जानकी (janki)ने टिफीन भरला आणि ती ऑफीसला निघाली. सत्याजित ऑफिस च्या कामा तर्फे बंगलोर ला गेला होता तर अभिजित म्हणजेच सत्यजितचा भाऊ गावाला गेला होता.
लंच टाईम मध्ये आज जानकी आणि श्रीलता डबे खाऊन निवांत बसल्या होत्या. श्रीलता ने जानकीला आज तिच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारले. खरे तर जानकी या गोष्टींची खूप काळजी घ्यायची पण श्रीलता खूप स्वभावाने चांगली आहे आणि ती या गोष्टी फक्त स्वतः पुरत्या ठेवणार असा विश्र्वास जानकीला होता.
जानकी ने सांगायला सुरूवात केली. जानकी म्हणजे श्रीपतराव जरांडे यांची सून .खरे तर श्रीपतरावांना सख्खे भाऊ नव्हते, तर चुलत भावंड होती. श्रीपतराव एकटेच .शेतीवाडी गावाकडे भरपूर होती. आधीच्या पिढीने सगळं व्यवस्थित सांभाळलं .श्रीपतराव आणि त्यांच्या चुलत भावंडांमध्ये तशी पूर्वी एकी होती, कालांतराने जसजशी लग्न होत गेली तस तशी भावंड वेगळी राहत गेली. श्रीपतरावांच्या वडिलांनी कधीच शेतीमध्ये वाटा पाहिजे असं म्हटलं नसल्या कारणाने त्यांना नेहमीच गृहीत धरलं जायचं.
जो वारसा श्रीपतरावांच्या वडिलांनी चालवला तोच वारसा श्रीपतरावांनी पुढे केला. कालांतराने श्रीपतरावांच्या पिढीतील सर्वांचा मृत्यू झाला. अगदी श्रीपतरावांचाही .आणि मग वेळ आली सत्यजीत ची आणि अभिजीत यांनी पुढे वारसा चालवण्याची.यांच्या चुलत काकांनी या दोघांना अगदी एवढ्या मोठ्या शेतीतून फक्त एक एकर जागा दिली आणि त्यांना सांगितलं तुमचा हिस्सा संपला.
खरंतर कोर्ट कचेरी करणं शक्य होतं, पण तेवढा वेळ कुणालाच नव्हता .कारण एक चांगलं काम केलं होतं श्रीपतरावांनी सत्यजितला आणि अभिजीतला उच्च शिक्षण दिलं होतं .त्यामुळे त्या दोघांनी गाव सोडून पुण्यात यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. ही नोकरी करत असताना सत्यजितची जानकी बरोबर ओळख झाली .
जेव्हा सत्यजित काही कामानिमित्त जानकीच्या बँकेत आला होता त्यावेळेस त्याने जानकीला पाहिले. दोघांची ओळख झाली हळूहळू संभाषण वाढलं आणि एक दिवस त्याने जानकीला लग्नासाठी प्रपोज केलं .खरंतर जानकी तशी दिसायला अतिशय सुंदर होती, शहरात वाढली होती. म्हटले तर तिला छान स्थळ मिळाले असते. तिने खूप वेळ घेतला सत्यजितला हो म्हणण्यासाठी, कारण तिच्या घरी संपूर्णपणे उच्चशिक्षित लोक होती आणि त्या मानाने गावाकडे आपली मुलगी कधीतरी का होईना जाणार हा विचार जानकीच्या वडिलांना तितकासा रुचत नव्हता .
पण जानकीने साथ दिली सत्यजितला आणि त्याच्याबरोबर लग्न केलं. सगळं सुरळीत चाललेलं असतानाच एक दिवस जानकीच्या मोबाईल वरती तिच्या ऑफिस मधल्या सहकाऱ्याचा फोन आला. तो रविवारचा दिवस असल्यामुळे सत्यजित ही घरी होता .जानकी हसत हसत फोनवरती बोलत होती .अर्थात थोड्या गप्पा चाललेल्या होत्या परंतु तिच्या बोलण्यात कुठेही अशी कुठलीच गोष्ट नव्हती की ज्याने सत्यजित ने तिच्यावर संशय घ्यावा.
फोन बंद झाल्यानंतर मात्र सत्यजित तिच्यावर चिडला .काही ना काही कारणाने चिडचिड करत होता आणि तिथून त्यांच्या संसारात एक ठिणगी पडायला सुरुवात झाली. खर तर फोनवर अशी कुठलीच चर्चा नव्हती किंवा जानकी दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोलत होती असेही काही नव्हतं .परंतु हसी मजाक मध्ये चाललेल्या गप्पा या सत्यजितला संशयाला बळ देत होत्या .आणि एक दिवस भांडणाचा स्वरूप गंभीररित्या सुरू झालं. जानकी मनातून खचली परंतु तिचा निश्चय पक्का होता एक ना एक दिवस सत्यजीतचा विश्वास मी परत मिळवणारच.
दोघांमधला संवाद कमी झाला आणि त्यांच्यातला दुवा होता अभिजीत. म्हणजे सत्यजित चा भाऊ. जानकीला जे काही बोलायचं होतं ते अभिजीत मार्फत सत्यजित पर्यंत पोहोचत होते तर सत्यजितला जे काय वाटत होतं ते अभिजीत मार्फत जानकीला पोहोचत होते . एका घरात राहूनही या सगळ्या गोष्टी चालत होत्या याचं दुःख जानकीला सत्यजित पेक्षा जास्त होतं .
कारण जरी ती उच्चशिक्षित असली तरी संसाराबद्दल तिला प्रचंड अशी ओढ होती. आणि त्यासाठी तिच्या आई-वडिलांचे संस्कार खूप कामी येत होते .आपण लव्ह मॅरेज केले ही गोष्ट जरी तिला मान्य होती तरी आपण एक संसार छान पद्धतीने करू आणि त्यासाठी आपल्या आई-वडिलांना आपण त्रास देणार नाही असा निग्रह तिने मनाशी केला होता. एक दिवस ऑफिसमध्ये येताना सत्यजित ची गाडी स्लिप झाली आणि सत्यजित गाडीवरून पडला.
डोक्यात हेल्मेट असल्याकारणाने डोक्याला खूप मार लागला नाही परंतु त्याच्या हाताला दुखापत झाली. प्लॅस्टर घालायची वेळ आली. परंतु जानकीबरोबर संवाद नसल्यामुळे त्यांनी अभिजीतला फोन करून सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अभिजीत ने जानकीला सांगितलं. जानकी घाबरली, ऑफिसमधनं निघाली जेव्हा ती ऑफिसमधनं निघाली त्याच वेळेस तिच्याबरोबर ज्या सहकाऱ्या बरोबर ती बोलत होती तो सहकारी होता. कारण त्याची सख्खी बहिण त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती.
त्याच्या मदतीने सत्यजितचे उपचार खूप लवकर चालू झाले. सत्यजितच ऑपरेशन झालं. दोन-तीन महिने सत्यजित घरी होता .त्यावेळेस जानकी त्याची मनापासून सेवा करत होती. आता सत्यजितला स्वतःचे मन थोडं थोडं खात होतं की आपण जे वागलो ते चुकीचं वागलो. आपण जो संशय घेतला तो चुकीचा घेतला असं त्याला वाटत होतं.
परंतु पुरुषी अहंकार असल्याकारणाने त्यानी ही गोष्ट कधीच जानकी समोर व्यक्त केली नाही .जानकी तिचे काम प्रामाणिकपणे करत होती आणि नुसते कामच करत नव्हती तर सत्यजितची होता होईल तेवढी सेवा ही करत होती न बोलता. सत्यजितला हे सगळं करून घेताना खूप वाईट वाटत होतं. पण तरीही आपण कसं पाठीमागे फिरायचं किंवा आपण एक पाऊल कसं मागं जायचं याचा तो विचार करत होता .
आणि नेमकं त्याच वेळेस राखी पौर्णिमेचा दिवस आला. मकरंद देशपांडे म्हणजेच जानकीचा सहकारी त्यादिवशी जानकीच्या घरी आला. तिने छान ताम्हणात राखीची तयारी केली . त्याच वेळेस हॉलमध्ये सोफ्यावरती सत्यजित टीव्ही बघत बसला होता. एक हात त्याचा प्लास्टर मध्ये होता. जानकीने त्याच्यापुढे ताट ठेवून चमच्याने तिने त्याला भरवले.
जेव्हा मकरंद हे दृश्य पाहिले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. जानकीने सत्यजित समोर मकरंद राखी बांधली .त्यावेळेस मकरंद म्हणाला,” ताई भाऊजींना लवकर बर वाटू देत. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात आलेली खळबळ या समुद्रासारखीच आता शांत होऊ दे.तुझं सगळं जीवन निरव शांततेत पार पडू देत .
एका भावाकडून आज तुला वचन देतो जेव्हा जेव्हा तुम्ही दोघेही संकटात सापडाल तेव्हा हा भाऊ तुझ्या पाठीशी सदैव राहील .ही राखी पौर्णिमेच्या निमित्त तुला भेट आणि ही साडी माझ्याकडून माझ्या मिसेस कडून खरंतर ती आज येणार होती पण तिलाही तिच्या भावाकडे जायचं असल्या कारणाने तिने ही साडी तुझ्यासाठी मला घेऊन दिलेली आहे “.
सत्यजितला अतिशय वाईट वाटलं आपल्या वृत्तीचे ,आपण घेत असलेल्या संशयाचं आणि त्या क्षणी तोही रडू लागला म्हणाला ,”मकरंद भाऊ मी चुकलो, माझ्याकडून खरं तर ही गोष्ट घडायला नव्हती पाहिजे पण ती घडली गेली .मी खूप अपराधी आहे मला तुम्ही दोघांनी क्षमा करा “. तेव्हा मकरंद त्याला म्हणाला,” अरे संशय हा तीन अक्षरी शब्द आहे रे पण आपले अख्खे आयुष्य बिघडवून टाकतो.
आपलं अढळ स्थान ते हलवणारा हा शब्द म्हणजे संशय. याला जर तुम्ही तुमच्या डोक्यात जागा दिली तर तो तुमचे आयुष्य जिवंतपणे जळून खाक करतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ असते आणि त्या वेळेचं पालन आपण करायचं. वेळीच आलेले मनातली किल्मिषे दूर करायची, म्हणजे गोष्टी पुढे एवढ्या वाढत नाहीत.” सत्यजित ने मकरंद समोर जानकीची माफी मागितली. त्या क्षणी जानकीने सांगितलं,” मी माफी मागणे इतकी मोठी नाही, कारण माझं पहिलं प्रेम तूच आहेस आणि शेवटचं प्रेमही तूच आहेस .
त्यामुळे माझा पत्नी धर्म मी शेवटपर्यंत पाळणार आणि पाळत आलेली आहे “.” तुझ्या मनात होती ती किल्मीशे तू काढली, मी धन्य झाले “.आणि या सगळ्या गोष्टीत नेहमी साथ देणारा अभिजीत त्या क्षणी हसत होता. कारण त्याच्या वहिनीवर त्याचा पूर्ण विश्वास होता .ही साथ खूप लाखमोलाची असते आणि त्यामुळे संसार सुखाचा होतो हे सत्यजितला पुन्हा उमगले .
जर माझं नाव सत्यजित आहे तर मला सत्याप्रमाणेच वागलं पाहिजे याची जाणीव मला आज झाली असं त्याचं म्हणणं पडलं . आजचे जेवण खूपच रुचकर लागत होतं कारण त्यामध्ये सत्यजितचा विश्वास होता तर जानकीचं प्रेम होते. कुठल्याही घरामध्ये संशयाचे हे वादळ उठण्यापूर्वीच शांत झालं तर असे अनेक जानकी सत्यजित सारखे संसार टिकून राहतील, नाही का?