आपले सगळे संपले आता….असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो ना तेव्हा तीच खरी नवी सुरवात असते. (New Beginning )
“शिला काळे हाजिर हो “असा आवाज आला आणि ती गर्दीतून वाट काढत आपल्या कोर्टात हजर झाली.कौटुंबिक न्यायालयात आज शिला ची तारीख होती. तसे पाहिले तर ही दुसरीच तारीख होती. गेले सहा वर्ष झालं शिला आपल्या माहेरी राहत होती .तिला एक छोटा मुलगा होता आणि त्याचं नाव अमित. तो पोटात असतानाच शिलाच्या सासरच्या लोकांनी तू बाळांतपणाला जा म्हणून तिला माहेरी सोडले ते परत तिला घ्यायला आलेच नाही.
आता सात वर्षे होणार होती तोच तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. शिलाच्या माहेरची परिस्थिती तशी मध्यमवर्गीय .आई वडील दोन भाऊ आणि शीला असं त्यांचे कुटुंब होते .त्यापैकी एका भावाचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं, त्यामुळे घरात वहिनी पण होती .अमित तसा तीन वर्षाचा झाला तसा शिला नी त्याला बालवाडी टाकलं, आणि त्याचा खर्च शिलाचे बाबा करत होते. शिलालाही आयत बसून खायला नको वाटायचं ,म्हणून ती ही एका ठिकाणी जॉबला जात होती .पण जशी कोर्टाची नोटीस आली घटस्फोटाची तसं तिने जॉब सोडला . पहिल्या तारखेला शीला फक्त हजर राहिली कारण वकिलांची तितकी तिची गाठभेट होत नव्हती त्यामुळे तिचे जे वकील तिने लावले होते त्यांनी फक्त सांगितलं की पहिल्या तारखेला हजर रहा .आज तिची कोर्टाची दुसरी तारीख, आज तिचा नवरा रुपेश पण कोर्टात आला होता. पण दोघेही एकमेकांची तोंड बघत नव्हते. खर तर घटस्फोट होण्यामागे नक्की कोण जबाबदार हा मात्र प्रश्न कायम शिलाच्या मनात राहिला.
कारण शिला ही एकुलती एक मुलगी आणि दोघ भाऊ होते .योग्य वयात लग्न व्हावं असं तिच्या आई-वडिलांनी नेहमी वाटायचं. एका मध्यस्थांच्या मार्फत रुपेशच स्थळ काळे कुटुंबीयांना आले .मुलगा शिकलेला आहे नोकरी करतो आणि त्याला तीन बहिणी आणि तो एकटा व आई वडील असं त्याचं कुटुंब होतं. अर्थात दोन बहिणींची लग्न झाली होती आता एक बहीण लग्नाची राहिली होती . शिला तशी सोज्वळ मुलगी होती तारुण्य जरी असलं तरी तिचा पाय कधीच घसरला नाही. खालची मान वर न करणारी ही मुलगी .वडील म्हणतील त्या गोष्टीला ती तयार झाली. आपल्या आई वडिलांना आपल्यामुळे त्रास होऊ नये इतकं साधं तिचं गणित होतं. आपल्या नंतर आपल्या दोन्ही भावांची लग्न व्हायचेत त्यामुळे आपण व्यवस्थित आता उचित वयातच लग्न करू आणि आई-वडिलांचा भार हलका करू असं म्हणून तिने रुपेशच्या स्थळाला हो म्हटलं होतं. पहिलं वर्ष कसं बसं गेलं. प्रत्येक घरात चालणाऱ्या कुरबुरी असतात असे म्हणुन याकडे शिलाने त्या गोष्टींकडे पाठ फिरवली आणि ती राहू लागली.पण रुपेश तर वागणं काहीसं वेगळंच होतं .उशिरा घरी येणं तिला व्यवस्थित वागणूक न देणं ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, आणि त्याच्या या वागण्याला त्याचे आई-वडील साथ देत आहेत हे शिलाच्या लक्षात आलं. कसं बस आठ नऊ महिने झाले आणि शिलाला कळलं की आपण आई होणार आहोत. एकदा वडील झाल्यावर तरी रुपेश सुधारेल या खोट्या भ्रमात ती आलेला दिवस काढत होती. तिची तब्येत तिला इतकी साथ देत नव्हती कारण अशा अवघडलेल्या अवस्थेतही तिला घरातली सगळी कामे करावी लागत होती .आणि या तिच्या सासूबाईंची तिला साथ नव्हती तिने याबद्दल माहेरी कधीच आपली तक्रार नोंदवली नाही. कारण सहनशीलता काय असते हे फक्त शिलाला माहिती होतं. आणि आपल्यामुळे आपल्या माहेरच्या लोकांना त्रास होऊ नयेत आपल्या भावांना चांगली स्थळ मिळावी म्हणून ती सहन करत गेली.
जसा सातवा महिना लागला तसा शिलाची आई म्हणली की,” आम्ही शिलाला आता माहेरी नेतो, डोहाळे जेवण करतो .डोहाळे जेवणाला सगळ्यांनी या”. शीला माहेरी गेली . खरे तर आई-वडिलांच्या इच्छेसाठी आणि तिलाही रुपेश आधी बरा वाटायचा त्यामुळे त्यांनी होकार दिला होता .परंतु जेव्हा ती सासरी गेली तेव्हा एक दोन वेळा रुपेशच्या बोलण्यात आलं की मला तशी तुझ्याशी लग्न करायची इच्छा नव्हती पण आई-वडिलांच्या इच्छेखातर मी तुझ्याशी लग्न केले, त्यामुळे तू माझ्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नकोस .हे ऐकल्यानंतर शिलाला अतिशय वाईट वाटले, पण काळ जाऊ देत आपण त्याला संधी देऊ असं म्हणून ते तिथेच राहिली .काही क्षण असे असतात आयुष्यात नकळत घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. त्याचप्रमाणे शिलाला राहिलेली प्रेग्नसी हा त्यातलाच एक भाग होता .त्यामुळे आता या गोष्टीसाठी आपण पोटच्या जीवाला मारायचं नाही त्याला जन्म द्यायचा या एकाच गोष्टीवरती शिला ठाम होती. आणि तिने जे होईल ते होईल आपण आईपण स्वीकारायचं असं म्हणून ती प्रेग्नेंसी राहू दिली. त्याच्याही आई-वडिलांना असं वाटलं की एकदा बाप झाला की आपला मुलगा थोडासा सुधारेल पण ते तसं कधी दाखवत नव्हते. आणि शीला माहेरी गेली . तीने सांगितले की डोहाळे जेवण वगैरे काही करायचे नाही.
यथावकाश अमित चा जन्म झाला.रूपेश चे आईवडील फक्त एकदाच बघायला आले.रूपेश ने तर तोंड पण पाहिले नव्हते मुलाचे. अमित लहान होता त्याच्याकडे लक्ष दिल असं म्हणून तिने ट्युशन घ्यायला सुरुवात केली.आईला घरकामात हातभार लावत होती .भावांचा तसा सपोर्ट होता पण लग्नाच्या आधी बहिणीची माया आणि लग्नानंतरच्या बहिणीची माया यामध्ये फरक पडतो. नकळतही भावंड थोडीशी तुटक तुटक वागायला लागली .मग शिलाला कळून चुकलं की आता आपल्याला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहायचे. कारण अमितचा आपल्याला सांभाळ करायचा आणि त्याच दरम्यान मोठ्या भावाचं लग्न झालं. वहिनी तशी एक दोन महिने चांगली राहिली ,पण नंतर नंतर तिला शीलाचा आणि अमितचा त्रास जाणवू लागला. कुठेतरी त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते असे तिला वारंवार वाटायचं, आणि त्यातून तिची थोडीशी धुस पुस व्हायला लागली. आई वडिलांचही हेच म्हणणं असायचं की शीला बाळा आपली पडती बाजू आहे आपण सांभाळून घेतलं पाहिजे. शिलालाही ती गोष्ट कुठेतरी पटायची ,त्यामुळे ती कायम नमते घेत आली.एकटीच बाथरूम मध्ये जाऊन रडायची आणि बाहेर स्वच्छ तोंड पुसून यायची .आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना त्रास नको ही एकच तिची भावना असायची. आणि तो दिवस उगवला सकाळी सकाळीच कोर्टाचा बेलीफ नोटीस घेऊन दारात आला .शीलाच्या नावाचे आहे म्हटल्यावर शिलाने ओळखलं आणि ती नोटीस घेतली. तिच्या मैत्रिणीचा माधुरीचा भाऊच वकील होता त्यामुळे तिने त्याच्याकडे ती केस फाईल करण्यासाठी ती गेली . विवेकने तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. एक ड्राफ्ट तयार केला आणि तो कोर्टाकडे सबमिट केला पहिल्या तारखेला. आता ही दुसरी तारीख पडली .आजही रुपेश तिथे आला होता. कोर्टाने ऑर्डर दिली की पुढे केस फाईल करायचा आधी तुम्ही एकदा समुपदेशकाचा सल्ला घ्या. त्याप्रमाणे समुपदेशच्याकाचे नाव जाहीर झाले आणि तिथे शीला आणि रुपेश गेले .जोशी मॅडम समुपदेशक होत्या. त्यांनी सुरुवातीला रुपेश ची बाजू ऐकून घेतली .रुपेशने बऱ्याचशा गोष्टी खोट्या सांगितल्या हे शिलाला कळत होतं ,पण शिला त्यावेळेस काहीच बोलली नाही. मग त्यांनी शीलाशी बोलायचं प्रयत्न केला आणि शिला ने जे आहे ते सत्य सांगितलं . तिने अशा काही गोष्टी सांगितल्या की जिथे रुपेशला थोबाडीत मारल्यासारखं झालं आणि तो खोटा पडत होता हे त्याला जाणवलं.ती तारीख संपली आणि शिला घरी गेली .
घरी गेल्यानंतर पाहिलं तर अमित थोडा रडत होता ,आई त्याला समजावून सांगत होती. जशी शिला गेली तशी शिला नी विचारले” अरे बाळा का रडतोस “?तेव्हा त्याने सांगितलं ,”मामीने माझ्या दोन थोबाडीत मारल्या “मग शिलाने आईला विचारलं ,”काय झालं आई “? “अगं काही नाही, त्याच्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि योगिनी ने त्याला दोन चापट मारली”. शिलाने अमितला समजून सांगितलं .पण अमितच्या मनात मामी बद्दल थोडासा राग होता. झालं आता अगदीच थोडे दिवसाचा प्रश्न आहे आणि एवढा निकाल लागला की आपण काहीतरी व्यवस्था करू असं शिलाने मनाशीच ठरवलं. छोट्या अमितला मात्र या सगळ्या गोष्टी पासून लांबच ठेवायचं हे शिलाच्या मनाने ठरवले होते .पुढच्या महिन्यात शिला जेव्हा तारखेला गेली त्यावेळेस समुपदेशकांनी पण पुन्हा एकदा दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुपेश बरोबर त्याचे आई-वडील पण आले होते .बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर आणि लग्नानंतर घडलेल्या प्रत्येक गोष्टी कशाप्रकारे घडल्या ,या शिलाच्या विरोधात तिच्या सासू-सासर्यांनी पण सांगितल्या .आता शिलाला खरंच वाईट वाटलं का हा स्त्री जातीचा जन्म ?असा मनात तिच्या प्रश्न आला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल एवढं खोटं कसं वागू शकते? शिलाने आता मनाशी पक्क केलं की ह्या माणसाबरोबर राहायचं नाही. तिने आपल्या वकिलालाच म्हणजे विवेकला सांगितलं की होता होईल तेवढं समजूतीने आपण घटस्फोट घेऊन मला मोकळं कर. विवेकला खरंच शिलाचे खूप वाईट वाटत होते .
एक मुलगा पदरात असताना आणि बाहेर अशी परिस्थिती असताना आपण तिला साथ देणं गरजेचं आहे. पण या लोकांच्या तावडीत ती पुन्हा जाऊ नये . त्यामुळे विवेकनेही तिला दिलासा दिला की मी लवकरच तुला यातून बाहेर काढतो .ते दोघं समुपदेशकाच्या बाहेर रूमच्या बाहेर आल्यानंतर विवेक आत मध्ये गेला .त्यांनी समुपदेशकांची चर्चा केली समुपदेशकांनी ,जोशी मॅडमनी त्याला सांगितले की ,”हो मला असे वाटते की ती मुलगी तिथे सुखात राहू शकत नाही पण हा निर्णय कोर्ट देऊ शकेल मी नाही”. विवेक म्हटला ठीक आहे आणि त्याने रुपेश ला गाठले रुपेश च्या वकिलांशी तो बोलला रुपेश च्या वकिलांसही तेच म्हणणं पडलं की रुपेश जरी माझा अशील असेल आणि ही केस जरी मी घेतली असेल तर माझ्यातली माणुसकी अजूनही शाबूत आहे. मला कळून चुकले की शिला तिथे सुखी राहू शकणार नाही .मी उगाच फी साठी या सगळ्या गोष्टी करणार नाही .त्याने रुपेशलाही सांगितले ,”जर तू सांभाळ करण्यास सक्षम नसशील तर तिला मोकळे कर “.रुपेशलाही ती गोष्ट पटली. त्याने म्युचल अंडरस्टँडिंग वरती आपण घटस्फोट घेऊ हा प्रस्ताव ठेवला आणि त्याला शिलाने होकार दिला .खरं तर तिला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती पण रुपेश च्या वकिलांनी आणि विवेकने म्हणजेच शिलाच्या वकिलांनी हा एक निर्णय घेतला की त्याने अमितच्या नावावर तरी काही रक्कम ठेवावी. अशा पद्धतीने समजूतीने साधारणतः त्याच्या पुढच्या महिन्यातच शिलाचा घटस्फोट झाला.
खऱ्या अर्थाने शिला मानसिक दृष्ट्या ढासळली होती पण अमितचा सांभाळ करायचा आहे आणि त्याला मोठे करायचा आहे या एका विचारीने तिला खंबीर बनवले .आता तो दिवस आला, सगळं पार पडल्यानंतर विवेकने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. ती अमितला घेऊन गेली .विवेकने अमितशी खूप छान गप्पा मारल्या आणि थोडेसे दोघांचे बोलणे झाल्यानंतर त्यानी सांगितलं ,”की आता पुढच्या वेळेस येशील त्यावेळेस तू आईला घेऊन ये अमितला घरीच ठेव”. शिलाला प्रश्न पडला की विवेक असं कशासाठी म्हटला असेल? एक आठ दिवसाच्या अंतराने शीला आणि तिची आई विवेकच्या ऑफिसमध्ये गेले.आता शिला थोडी सावरलेली होती .बोलता बोलता विवेकने शिलाच्या आईला विचारले की,” आता तुमचा काय विचार आहे? शिलाचे उर्वरित आयुष्य तिने कशा पद्धतीने काढावे आणि जगावे यासाठी तुम्ही काय विचार केलेला आहे “?त्यावर शिलाची आई म्हटली ,”आम्ही तर खूप काळजीत आहोत खरं तर, आत्ताशी पहिली वहिनी तिला आलेली आहे अजून धाकट्याचे लग्न व्हायचे आहे आणि अशा परिस्थितीत ती इथे असणं हे आमच्यासाठी नाही तर तिच्यासाठी खूप त्रासदायक आहे आणि तिचा त्रास आम्ही बघू शकत नाही. तिची होणारी घालमेल आमच्या डोळ्यांना सहन होणार नाही तर आम्हालाही असं वाटतं की तिने दुसऱ्या लग्नाचा विचार करावा”. हे ऐकल्याबरोबर शिलाने आईकडे चमकून पाहिले. “आई अग माझ्या पदरात एक मुलगा आहे ,मला कोण स्वीकारणार”? आता आणि जर तुम्हाला मला सांभाळायचं नसेल तर मी दुसरीकडे राहते ,कष्ट करते फक्त मला बाहेरून सपोर्ट करा. त्यावर विवेक म्हणाला,” हे सगळं करण्याची काय गरज आहे ?तू तुझ्या हक्काच्या घरात राहू शकतेस अगदी मायेनेच अमितचे पालन होऊ शकते “.
शीलाला कळेच ना विवेक असं काय बोलतोय ते. मग तो म्हटला,” शिला माधुरीने मला तुझी सगळी परिस्थिती सांगितलेली आहे .आणि तसही मी तुला लहानपणापासून बघतोय .जशी तुझी माधुरीची मैत्री झाली तशी तू आमच्या घरी येत होतीस माधुरी तुमच्या घरी येत होती त्यामुळे माधुरीने मला तुझ्यावरचे संस्कार ,तुझा स्वभाव याबद्दल सगळं सगळं सांगितलेल आहे .आणि आज मी आईसमोर शब्द देतो की मी अमित सहीत तुला स्वीकारायला तयार आहे”. शिलाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले, तिला काय बोलावे तेच समजेना .आईने तिला कुशीत घेतले आणि त्या परमेश्वराचे आभार मानले की सत्याच्या बाजू पुढे आणि एका चांगल्या व्यक्तीच्या मागे खूप खडतर प्रवास असला तरी त्याचा प्रवास यशस्वी होऊन तो त्याच्या ध्येया पर्यंत नक्कीच पोहोचतो .यात स्वामींची साथ खूप मोठी आहे. आज शिला आणि विवेक चा सुखाचा संसार सुरू आहे आणि अमित बरोबर खेळायला सुमित आलेला आहे.