दुपारचा डबा | Lunchbox

आपण शाळेत होतो तेव्हा दुपारचा डबा (Lunchbox) म्हंटलं की भाकरी आणि लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी. ते पण फडक्यात भाकरीच्या मधोमध चटणी ठेवून मग भाकर गुंडाळून फडक्याने अगदी करकचून आवळून बांधली जायची. अगदी शहरातली असले तर चपाती आणि भाजी ते पण स्टीलच्या डब्यात.


आजकाल मात्र याचे नामोनिशानही राहिले नाही. आजकालच्या आपल्यासारख्या आधुनिक आया मुलांना डब्यामध्ये दररोज एक नवीन पदार्थ करून देतात ते पण दोन मुले असली तर एकाची वेगळा डब्बा आणि दुसऱ्याचा वेगळा डब्बा का तर एकाला जे आवडते ते दुसऱ्याला आवडत नाही आणि त्या आया सुद्धा अगदी अभिमानाने बाहेर सांगतात मला बाई दोन दोन डबे करावे लागतात.

खरं सांगा ही अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का? जर लहानपणापासूनच दोघांनाही सारखे डब्बा द्यायची सवय लावली तर आपलाही वेळ वाचतो आणि मुलांनाही खायची सवय लागते. बरं दररोज एक नवीन स्टाईलचा पदार्थ तो डबा अगदी सजवून दिला जातो आणि मग शाळेतून आल्यावर दररोज आई मुलाला विचारते “बाळा आवडला का डब्बा तुझे मित्र काय म्हणाले मैत्रिणी काय म्हटल्या” आणि तो मुलगा किंवा मुलगी ही अभिमानाने सांगते “आई तो म्हणत होता तू किती लकी आहेस तुझी आहे तुला जर रोज वेगवेगळे पदार्थ देते आमची आई तर एकच देते दररोज” आणि हे मुलाने सांगितलेले ऐकले की त्या आईच्या डब्याला अगदी मोक्ष मिळतो.

सोया सॉस’ मॅगी मसाला, टोमॅटो सॉस, बार्बेक्यू सॉस’ वेगवेगळ्या फ्रुट चे जाम’ नूडल्स, सॅंडविचेस हे आहेत आजकालच्या मुलांचे डबे. बरं त्यात पण अजून डेकोरेशन मग वेगवेगळ्या कलरचे नूडल्स इडल्या वगैरे वगैरे खरंच आपण मुलांना पौष्टिक डब्बा देतो का? अजूनही गावाकडच्या शाळेत मुले भाजी भाकरी किंवा चपाती भाजी घेऊन जातात. मग गावाकडची मुले हुशार नाहीत का? आणि शहरातील मुले आधुनिक पदार्थ खातात म्हणून ती खूप हुशार आहेत असं काही आहे का?

आजकाल मुलांनी एकमेकांचा डब्बा उघडलेला पाहिला आणि समोरच्या डब्यात जर काही आधुनिक पदार्थ नसेल तर लगेच नाक मुरडतात कितपत योग्य आहे हे? बरं काही आया तर सकाळच्या मुलाची डब्याची तयारी रात्रीच करून ठेवतात मग ते फ्रीजमध्ये किंवा बाहेर साहजिकच आहे कारण काही आया जॉबलाही जातात त्यामुळे त्यांना सकाळी वेळ मिळत नाही. पण दोन मुलांचा डब्बा बनवायला अगदी अर्धा तास सुद्धा लागत नाही.

साधी चपाती भाजी मसाले भात भाकरी चटणी थालपीठ मोड आलेले कडधान्य असे काही सेट डब्याला दिले तरी मुले मुले अगदी सहज खाऊ शकतात पण आजकालच्या आयांना मुलांच्या खाण्यापेक्षा डब्बा डेकोरेशनच जास्त पडलेल असतं आणि अगदी अभिमानाने सांगतात आमचा पिंट्या काल सांगत होता..त्याचा मित्र म्हंणत होता तुझी आई किती छान छान पदार्थ बनवते माझी आई तर असे पदार्थ बनवतच नाही.

Really……. या मुलांना शाळेत शिकायला पाठवतात की डब्याची स्पर्धा करायला पाठवतात तेच कळेनासे झाले आहे. नुकताच माझा पुतण्या गावाकडच्या शाळेतून शहराकडे च्या शाळेत गेला. माझ्या पुतण्याला गावाकडे अगदी कालवणात भाकर चुरून खायची सवय डब्यातही त्याला भाजी आणि भाकर दिली जायची. पण जसा तो शहराकडे शाळेत आला आणि गावाकडच्या सारखा डब्बा आणू लागला शिक्षकांनी अक्षरशः आई-वडिलांना बोलवून असा डबा देत नका जाऊ असे सांगितले डबा हा डबा असतो. त्यात काय असावे आणि काय नसावे हे सर्वस्वी त्या मुलाच्या किंवा त्या आईच्या मनावर आहे. म्हणजे बघा यांच्या सोया सॉसने जामने यांना कसलीही ऍलर्जी होत नाही पण भाजी भाकरीने मात्र शहराकडच्या मुलांना खूपच ऍलर्जी होते.

स्वयंपाकाचा कंटाळा येत असल्यामुळे फास्ट फूड ही संकल्पना सगळ्यांना सोपी वाटते. पण त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर किती परिणाम होतो हे मात्र लक्षातच घेतले जात नाही. किंवा जास्तीचा स्वयंपाक करून फ्रीजमध्ये ठेवणे आणि तो दररोज खाणे हे सुद्धा मुलांच्या आरोग्यास खूपच हानिकारक आहे.


काही आया तर फक्त फोटोसाठीही असे डबे बनवतात की बघा माझ्या मुलाला मी किती छान डब्बा दिला. मुलांना जर अशीच सवय लागली तर पुढे जाऊन देव न करो पण कठीण प्रसंगाला तर कसे तरणार आहेत ही मुले. आपला भारतीय आहार हा एक उत्तम चौरस आहार म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातोपण भारतीय आईंना मात्र आपल्या देशाचा चौरस आहार सोडून परदेशातील पदार्थ बनवायची जणू हौस च आली आहे.
असो खूप दिवस हा मुद्दा माझ्या डोक्यात घोळत होता शेवटी आज मी लेखणीतून उतरवला.

@सीमाशंकर.

Leave a Comment