गोष्ट आहे खऱ्या पुरस्काराची. Emotional attachment ची.हॉल मध्ये हळु हळु करून एक एक मंडळी येत होती. वसुधा आणि सुधाकर हे दांपत्य प्रत्येकाची आस्थेने चौकशी करून त्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करत होते. “मयंक “म्हणजेच सुधाकर आणि वसुधाचे चिरंजीव.
नुकताच तो लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याला छान ठिकाणी पोस्टिंग ही झाली होती. त्या निमित्ताने सुधाकर आणि वसुधाने छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात जवळचे नातेवाईक, त्यांचे मित्र परिवार आणि मयंक चे काही मित्र आमंत्रित केले होते.हे सगळे होते तरी मयंक ची नजर कोणाला तरी शोधत होती. ही गोष्ट वसुधाच्या नजरेतून सुटली नव्हती, पण तरीही आप्तस्वकीयांना ती वेळ देत होती.बघता बघता सगळे यजमान आले. तरीही मयंक थोडा उदास वाटत होता. त्याचे मित्र एकमेकांशी छान बोलत होते, मयंक त्यांच्यात असूनही मध्येच त्याची नजर हॉल च्या प्रवेशद्वारा कडे जात होती.
जेवणाच्या आधी सुधाकर राव आपल्या लेकाचे कौतुक करण्या करीता उभे राहीले. कामाच्या व्यापात आपणं कसे लक्ष देऊ शकलो नाही पण तरीही मयंक च्या सगळ्या गरजा कशा पुरवत होतो हे सगळे ते सांगत होते. उपस्थितांच्या नजरेत नक्कीच कौतुक होते. त्यांचे झाल्या नंतर आजोबा, आजी, काका, काकू, मामा, मावशी असे सगळे तोंड भरुन कौतुक करत होते. मयंक ही सगळयांना नम्रता पूर्वक नमस्कार करत होता.आता नंबर होता वसुधाचा, वसुधा बोलण्यासाठी उभी राहिली. खरं तर तिलाही माहिती होते की करिअर च्या नादात आपण मयंक कडे फारसे लक्ष देऊ शकलो नाही. त्याला काय आवडते काय नाही या सगळ्या गोष्टी आपण दुय्यम मानल्या. हे सगळे करत असताना अनेकदा सुधाकर आणि वसुधा मध्ये वादही झाले होते आणि या सगळ्याचा परिणाम नक्कीच मयंक वर होत होता हे तिने मान्य केले.एका डोळ्यात आसू आणि एका डोळयात हसू अशी तिची अवस्था होती..मयंक ने तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले आणि तिच्या पाया पडून तिला खुर्चीवर बसवले.आता तो पुन्हा त्याच्या जागेवर जाण्यासाठी निघणार एवढ्यात त्याला शारदा ताई त्यांच्या सुनेचा हात धरून आत येताना दिसल्या,.
आणि त्याला काय आनंद झाला…तो पळत गेला आणि त्याने स्वतः शारदा ताईंचा हात धरून त्यांना स्टेज वर नेले आणि आपल्या आई बाबांच्या शेजारी बसवले. आता त्याच्या चेहेऱ्यावर खऱ्या अर्थाने आनंद दिसत होता. त्याने केलेल्या कृतीने वसुधा थोडी अचंबित झाली होती कारण आपल्या घरात एवढी वर्ष मदतनिस म्हणून काम करणाऱ्या शारदा बाई आज आपल्या शेजारी बसल्या, या गोष्टीचा ती विचार करत होती.सगळयांचे बोलून झाल्या नंतर आता मयंक बोलणार होता.त्याने सगळयांना विनम्रतेने नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली.”माझे आई वडील, माझे नातेवाईक आणि माझा मित्र परिवार, आजच्या या आनंदाच्या दिवशी मी तुम्हा सगळयांचे आशिर्वाद घेत आहे याचा मला खूप आनंद होत आहे”.”तुमच्या शिवाय माझे हे यश अपूर्ण राहीले असते, आज जो काही मी आहे यात तुमच्या सगळ्यांचा वाटा आहे”तो असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
आता मयंक ने नमस्कार केला शारदा ताईंना,त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.”शारदा ताई म्हणजे माझी दुसरी आई, एका आईने मला जन्म दिला तर या आईने मला घडवले, माझी प्रत्येक गोष्ट या आईने जपली. आईने माझ्यासाठी कष्ट केले नक्कीच पण ती मला वेळ देऊ शकत नव्हती जो मला या आईने दिला.शाळेतून घरी यायचो तेव्हा दारातून फेकलेले दप्तर, बूट उचलताना रागावलेली शारदा आई आठवते आज. तिने शिस्त लावली, आणि तोंड हातपाय धू गरम गरम पोळी करून वाढणारी शारदा आई माझ्या साठी कोण होती हे मी शब्दात नाही सांगू शकत “.”ताप असताना मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवणारी ही आई वेळ प्रसंगी स्वतःच्या मुला कडे लक्ष देत नव्हती, पण मयंक ची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे ताई साहेबांनी तर ती निभावली पाहिजे असे समजून माझ्या डोक्यापाशी बसणारी ही माऊली नक्कीच आई पेक्षा कमी नव्हती”.मयंक जसजसा बोलत होता तसतसे उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
खरं तर हाच तो दिवस होता शारदाताई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा.मयंक ने पुन्हा एकदा त्यांच्या पायावर डोके ठेवले. शारदा ताई निःशब्द झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या सून बाईना बोलवले, पिशवीतून साडी चोळी ची ओटी काढली आणि त्यांनी सुनेला वसुधाची ओटी भरायला लावली, तसेच सुधाकर रावांना पाकीट आणि नारळ दिले तर मयंक ला जवळ घेत त्यांनी लाल दोऱ्यात गुंफलेले बदामाच्या आकाराचे ओम् चे पदक त्याच्या गळ्यात घातले. मयंक आता खरच गळ्यात पडला. ही माया फक्त अशीच राहू दे म्हणत होता….आता वसुधा आणि सुधाकर यांनाही भरुन आले…. वसुधा आणि सुधाकर दोघेही शारदा ताईंच्या पाया पडले.वसुधाने ही शारदा ताईंची छान साडीने ओटी भरली….आता वातावरण ताजे टवटवीत करण्यासाठी मयंक च्या मित्रांनी पुढाकार घेतला. त्यांनी छान केक आणला होता तो कापून मयंकला खांद्यावर उचलून घेतले आणि सुरु झाले गाणे “ये दोस्ती हम नही तोडेंगे,….”आजचा दिवस काही आठवणींना उजाळा देत संपन्न होत होता… आता वेळ झाली होती सुग्रास भोजनाची आणि सुधाकर राव आणि वसुधा ने एक गुलाबजाम मयंक च्या तोंडात भरवला.