गोष्ट आहे एका अनोख्या प्रेमाची (love languages)प्रेमाच्या भाषेची.
“आई मी वैदेही ला घेऊन दोन दिवस लोणावळ्याला जाऊन येऊ का”?अनिकेत ने आईला प्रश्न विचारला.”अरे , विचारायचे काय त्यात “?
जा ना… खरं तर मीच म्हणणार होते तुम्हाला की तुम्ही दोघे कुठे फिरून या आणि बाबा व मीही मेघना कडे जाऊन येतो. कारण ती ही बोलवत आहे की आई बाबा तुम्ही या ना दोन दिवस इकडे. विहान ही आठवण काढतो.”अनिकेत म्हंटला”ठीक आहे मग आपण तसेच करू या”.संध्याकाळी अनिकेत ने वैदाहीला बॅग भरण्याची खूण केली. आणि वैदेहीच्या नजरेत एक आनंदाची चमक दिसली.
अर्थात कुठे जायचे? याची तिला माहिती नसल्यामुळे अनिकेत ने तिला हातानेच थांब असे सांगितले. त्याने तिचा वॉर्डरोब उघडला आणि त्याला आवडणाऱ्या ड्रेस चे सिलेक्शन त्याने केले… त्यात एक गुलाबी रंगाची फुलांची साडी होती जी त्याला खूप आवडायची.रोजच्या ऑफीस च्या धावपळीत वैदेही पटकन ड्रेस च घालायची त्यामुळे साड्या फार नेसल्या जात नव्हत्या.आता त्याने निवडलेले सगळे ड्रेस आणि साडी तिने बॅग मधे ठेवली. आणि त्याची बॅग आता तिने भरायला घेतली.दुसऱ्या दिवशी आई बाबांचा निरोप घेऊन अनिकेत ने गाडी गेट च्या बाहेर काढली.
खरे तर रात्रभर पाऊस पडतच होता भूर भूर. त्यामुळे वातावरणात गारवा तर होता पण एक प्रकारचा उत्साह होता.त्याने गाडीत मस्त गाणी लावली जी पावसावर आधारित होती. आणि ते गाणे सुरु झाले “रिमझिम गिरे सावन….”आणि अनिकेत ने एक हात वैदेही च्या हातावर ठेवला. त्या स्पर्शाने तिचे मन मोहून गेले …..कारण हा पाऊस च त्यांच्या पहिल्या भेटीचा साक्षीदार होता.
त्याचे असे झाले होते, त्या दिवशी तो ऑफीस मधुन निघाला आणि त्याची कॅश भरण्यासाठी तो बँकेत गेला. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याचे बँकेत जाणे नेहमीच व्हायचे. त्या दिवशीही असाच खूप मोठा पाऊस पडत होता.त्या दिवशी दोन तारीख होती. खरं तर आदल्या आठवडयात महिना अखेर असल्यामुळें तो गुरुवारीच बँकेत गेला… शुक्रवार शनिवार रविवार अशी सुट्टी असल्यामुळे तो सोमवारी बँकेत गेला होता.पण आज त्या काऊंटर वर त्याला नविन चेहरा दिसला. त्याने स्लीप भरली आणि सबमिट करतांना दिलेली रक्कम आणि त्याने लिहिलेली रक्कम यात हजार रुपयाचा फरक होता.काऊंटर वरच्या त्या मुलीने एकदा हाताने नोटा मोजल्या आणि एकदा मशिन मध्ये नोटा टाकल्या तरीही तो फरक दिसला. तिने खुणेनेच त्याला सांगितले की एक हजार रुपये कमी आहे… त्यावर तो म्हंटला “नाही, मी तर मोजून आणले”परंतु त्याच्या या वाक्यावर तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मग त्याने परत पैसे मोजले तर खरच हजार रूपये कमी होते.त्याने वॉलेट मधुन हजार रूपये काढले आणि ते बंडल परत तिला दिले… तिने ते स्वीकारले आणि एक स्मित हास्य केले…. आता अनिकेत ही हसला आणि त्यानेही एक स्मित हास्य देऊन तिला थॅन्क्स म्हणून निघाला.
पाहिले तर गोष्ट साधीच होती पण माहीत नाही का,अनिकेत ला तिचे लाघवी हास्य सतत नजरेपुढे येत होते. आता तो एक दिवस आड बँकेत जात होता…. पण त्याच्या लक्षात आले की ती कोणाशी बोलत नाही….त्याने तेथील शिपाया कडे चौकशी केली असता त्याला कळले की त्या मॅडम बोलू शकत नाही. आधी त्या छान होत्या पण अचानक त्यांचा घसा दुखू लागला होता….dr नी काही टेस्ट केल्या आणि त्यांना कळले की त्यांच्या स्वर नलिकेला काही प्रोब्लेम आहे. त्यांची छोटी सर्जरी झाली पण त्यांचा आवाज गेला. उपचारांनी त्यांना थोडे बरे वाटले, पण त्या स्पष्ट बोलू शकणार नव्हत्या. पण त्या सगळे ऐकू शकतात. त्या मॅडम महणजेच वैदेही होती अनिकेत ला खूप वाईट वाटले….पण त्याच्या मनात तिच्या बद्दल प्रेम निर्माण झाले. एकदा धाडस करून त्याने तिला लंच टाईम मध्ये बाहेर भेटायला बोलवले.भेटल्या नंतर तो खूप बोलत होता आणि ती कधी हसून तर कधी मान हलवून प्रतिक्रिया देत होती….शेवटी कॉफी पिल्या नंतर एक पाकीट त्याने वैदेही च्या हाती ठेवले… आणि मी गेल्या नंतर ते ओपन कर असे सांगितले…. आणि मी बरोबर दोन दिवसांनी बँकेत येतो असे सांगितले.मधल्या वेळात त्याने आई बाबांना तिच्या बद्दल सांगितले तसेच फोन करून तो आपल्या ताईशी ही बोलला.
आपल्या एकुलत्या एक मुलाने अशा मुली बरोबर लग्न करण्याचा निर्णय घ्यावा याचं त्यांना दुःख न होता खूप आनंद झाला आणि त्याही पेक्षा जास्त अभिमान वाटला.दोन दिवसांनी तो नेहमीप्रमाणे बँकेत गेला आणि कॅश भरली त्याच वेळेस रिसीट देताना वैदेहीने एक एनवलप त्याच्या हातात ठेवले त्याला ते अपेक्षित होतेच तो बँकेतून बाहेर पडला आणि त्याने ते पाकीट ओपन केले. त्यात फक्त एवढेच लिहिले होते मी तयार आहे ,आणि हे वाचून अनिकेतला अतिशय आनंद झाला. त्या संध्याकाळी अनिकेत चे आई-बाबा आणि वैदहीचे आई-बाबा एकमेकांना भेटले आणि त्यांनी लग्नाची तारीख ठरवली . लग्ना नंतर वैदेही ने बँकेतला जॉब सोडून अनिकेत च्या व्यवसायातच त्याच्यासोबत काम करायचे ठरवले.आज अनिकेत आणि वैदेही यांच्या लग्नाला सहा महिने झाले होते .प्रत्येक महिन्यात त्या तारखेला ते दोघे एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देत होते, आणि त्यातीलच एक भाग म्हणजेच आजही ते लोणावळ्याला निघाले.खरे तर प्रेमाला कुठली भाषा नसते .असतो तो विश्वासाने खांद्यावर ठेवलेला हात. आणि मी आहे बरोबर म्हणत हातात घेतलेला हात.बघता बघता लोणावळा कधी आला ते कळलेच नाही. दोघेही हॉटेल च्या रूम मध्ये गेले. फ्रेश झाले.. जेवण करून थोडा आराम केला आणि आता फ्रेश होऊन ते बाहेर पडणार होते.अनिकेत ने ती गुलाबी साडी नेस असा लाडीक हट्ट केला आणि वैदेहीने ही तो पुरवला. वैदेही छान तयार होऊन बाहेर आली तेव्हा अनिकेत एक टक तिच्या कडे बघत होता… आता ते बाहेर पडले.. हॉटेल च्या बाहेरचा परिसरच इतका सुंदर होता की लांब कुठे जावे असे वाटलेच नाही…. खरं तर वैदेहीला भिजायला खूप आवडते हे अनिकेत ला माहिती होते… म्हणून त्याने छत्री जरी बरोबर घेतली असली तरी ती त्याने पटकन बाजूला करून बंद केली.. आता पावसाचे थेंब वैदेही च्या चेहेऱ्यावर ओघळू लागले…. अनिकेत तिथेच एका बाजूला बसुन तिचे फोटो काढत होता. त्या साडीत तिचे सौंदर्य जास्त खुलून दिसत होते….बऱ्याच वेळ भिजून झाल्यानंतर ते दोघे पुन्हा रूम मध्ये आले…. कडक चहाचा कप वैदेहिच्या पुढ्यात धरत अनिकेत गाणे गुणगुणत होता “एक लडकी भिगी भागीसी…”