अग भाग्यश्री चिन्मय उठला बघ, तू घे त्याला मी करते पोळ्या”मालती ताईंनी म्हणजेच भाग्यश्री च्या सासूबाईंनी तिला सांगितले.”असू द्या आई थोडा झोका द्या त्याला तो पर्यंत मी कृष्णा (krushna)चा डबा भरते आणि त्याला स्कूल बस मध्ये बसवून येते.”मालती ताई बरे म्हंटल्या. भाग्यश्री कृष्णाला घेऊन निघाली.
मालती ताईंच्या डोळयात पाणी आले आणि नजर फोटोतल्या रश्मी कडे गेली.रश्मी म्हणजे मालती ताईंची सून राघव ची पहिली बायको. सगळं कसं छान होतं सगळं. राघव शिकला, सिव्हिल इंजिनियर झाला. एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये काम करत करत तो खूप काही शिकला आणि त्याने हळु हळु या क्षेत्रात पाऊल ठेवले. तो आता स्वतः जागा मालकांना भेटून तिथे बिल्डिंग बांधू लागला.अशीच एक जागा घेऊन त्याने स्वतः डिझाईन करुन हा बंगला बांधला होता.
मालती ताईंना आणि शरद रावांना काय आनंद झाला होता की आपल्या मुलाने बंगला बांधला.राघवला एक बहीण लीना नावाची. तिचे लग्नाचे वय झाले आणि तिने सांगितले की माझे मयंक वर प्रेम आहे.
खरे तर मयंक ही अतिशय छान मुलगा. घरचे वातावरण संस्कारी त्यामुळे राघव ने पुढाकार घेऊन बहिणीचे लग्न थाटामाटात लावून दिले.आता दोन वर्षांनी शरद रावांनी आणि मालती ताईंनी राघव ला सांगितले की,”आता तुझेही लग्न करायला हवे. मुलगी तू शोधणार की आम्ही शोधू”?राघव म्हंटला नाही ओ आई बाबा तुम्हीच शोधा. आणि सुरु झाले वधू संशोधन.राघवची मामी ,वीणा मामी , तिच्या बहिणीची मुलगी रश्मी चे स्थळ मामी ने सुचवले. नात्यात च असल्यामुळे मयंक च्या आई बाबांना तर पसंत होती आणि पाहता क्षणी राघव ला ही पसंत पडली.
छान लग्न पार पडले आणि राघव चा संसार सुरु झाला. दिवसभर साईट वर असल्याकारणाने रश्मी घरात खूप बोअर व्हायची. मग राघव ने तिला तिच्या आवडीचे बुटिक सुरु करून दिले. रश्मी त्यात रामू लागली.आता लग्नाला दोन वर्ष झाली आणि रश्मी ला दिवस गेले. घरात वातावरण खूप आनंदी होते. दोन तिन महिने छान गेले आणि रश्मी ची शुगर वाढू लागली.
डॉक्टर म्हंटले की कधी कधी हे होऊ शकते पण तुम्ही काळजी घ्या. आता घरात सगळे रश्मी ची काळजी घेऊ लागले. कसे बसे नऊ महिने झाले आणि डॉक्टरांनी सिझर करावे लागेल असे सांगितले. सिझर केले आणि मुलगा झाला. आनंद गगनात मावेनासा झाला.रश्मी आता माहेरी गेली. तिन महिने झाले आणि रश्मी च्या माहेरच्या लोकांनी बारसे ठेवले.”कृष्णा”नावं ठेवले आणि बाळाला घेऊन सगळे आपल्या घरी आले.
कृष्णा वर्षाचा झाला आणि रश्मीने पुन्हा बुटिक सुरु केले. आता मात्र कृष्णा, घर आणि काम हे सगळे तिला सांभाळावे लागत होते.ती दुपारी घरी जायची आणि कृष्णाचे सगळे आवरून त्याला झोपवून परत बुटीक ला जायची.त्या दिवशी ही ती नेहमी प्रमाणे निघाली आणि चौकातच मागून येणाऱ्या बस ची तिला धडक बसली. ती जोरात खाली पडली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. तिला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये दाखल केले. घरी कळले तेव्हा राघव आणि मालती ताई पटकन गेले हॉस्पिटल मध्ये. लीना आणि मयंक ही आले. पण रश्मी कोमात गेली ती त्यातून परत बाहेर आलीच नाही. चार दिवसांनी तिचे निधन झाले. राघव तर पूर्ण कोसळला.दिवस सरत होते लीना ने आणि मालती ताई कृष्णाचा सांभाळ तर करत होत्या. मधेच रश्मीचे आई बाबा ही येत होते.
आपला जावई असा उदास बघुन आणि मुलीचे दुःख मनात ठेवून त्या नातवाला ते बघायचे तेव्हा त्यांना गलबलून यायचे. एक दिवस रश्मीच्या आईने मालती ताईंकडे विषय काढला, म्हंटल्या,”जावई बापुंकडे बघुन खूप वाईट वाटते. आमची लेक तर गेली पण कृष्णा साठी आई हवी. तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी त्यांचे मन तयार करा”मालती ताईंना ही ते वाटत होते, पण त्या कशा बोलणार होत्या. त्यांनी लीना ला व मयंक ला सांगितले. दोघांनी राघवला खूप समजावले की,” तुझे ठीक आहे पण आता कृष्णाला आई पाहिजे. ते प्रेम त्याला मिळालेच पाहिजे “. पण राघवला वाटायचे दुसरे लग्न केले आणि तिने कृष्णाला सांभाळले नाही तर मला अजून वाईट वाटेल.
पण रश्मीच्या आईनेच सांगितले, “आमच्या अमरावतीत एक आश्रम आहे अनाथ मुलींचा. मी तिथे नेहमी जाते. तिथे भाग्यश्री नावाची एक गोड मुलगी आहे. खरे तर रश्मीचे लग्न झाले आणि तेव्हा पासून आम्ही तीच्यातच रश्मी ला पहात होतो. कारण एवढ्या लांब येणे शक्य नव्हते आणि ही गोष्ट रश्मीला ही माहीत होती”. तेव्हा मालती ताई म्हंटल्या,”हो, बऱ्याच वेळा ती तुमच्याशी बोलताना तिच्या तोंडात भाग्यश्री हे नावं ऐकले आहे मी “.झाले तर मग, सगळ्यांचा विचार विनिमयकरून राघव आणि भाग्यश्री चे पुन्हा साध्या पद्धतीने लग्न लावण्यात आले.
कृष्णा तेव्हा पावणे दोन वर्षाचा होता. हळू हळु तो ही भाग्यश्री च्या अंगावरचा झाला. खूप मायेने ती सांभाळत होती त्याला.एक दिवस मालती ताई स्वतःहून तिला म्हणाल्या, की कृष्णाची तू आई आहेसच पण तुझी आई होण्याची इच्छा पण तू पूर्ण कर.
खरे तर आता राघव ही सावरला होता. बिना आई बाबाची पोरं असून भाग्यश्री कृष्णाला किती जीव लावते याचे त्याला खूप कौतुक वाटायचे. त्याची कामे नव्याने सुरू झाली… आणि एक दिवस भाग्यश्री ला सकाळी सकाळी उलट्या सुरु झाल्या.मालती ताईंना लक्षात आले, त्यांनी लगेच राघव ला तिला दवाखान्यात न्यायला सांगितले. येताना दोघेही पेढ्याचा बॉक्स घेऊन आले. तेव्हा शरद रावांना, मालती ताईंना खूप आनंद झाला होता. लीना ही अधून मधुन आपल्या वहिनीची काळजी घ्यायला आणि डोहाळे पुरवायला येत होती. बघता बघता नऊ महिने पार पडले आणि घरात अजून एक वंशाचा दिवा आला.
हॉस्पिटल मधुन घरी आली भाग्यश्री आणि तिला घ्यायला रश्मीचे आई वडील आले. आमच्या लेकीला आता आम्ही दोन महिन्यांसाठी घेऊन जातो. असे म्हणून भाग्यश्री त्यांच्या बरोबर गेली खरी पण सव्वा महिना राहून परत आली.आता बाळ सहा महिन्याचे झाले होते पण भाग्यश्री ने त्या घराला आणि दोन्ही मुलांना खूप जीव लावला होता . घराचे गोकुळ झाले होते.
“आई,अहो बाळ झोपलेच आहे तुम्ही किती वेळ झोका हलवता”? भाग्यश्री चा आवाज ऐकून मालती ताई भानावर आल्या. “चल तो झोपला आहे तो पर्यंत मी ओटा आवरून घेते तू बस इथे”. असे म्हणून त्यांनी भाग्यश्रीला हाताला धरून बसवले आणि त्या किचन मध्ये गेल्या. जातांना परत त्यांनी रश्मी कडे पाहिले आणि मनात म्हंटल्या,”तुझा कृष्णा आनंदात आहे ग या गोकुळात, तुझ्या सारखीच प्रेम करणारी आई त्याला भेटली “.