पाऊस | Rain

पाऊस (Rain) असंख्य आठवणी घेऊन येतो. अगदी मनाच्या तळा पर्यँत ओळखडे उमटवतो. न बऱ्या होणाऱ्या वेदना देऊन जातो कधी कधी………”विशू मी निघतो ग, भेटू संध्याकाळी”म्हणत विवेक ऑफीस ला जायला निघाला. खरे तर पाऊस खूप होता, पण अर्जंट मीटिंग असल्यामुळे त्याला जाणे गरजेचे होते. कदाचित मीटिंग लवकर संपली तर स्टाफ ला कामे देऊन मी घरी येइल असे म्हणून त्याने टिफीन ही नेला नाही. नाश्ता करुन तसाच निघाला.

विशू ने नेहमी प्रमाणे त्याला बाय केले खरे पण आज ती उदास दिसत आहे हे विवेक ने ही टिपले. परंतु ऑफीस ला जाण्याची घाई असल्यामुळे त्याने तिला कारण विचारले नाही.विशू ही स्वतःचा चहाचा कप घेऊन तिच्या नेहमीच्या खिडकीत येऊन बसली… बाहेर पावसाळी वातावरण होते. खिडकीत तिने छान बैठक केली होती जिथे ती बऱ्याच वेळा बसत असत अगदी विवेकच्या सुट्टीच्या दिवशी पण तिला कधीतरी दिवसभरातून एकदा त्या खिडकीत बसायला आवडत असत.बाहेर च्या गार्डन मध्ये नानाविध फुल झाडे फुलली होती. जाई जुईचा मंद सुगंध सगळी कडे पसरला होता. खरे तर त्या फुलांकडे बघुन तिला हलकेसे बरे वाटले.

तिने मोबाईल वर गाणे लावले,” धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना…..आणि अचानक पावसाचा जोर वाढला तिचे लक्ष बाहेर गेले. सकाळी नऊ वाजता ही सगळे अंधारून आले होते. आणि प्रचंड पावसाला सुरुवात झाली आता मात्र तिला रडू फुटले… गेल्या पाच वर्षांत दर पावसाळ्यात हे असे तिला व्हायचे.त्याचे कारणही तसेच होते.विशू तशी एकुलती एक मुलगी म्हणुन देशपांडे दांपत्य तिचे खूप लाड करायचे. अभ्यासात हुशार, दिसायला देखणी असणारी विशू कॉम्प्युटर इंजिनियर झाली आणि छान जॉब ला लागली. पण तिचा कॉलेज चा एक ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये नेहा, पियूष, विवेक, मयूर, तन्मय, मल्हार, यामिनी असे सगळे होते.

तन्मय, विशू आणि विवेक हे तसे जवळ जवळ रहात होते. त्यामुळे विशूला काहीही अडचण भासली तरी ते धावून जात होते. हळु हळु तन्मय ला विशू बद्दल प्रेम निर्माण झाले जरी ती एकुलती एक होती तरी तिच्यातली शालीनता, आई बाबांप्रती असणारी तिची काळजी आणि जबाबदारी ती यथायोग्य पार पाडत होती. एक दिवस यांचा ग्रुप बाहेर पिकनिक ला गेला. ते दिवस ही पावसाचेच होते. छान गप्पा गोष्टी सुरु होते. रिसॉर्ट वर पोहचल्यावर संधी मिळाली की तन्मय तिला प्रपोज करणारं होता आणि त्या पद्धतीने त्याने विवेकला थोडा माहोल तयार करायला सांगितला होता. विवेकने ही सगळे प्लॅनिंग केले होते आणि तो क्षण आला.

विवेकने बाकी सगळ्यांना घेऊन रिसॉर्ट च्या एका पॉइंट वर जाण्याचा निर्णय घेतला जेणे करून त्या दोघांना प्रायव्हसी मिळेल.इकडे विशूला कळलेच नाही की तन्मय मला का जाऊ नको म्हंटला.थोड्या गप्पा झाल्या नंतर त्याने हळूच तिला म्हंटले की,”विशू मी अजिबात फिल्मी स्टाइल तुला प्रपोज करणार नाही, सरळ सरळ विचारतो तू माझ्याशी लग्न करशील”? हे ऐकल्याबरोबर विशू ला काय बोलावे समजेच ना. तो म्हंटला मी ही एक जबाबदार मुलगा आहे आणि तू ही ज्या पद्धतीने आई बाबांची काळजी घेतेस ते बघुन असे वाटते की ही जबाबदारी आपण दोघे मिळून घेऊ.

दोघांच्या आई बाबांचा सांभाळ आपणं दोघे मिळून करू…. एवढे बोलून त्याने तिला एक डायरी आणि पेन दिले…. हेचं माझ्याकडुन तुला गिफ्ट… तुझा होकार असेल तर तू त्यात तुझ्या अपेक्षा लिहून ती डायरी घेऊन तू त्या ठिकाणी येशील जिथे आपले मित्र गेले आहेत. मी निघतो तू तयार होऊन ये. जरी डायरी नाही दिली तरी हरकत नाही मी समजून जाईल. एवढे बोलून तो निघाला.आता तर विशू ला काय बोलावे तेच कळेना मित्र म्हणून तिला त्याचा खूप आधार होता.तिने खूप विचार केला आणि डायरीत लिहीले आता जसा मित्र आहेस तसाच कायम राहशील तर माझी तयारी आहे पण आई बाबांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या संमतीने पुढे जाऊ तीने डोळे पुसले आणि ती तयार होऊन निघाली.सगळ्यांच्या मध्ये सामील झाली तरी थोडे दडपण तिच्या चेहेऱ्यावर दिसत होते.

पण तन्मय आणि विवेकने हास्य विनोद करून वातावरण ताजे ठेवले. तिच्या हातात पर्स होती आणि त्यात ती डायरी होती.सगळ्यांनी ते वातावरण एन्जॉय करुन जेवणासाठी रिसॉर्टच्या डायनिंग एरिया कडे प्रस्थान केले. खरे तर विवेकला माहीत होते की विशू हो म्हणणार म्हणुन त्याने तिथे आधीच केक साठी ऑर्डर दिली होती.विशू आणि तन्मय मुद्दाम हळु चालत होते आणि मध्येच विशू ने तन्मयला थांबवले. क्षणभर तन्मयला टेन्शन आले होते पण आतले मन सांगत होते की सगळे छान असणारं आहे.

विशू ने ती डायरी त्याच्या हातात दिली आणि स्माईल दिली. त्या बरोबर तन्मय च्या डोळयात एक चमक दिसली…. दोघांनी हातात हात घेतला, त्या दिवशी त्या स्पर्शाला एक वेगळीच ओढ होती हे दोघांना ही जाणवले.दोघे जेवणाच्या ठिकाणी हसत हसत आले आणि समोर केक बघुन आश्चर्यचकित झाले. त्यांनी केक कापला आणि आपला हा आनंद सगळ्यांबरोबर साजरा केला. दुसऱ्या दिवशी सगळे घरी निघाले.परतीचा प्रवास खूप काही आनंद बरोबर घेऊन आला होता.आता दोघांनी घरी सांगितले. दोघांचे आई बाबा तसे सुशिक्षित, आर्थिक दृष्ट्या उच्च वर्गीय परिस्थितीत मोडत असल्यामुळें तसा नकाराचा काही संबंधच नव्हता.

साधारण एक वर्षाने लग्न करू असे ठरले… दोघांना ही छान जॉब लागला. तसे तर ग्रुप मधल्या सगळ्यांनीच आता त्यांचे नोकरीचे मार्ग निवडले होते पण विवेकने वडिलांचा व्यवसाय पुढे चालवायचा हे ठरवले होते.वर्ष सरू लागले आणि दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरु झाली. दोघांच्या आई बाबांनी एक निर्णय घेतला की आम्ही दोन्ही फॅमिली तुम्हाला आमच्या कडून एक फ्लॅट देतो म्हणजे त्याची बुकिंग amount भरतो तुम्ही दोघे मिळून त्याचे हप्ते भरा. आम्ही जाऊन येऊन तुमच्याकडे रहात जाऊ म्हणजे प्रत्येकाला त्याची त्याची स्पेस मिळेल… आपले आई वडील एवढे समजूतदार आहेत या गोष्टींचा दोघांना ही खूप अभिमान होता.

सगळी धामधूम सुरु झाली आणि सगळे उत्सुक कार्यकर्ते म्हणजे हा मित्र परिवार… खूप धमाल मजा मस्तीत कार्य पार पाडले. सगळ्या नातेवाईकांना ही कुतूहल वाटत होते की मैत्री असावी तर अशी विशू तम्मय चा संसार सुरू झाला.कधी त्याचे आई बाबा तर कधी तिचे आई बाबा येऊन रहात होते तर कधी दोघेच असायचे तिने तिला हवे तसे चेंजेस आधीच घरात करून घेतले त्यातलीच ही खिडकी.बघता बघता दिड वर्ष झाली आणि तो पावसाळी दिवस उजाडला. आज तन्मय च्या मनात आले विशूला घेऊन त्याच रिसॉर्ट ला जाऊ जिथे आपण तिला प्रपोज केले.

त्याने विशू ला तसे सांगितले,”विशू उद्या सकाळी आपण बाईक वर निघतोय जिथे आपण आपल्या आयुष्या बद्दल बोललो होतो”. विशू ला खरे तर आवडले होते पण बाईक म्हंटल्यावर ती म्हंटली,”तनु तुझी आयडिया मला आवडली पण बाईक नको”तसा तन्मय चा पारा चढला,”झाले तुझे सुरु, सगळा मूड घालवते. चल म्हंटले की निघता येत नाही तुला “? आता विशू थोडी सावरली, वाद नको म्हणून ठीक आहे म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे निघाले. विशू थोडी नाराजच होती कारण आज तिला भीतीने घेरले होते. पण तन्मय ला नाराज करायचे नाही म्हणुन दोघे निघाले. निघतांना दोन्ही आईबाबांना फोन केला आणि उद्या रात्री चौघांना जेवणाचे आमंत्रण देऊन यांची सफर सुरु झाली…खरं तर रिसॉर्ट घाट माथ्यावर असल्यामुळें पावसाचे प्रमाण खूप होते.

दोघांनी दिवस घालवला आणि परतीच्या प्रवासाला लागले.चार वाजताच संध्याकाळचे सात वाजले असे वाटत होते.येताना उतार असल्यामुळे पावसात गाडी कंट्रोल करण्यात तन्मय ला अडचण येत होती. हे मागे बसलेल्या विशू ला जाणवत होते. जातानाचा आनंद आता येताना ती घेऊ शकत नव्हती आणि एवढ्यात एका वळणावर गाडी ने एका कार ला पुढे जाण्यासाठी रस्ता दिला पण गाडीवर चा ताबा सुटून गाडी एका मोठ्या खडकावर आदळली… तसा तन्मय पण दगडावर आदळला तर विशू रस्त्यावर पडली. येणारी जाणारी वाहणे थांबली पोलीसांच्या मदतीने दोघांना अँब्युलन्स मधुन हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले.

विशू थोडी शुध्दीवर होती म्हणून तिने पोलिसांना विवेकचा नंबर दिला होता. अँब्युलन्स पोहचे पर्यंत विवेक ने सगळयांना कळवले. दोघांचे आई बाबा पण हजर होते. काळजीने सगळयांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. पण विवेकने धिर धरला. सगळे सोपस्कार पूर्ण करून दोघांना ऍडमिट केले. तन्मय च्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे तो बेशुद्ध च होता तर विशू ला थोडे ब्यांडेज वगैरे करावे लागले व तिला मुका मार लागला होता खूप. त्यामुळे पेन किलर वगैरे देऊन तिला शांत झोपू देत होते. तन्मय ची condition थोडी क्रिटिकल होती.

तसे त्यांनी विवेकला सांगतीले.विवेकचा बांध आता फुटला होता. सगळ्या ग्रुप पुढे एकच प्रश्न होता की त्याच्या आईबाबांना कसे सावरायचे आणि विशूला…आणि तो काळा दिवस उगवला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तन्मय गेला. एकाच हॉस्पिटल मध्ये असून आज आपल्याकडे कोणीच कसे आले नाही हा विचार विशू करत होती तेवढ्यात मल्हार आणि यामिनी विशू जवळ आले दोघाना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी विशू ला सांगितले. त्या क्षणी विशू ला भोवळ आली.dr नी हे गृहीत धरल्यामुळे इमर्जन्सी ट्रीटमेंट आधीच तयार ठेवली होती. सगळे सोपस्कार पार पडून आता दोन तिन महिने झाले होते.

आता दोघांचे आई बाबा तो फ्लॅट विकून तू दोन्ही घरी रहा म्हणत होते. पण विशू नाही म्हंटल्यावर त्यांनी निर्णय तिच्यावर सोडला.विवेक रोज येऊन तिला काही हवे नको बघत होता. तन्मय च्या बाबांच्या मनात आले की विशू साठी विवेक जोडीदार म्हणुन का नको. कारण तन्मय आणि विवेक तर बालवाडी पासूनचे मित्र होते. त्यांनी तसे विशू च्या आई बाबांना सांगितले पण विशू ला कोण समजवणार?परत एकदा यांचा ग्रूपच कामी आला. सगळ्यांनी विशू ला समजावले. खरे तर विवेक पण तन्मय सारखाच होता एक जबाबदार आणि रुबाबदार मुलगा विवेक ने तर होकार दर्शवला पण त्याच्या आईबाबांनी पण त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले.दोघांचे परत छोटेखानी लग्न लावून दिले आणि त्याच घरात विशू चा संसार पुन्हा बहरत होता.

आता तिथे येणाऱ्या आई बाबांची संख्या सहा झाली होती. सगळ्या आठवणीं डोळ्यापुढे सरकत होत्या आणि घड्याळात बारा कधी वाजले ते कळालेच नाही. तिने फोन हातात घेतला तर विवेकचे सहा मिस कॉल होते. तिने त्याला कॉल लावायला घेतला तेवढ्यात बेल वाजली. तिने दार उघडले तर विवेक होता….”विशू तू ठीक आहेस ना”? अग फोन का नव्हती उचलत. मी काळजीने अर्धमेला झालो होतो. कशी बशी मीटिंग आटोपून पटकन घरी आलो “…. आणि विशू त्याच्या मिठीत शिरून रडू लागली….

विवेक ह्या पावसाने आज मला रडवले रे…. विवेक काय समजायचं ते समजला त्याने तिचे डोळे पुसले आणि छान कॉफी करून आणतो म्हणत तो आत गेला तिला तिच्या खिडकीत बसवून. दोन मग घेऊन आला आणि तिच्याच शेजारी त्याच खिडकीत बसुन म्हंटला,” इथून पुढे पावसाळा आपण असा साजरा करायचा, याच खिडकीत बसुन कुठेही न जाता “… विशू च्या चेहेऱ्यावर आता हास्य खुलले… आज सगळे आई बाबा विशू कडे जेवायला येणार होते… कॉफी घेऊन दोघेही संध्याकाळच्या तयारीला लागले.

Leave a Comment