हिरकणी (Hirakni)पुरस्कार म्हणून तिचा सत्कार करण्यात येणार होता कारण एक गौरवास्पद कामगिरी तिने तिच्या आयुष्यात केली होती.
“हरी “तिचा एकुलता एक मुलगा. याचा सांभाळ करून त्याला उच्च शिक्षण देऊन स्वतः अनेक खस्ता खाल्लेल्या असताना आज हरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्कृष्टपणे पास झाला होता. आणि त्या साठी गावकऱ्यांनी तिचा गौरव करायचे ठरवले होते.
बायजा तिच्या नवऱ्या बरोबर पुण्याला आली . खरे तर तिचे सासू-सासरे एका बिल्डरकडे बिगार्याचे काम करायचे. माती विटा उचलायचे आणि त्यातच तिचा नवरा म्हाद्या हा त्यांना मदत करायचा .खरंतर ते एका खेडेगावातले होते पण पोटापाण्यासाठी म्हणून ते पुण्यासारख्या शहरात आले. बांधकामाच्या ठिकाणी त्यांच्या झोपड्या पडायच्या .दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री मात्र म्हाद्या दारू प्यायचा .
दारू पिऊन बायजाला खूप मारायचा. तिची सासू रखमा हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होती पण आपला मुलगा कसा बरोबर आहे आणि तो कष्ट करतो त्याच्या पैशाने दारू पितो हे सातत्याने ती बायजावर बिंबवत होती .त्यामुळे दिवसभर ती ही कष्ट करायची पण रात्री मार खायची. अशातच तिला दिवस गेले होते. सातवा महिना होता तरी ती डोक्यावरती विटा मातीची ओझी वाहत होती .आणि म्हाद्या रात्रीचा तिला मारत होता.
रखमाबाईचं काम होतं आपल्या मुलाला सांगायचं पण तिने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. एक दिवशी असच झालं, रखमा आणि तिचा नवरा गावाला गेले. म्हाद्या आणि बायजा दोघे इमारती वरती विटा वहायची काम करत होते .संध्याकाळ जशी झाली काम बंद झाले. ठेकेदारांनी यांना यांच्या कामाचे पैसे दिले . बायजा आपल्या झोपडीत आली तिने भाकरी टाकली आणि ती भाकरी थोडी करपली म्हणून गरम उलथन्याने म्हाद्याने तिच्या कपाळाला मारले .
खूप रक्त आलं होतं ,पण बायजानी पोटातलं बाळ एका हाताने सांभाळत ती उठली. तिनी फडक्याने ते रक्त पुसलं. म्हाद्या ला काहीच वाईट वाटलं नाही .त्यानी जेवायला जे होते तो जेवला आणि दारू पिली होती म्हणुन त्याला झोप लागली. सासू-सासरे नाहीयेत आणि म्हाद्या झोपलाय हे बघून बायजानी आपल्या कपड्यांची वळकुटी बरोबर घेतली आणि बायजा रात्रीच्या अकराला बाहेर पडली .
ते काम चालू होतं ती सोसायटी मेन रोड पासून बरीच आत होती, पण बायजा पोटातल्या सहा महिन्याच्या गर्भाला घेऊन तिथून निघाली. चालत चालत मेन रोडला आली. आणि वळकुटीला असलेल्या दोनशे तीनशे रुपयांमध्ये तिने काकुळतिला येऊन लोकांना विनवणी केली .तिचं भरलं पोट बघून लोकांनी तिला सहानुभूती दाखवली आणि स्टेशन पर्यंत तिला सोडलं.
बायजा गावाला निघाली. एसटीचा प्रवास करून ती मध्यरात्री आपल्या गावात पोहोचली. जुन्नर तालुक्यातच तिचं गाव होतं सासर आणि माहेर एकाच तालुक्यात होतं, पण दोन गावांमध्ये साधारण एक तासाचा अंतर होतं .त्यामुळे ती तिच्या माहेरच्या गावाला पोहोचली. परंतु माहेरी न जाता तिथल्याच ग्रामपंचायतीच्या कार्यालय मध्ये ती गेली .
तिथे रात्रीचे ग्रामसेवक होते त्यांनी गावातल्या काही महिलांना बोलवले.त्या महिलांनी तिला समजावले.त्यांनी तिला आसरा दिला .सकाळ उजाडली आणि बायजा म्हणाली की मला माहेरी नाही जायचं पण मला स्वतःच्या हिमती वरती राहायचे .तुम्ही या गावात मला काही सेवा करायला द्या .तोपर्यंत बायजाच्या माहेरी निरोप मिळाला होता की बायजा गावाला आली .तिची आई वडील तिला भेटायला आले, परंतु तिने माहेरी जायला नकार दिला. बायजा ग्रामपंचायत कार्यालयात जवळच एका खोलीत थोडे दिवस राहिली.मग ग्रामपंचायतच्या कार्यालयात ती थोडं काम करू लागली .
काही लोकांनी तिला आर्थिक मदत केली .यामध्ये बायजाला आठवा महिना लागला .आता तरी माहेरी जा बाळांतीन होऊन तू ये त्यावेळेस आपण तुला काहीतरी काम देऊ असं म्हणून लोकांनी तिची समजूत काढली आणि ती आई-वडिलांकडे गेली. हरीचा जन्म झाला तोपर्यंत तिच्या सासू-सासर्यांनाही ही गोष्ट कळली होती .त्यांनी भेटायला यायचा प्रयत्न केला परंतु बायजा ने त्याला सपशेल नकार दिला.
आता तुमच्या घरात मी येणार नाही माझं जे काय होईल ते मी बघुन घेईल,माझ्या मुलाला सांभाळेल असं तिने रोखठोक सांगितलं .हे सगळं करत असताना मात्र म्हाद्या तिला घ्यायला आला नाही आणि तिच्याशी बोलला नाही .सव्वा महिना माहेरी राहून बायजा आता तिच्या वडिलांना म्हणाली ,”आप्पा आता मीही मोलमजुरी करते कारण मला हरीला वाढवायचे पण मी माहेरात नाही राहणार मला माझ्या पायावरती उभे राहू द्या” तिच्या वडिलांचा नाईलाज झाला .
त्याच गावांमध्ये एक खोली भाड्याने घेऊन ती राहू लागली गावकऱ्यांनी तिला शिवण कामासाठी एक मशीन घेऊन दिली . हळूहळू बायजा बायकांचे ब्लाऊज शिवून देऊ लागली .शिलाई जी काय होती गावात ती तीला मिळायची. फावल्या वेळात ती ग्रामपंचायत मध्ये लोकांचे अर्ज भरून दे, फॉर्म भरून दे अशा गोष्टी करायची. त्याचेही तिला वेगळे पैसे मिळायचे. बोलता बोलता हरी मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. त्याला अंगणवाडीत घातले .त्याच वेळेस अंगणवाडीमध्ये अंगणवाडी शिक्षिका म्हणून भरती होती.
बायजा तशी शिकलेली होती. मग तिने प्रशिक्षण घेतलं अंगणवाडीच्या शिक्षिकेचे आणि बायजा अंगणवाडीला लागली. सरकारी पगार मिळत होता. फावल्या वेळात ती ब्लाउज शिवत होती असं करून बायजानी हरीला शाळेत घातलं होतं .त्याचं शिक्षण पूर्ण होता काळ लोटत होता. हळूहळू रखमा आणि बायजाचा सासरा एकेक करून दोघेही एका वर्षात गेले . म्हाद्या चा मात्र पत्ताच नव्हता .आता हरी पाचवी ला गेला .जरा चांगले शाळेत घालू म्हणून बायजानी आणखीन कष्ट केले. दोन पैसे शिलकीत होते त्यामुळे हरीला चांगल्या शाळेत घालून तिने त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले.
आठवीला हरी गेला त्याला स्कॉलरशिप मिळाली. आता मात्र बायजाचे डोळे त्याच्या शिक्षणाकडे लागले. हरी खूप हुशार मुलगा होता ,तेवढा समंजस होता .लहानपणापासून आईने केलेल्या कष्टाची त्याला जाणीव होती. त्यामुळे आपण अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. आणि तो तसंच करत होता .दहावी झाली बारावी झाली आणि हरीने ठरवलं की आपण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा परीक्षा द्यायची .जेव्हा तो ग्रॅज्युएट झाला त्यानंतर एकीकडे त्यांनी ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्याला यश आलं नाही ,दुसऱ्या वर्षी थोडक्यात यश हुकले पण तो त्याच्या उद्दिष्ट पासून अजिबात डळमळीत झाला नाही.
बायजा त्याला प्रोत्साहन द्यायची रात्र रात्र त्याच्यासाठी जागायची त्याला चहा कॉफी जे हवं ते बघायची .आता भाड्याची का होईना वन रूम किचन खोली बायजानी घेतली .त्या मानाने तो एरिया जरा बरा होता. आता हरीने पूर्णपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि बघता बघता हरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला. बायजा ला काय करू आणि काय नको असं झालं होतं.
आपण एवढे कष्ट केले आणि आपल्या कष्टाचे फळ म्हणजे आज आपला मुलगा सरकारी अधिकारी होणार ही गोष्ट बायजासाठी खूप खूप भूषणावह होती.बायजानी कडकडून मिठी मारली हरीला आणि हरीने ही बायजाचे पाय सोडले नाहीत. “आई ,आज तू होतीस म्हणून मी इथं पर्यंत पोहोचलो. तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायला मी आता तत्पर झालो आहे. तू म्हणशील ती गोष्ट मी तुझ्या चरणाशी आणून देईल.कारण हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाहीये. हरीला काय बोलू आणि किती बोलू असं झालं होतं . बायजाच्या डोळ्यातनं फक्त अश्रू गळत होते निरंतर .त्या अश्रूतली संवेदना बायजाच्या चेहऱ्यावरती एक पुसटसे हसू उमटवत होती.