“कान्हा (Kanha) आवरून घे चल पटकन स्कूल बस येइल एवढ्यात” सारीका ने कान्हाला आवाज दिला आणि ती जुईलीला उठवायला गेली.
कान्हा सातवी मध्ये तर जुईली पाचवी मध्ये होती.कान्हा उठला, त्याने ब्रश करून तो अंघोळीला गेला तरी जुईली अजून उठलीच नव्हती.सारीकाने तिची चादर ओढली आणि तिला ओरडुन उठवले. तो पर्यंत कान्हा बाहेर येऊन त्याने युनिफॉर्म पण घातला होता.सारीका ने त्याला सँडविच लावून दिले. तो पर्यंत त्याने देवाला नमस्कार करुन तो सारीकाच्या पाया पडला. त्याने स्वतःची पाण्याची बाटली भरून घेतली त्याच बरोबर जुईली ची पण भरली.
स्वतःच्या बुटाची पॉलिश करताना त्याने जुईलीच्या बुटाला पण केली.सारीका हे सगळे कौतुकाने बघत होती. आणि वारंवार तिचे डोळे पाण्याने भरत होते. कशी बशी जुईली तयार झाली आणि दोघे जायला निघाले. जुईली चा मूड यायला तसा वेळच लागतो म्हणून कान्हा तिच्या खोड्या काढत असतो. खरं तर ती एक गंमत असते पण जुईलीला ते आवडत नसते. पण तरीही कान्हा तिला खूप जीव लावतो.
दोघेही एकाच शाळेत असल्यामुळे सारीकाला तसे काळजीचे कारण नव्हते.सारीका आता थोडी निवांत झाली. आणि चहाचा कप घेऊन बाल्कनीत बसली. सर्वेश नेहमीच फिरतीवर असायचा म्हणून सगळी जबाबदारी सारीका वर असायची.सर्वेश चा मित्र परिवार खूप मोठा होता. त्यामुळे फॅमिली फॅमिली मिळून सगळेच फिरायला जायचे.
त्यातच होता रोहीत. सर्वेश चां खूप लहानपणीचा मित्र. रोहीत खूप हुशार आणि कष्टाळू होता. त्याचे वडील तो लहान असतानाच गेले. त्यामुळे त्याच्या आईने खूप कष्ट करुन वाढवले होते याची जाणिव त्याला होती.हे सगळे मित्र वर्षातून एकदा फिरायला जायचे. हळु हळु एक एकाची लग्न होत गेली आणि यांचा ग्रुप वाढत गेला. पावसाळ्यात सहल काढायला यांना मजा यायची .रोहितची बायको हर्षा तशी खूप मनमिळाऊ होती. तिलाही आई नव्हती म्हणून रोहितची आई तिला खूप जीव लावायची सगळं सुरळीत सुरु होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.त्या वर्षी सगळे पावसाळ्यात फिरायला गेले.
कान्हा अगदी एक वर्षाचा होता. कोंकणात फिरायला गेले सगळे. रोहीत आणि हर्षा ने कान्हाला सर्वेश आणि सारीका कडे ठेवले आणि दोघे बाहेर पडले. एक चक्कर मारून येतो म्हणून निघाले. बाहेर मुसळधार पाऊस होता. सगळ्यांनी त्यांना समजावले की एवढ्या पावसात जाऊ नका. पण त्यांनी ऐकले नाही. चालत तर जात आहोत म्हणत ते निघाले.अर्धा तास झाला, एक तास झाला, दोन तास झाले तरी ते परत आले नाही.
म्हणून या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या परिवाराला काळजी वाटू लागली. छोटा कान्हा पण आई बाबांची आठवण काढत होता.सर्वेश आणि अविनाश दोघे बाहेर पडले. त्यांनी खूप शोधा शोध केली पण ते सापडले नाहित. बघता बघता संध्याकाळ झाली. आता सगळ्यांनी पोलीस स्टेशन ला धाव घेतली. तिथे बरीच गर्दी होती. तेव्हा समजले की भरधाव एसटी ने एका जोडप्याला उडवले आणि ते जोडपं दुसरे कोणी नसुन रोहीत आणि हर्षा होते.
सगळ्यानी हॉस्पिटल मध्ये धाव घेतली आणि ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेऊन सगळे पुण्याच्या दिशेने निघाले.रोहित च्या आईला काय सांगायचे आणि कसे समजवायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला तर छोटा कान्हा रडून रडून सारीका च्या कुशीत शिरून झोपला.सगळे सोपस्कार पूर्ण करुन दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. धीर गंभीर वातावरणात प्रत्येक जण वावरत होता. रोहीत ची आई पूर्णपणे खचली. हर्षा चे बाबा पण खचले. पण कान्हा कडे बघुन रोहितच्या आईने स्वतः ला सावरले. सर्वेश आणि सारीका रोज कान्हा ला भेटायला जायचे.कान्हा दोन वर्षाचा होणारं तोच रोहीत ची आई हार्ट अटॅक येऊन गेली आणि कान्हा त्या सुखाला ही पारखा झाला.
सगळचं कसं अघटीत घडले होते. डोके सुन्न करणारे. सारीका आणि सर्वेशने कान्हा ला आपल्या घरी आणले त्यावेळी सारीका गरोदर होती.सर्वेश आणि सारीकाला कान्हा ओळखत होता त्यामुळे त्यांच्या बरोबर तो रहात होता पण मनाने त्याला त्याचे आई वडिल आणि आज्जी नजरेपुढे दिसत असावे. वकिलांना भेटून कायदेशीर सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करुन आणि हर्षा च्या वडिलांची संमती घेऊन सर्वेश आणि सारीका ने दत्तक विधी करून कान्हाला स्वतःचे मुल म्हणुन नावं दिले.
पुढे जाऊन जुईली चा जन्म झाला आणि कान्हा ला बहीण मिळाली. आता कान्हा ही सर्वेश आणि सारीका ला आई बाबा म्हणू लागला.आज तोच कान्हा इतका मोठा झाला.त्याच्या येण्याने घरात चैतन्य आले होते. अतिशय समंजस कान्हा कधीतरी नटखट व्हायचा तेव्हा सारीकाला खूप आवडायचे. आता सारीकाला दोन माहेर झाले होते. एकदा ते सगळे हर्षाच्या बाबांकडे जायचे कान्हा ला घेऊन तर एकदा तिच्या माहेरी जायचे. कान्हा ही आता खूप छान रमला होता आपल्या घरात.
दाराची बेल वाजली तेव्हा सारीका भानावर आली. सर्वेश नुकताच त्याची टूर संपवून घरी आला होता. फ्रेश झाला आणि थोडे जेवून झोपला. दुपारी मुले आली की आपण बाहेर जाऊ असे सारीकाला म्हणाला कारण दोन दिवसांवर कान्हाचा वाढदिवस होता.