साटे लोटे |Relationship

गोष्ट आहे साटे लोटे केलेल्या लग्नाची (Relationship)”हे बघ मधुरा नविन लग्न झालय, सगळ्या सणावरांची मांदियाळी आता सुरू होणार आहे .आपल्याकडे तशी पद्धतच आहे पूर्वापार चालत आलेली की लग्न झाल्यानंतर वर्षभर नवीन सुनबाईंच्या माहेरहून आपल्याला सण येत असतात. आमच्या पिढीने तेच केलं आपल्या सगळ्या घराण्यातही तीच प्रथा चालू आहे. त्यामुळे तू आत्तापासूनच तुझ्या बाबांना सांगून ठेव की ज्या चालीरीती आहेत त्याची तयारी करावी लागेल”.

मधुराला थोडसं ऐकायला कसतरीच वाटलं की एवढे सुशिक्षित लोक असूनही त्या परंपरा आणि रीतीभाती पाळतात ,करायलाही हरकत नाही पण अट्टाहास नको असं तिचं म्हणणं आहे. कारण मधुराच्या माहेरची परिस्थिती अगदी काही गरिबीची नव्हती खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं पण सासरी इतकी संपत्ती असताना सुद्धा ह्या लोकांच्या अपेक्षा खूप आहेत असं मधुराला वाटलं. ती त्यावेळेस काहीच बोलली नाही पण ती ऑफिसला गेल्यानंतर तिने नचिकेतला फोन केला की ,”आज आई असं असं म्हणत होत्या” त्यावर नचिकेतही असंच बोलला ,”हो ती परंपरा आहे ती आपल्याला चालूच ठेवावी लागणार आहे मी आईच्या विरोधात जाऊ शकत नाही

आजपर्यंत या घरात आईचा शब्द हा शेवटचा शब्द मांडला जातो”. त्यावर मधुराने काहीच उत्तर न देता फोन ठेवून दिला .आता ती विचारात पडली की आपल्या वडिलांनी आईने इतके कष्ट केल्यानंतर कुठेतरी वैभव आले आहे.आपल्या भावाला छान जॉब लागलेला आहे आणि आता ते कुठेतरी सुखाचे छान दिवस बघत आहेत. नचिकेतच्या घरचीही परिस्थितीत खूप छान आहे. माझं शिक्षण, माझी नोकरी या सगळ्या गोष्टी त्यांना पसंत पडल्या म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला. त्यांच्या पसंती शिवाय आपण पुढे गेलो नसतो हेही तिला चांगलं ठाऊक होतं. मग आजच अचानक आईंनी असं काय केलं?

खर तर प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीची सगळी हौस त्यांच्या त्यांच्या परीने भागवत असतात. पण मग सासरच्या लोकांनी असा हट्ट धरणे कितपत योग्य आहे? याचा विचार ती करत होती. आणि आता आई-बाबांना काय सांगायचं हा मोठा प्रश्न तिच्यापुढे पडला. नचिकेतलाही एक बहीण आणि मधुरालाही एक भाऊ आहे नचिकेतच्या बहीणचे तसे म्हटलं तर मधुरा बरोबर तिचे संबंध खूप छान आहेत .तिचे नाव पूजा .अतिशय उत्कृष्ट असे छान नणंद भावजयीचे नाते आहे. खेळीमेळीच्या वातावरणात त्या राहतात .बऱ्याचदा पूजालाही तिच्या आईचे वागणे बरोबर वाटत नाही ,त्यावेळेस पूजा आईला बोलते .

एका मर्यादेत बोलते ,अर्थात मुलगी बोलते म्हणुन आईला तितकंसं वाईट वाटत नाही . आता मधुरा नोकरी करते आहे म्हटल्यानंतर तिने विचार केला की आपण पैसे कमावतो आहे तर आपण आपल्याच पैशातून काही गोष्टी घेऊयात आणि आई-बाबांना सांगूया की तुम्ही यात थोडेसे पैसे टाकून ती गोष्ट तुम्ही द्या. तिला असे वाटले की नचिकेत पासून काय लपवावं म्हणून तिने नचिकेतच्या कानावर या गोष्टी घातल्या .त्यावर नचिकेत जाम चिडला,” हे असं अजिबात चालायचं नाही ,जे काही आहे ते तुझ्या आई बाबांना सांग “. आता मात्र खरंच मधुराच्या डोळ्यात पाणी आले.अरे आपला नवराही आपल्याला समजून घेऊ शकत नाहीये.

ती घरी आली ,घरी आल्यानंतर थोडीशी उदास होती पण तिने घरचं सगळं काम केलं. रात्रीचा स्वयंपाक केला, सगळ्यांची जेवण झाली व पूजा तिच्या रूममध्ये गेली म्हटली “वहिनी का ग एवढी नाराज आहेस?” मधुरानी काही गोष्टी सांगितल्या नाही .कारण किती झालं तरी सासूबाई म्हणजे पूजाच्या आई आहेत त्यामुळे पूजाला कदाचित आवडणार नाही की वहिनींनी आपल्या आईबद्दल असं काही बोललेलं ,त्यामुळे ती शांत होती. त्या रात्री ते नचिकेतशी काही बोलली नाही .असेच दिवस जात होते आणि तिने आई-बाबांना सांगितले की आई बाबा माझी हौस आहे तर तुम्ही माझे आता सगळे सण छान कराल ना ?

आई-बाबांना प्रश्न पडला की आज पर्यंत आपली मुलगी आपल्याला एवढी सांभाळून घेत होती आज अचानक असं का वागते किंवा अशी मागणी तिने का केली असावी ?त्यांनीच आपल्या मुलाला म्हणजेच मधुराच्या भावाला सांगितलं त्यावर विनीत पण आश्चर्यचकित झाला . ताई तर अशी कधीच वागली नाही, तिच्या इतका समजूतदारपणा माझ्यात पण नाहीये. आज असच ताईला काय झालं?” ठीक आहे मी बोलतो ताईशी”, असं म्हणून तो ऑफिसला निघाला .

ऑफिसला पोहोचल्यानंतर त्याने मधुराला फोन केला त्यावेळेस मधुराला खूप रडू आले ,”दादा हे सगळं माझे नाहीये रे ,माझं असं कधीच मत नव्हतं तुलाही माहिती पण आज सासूबाईच्या या सगळ्या अपेक्षा आहेत आणि त्याची पूर्तता करावी असं नचिकेतही म्हणणं पडलं”.” मला सगळं समजतंय मी शिकलेली आहे ,जमाना कुठे चाललेला आहे पण मला स्वतःला प्रश्न पडला की अजूनही बऱ्याच घरात या सगळ्या गोष्टी का चालत आहेत? आणि त्या गोष्टीचा त्रास आम्हा मुलींना खरंच खूप होतो “.त्यावर विनीत म्हणाला,” ताई नको काळजी करूस मी बघतो काय करायचं ते “.एवढ म्हणून त्या दोघांचे बोलणे संपले.

विनीत खरं तर खूप समंजस मुलगा आणि त्याचाही लग्ना चे वय झालेले तसेच पूजा म्हणजेच मधुराची नणंदही लग्नाच्या वयाची .तिचा हट्ट होता की दादाचे लग्न आधी करावे म्हणजे वहिनी घरात आले की मी माझे लग्न करणार. आणि विनीतच म्हणणं होतं की ताईचं झालं की मी लग्न करणार. असं म्हणून दोघांच्याही लग्नाच्या ज्या इच्छा होत्या त्या त्यांनी पूर्ण झाल्या होत्या. तो घरी गेला आणि त्यांनी विचार केला की आपण असेही लग्नाचं बघतोच आहोत आणि पूजा मला बऱ्यापैकी भावली आहे कारण ती खूप छान स्वतंत्र विचारांची मुलगी आहे आणि मला तशीच हवी आहे . त्याने आई-बाबांबरोबर विषय काढला बोलायला सुरुवात केली .

“आई बाबा तुम्ही माझ्यासाठी मुलगी बघतच आहात ना तर मला असं वाटतं की जी ताईची नणंद आहे पूजा ती मला योग्य वाटते तुमचा काय विचार आहे “?बाबा म्हटले, “म्हणजे तुला साटलोट करायचे आहे का ?”विनित म्हटला “हरकत काय आहे आपली बहीण तिथे गेलेली आहे त्यांची मुलगी आपण स्वीकारू” तसं आईलाही ती गोष्ट मान्य झाली पण आई म्हटली की,” अरे आपल्याच मुलीला तिथे असा प्रॉब्लेम आहे तर आपण त्यांची मुलगी केल्यानंतर आपल्याला तो प्रॉब्लेम जास्त नाही जाणवणार का “?त्यावर विनीत म्हटला खरं सांगायचं तर कुठलंही नातं तोडायचं नाहीये मध्यंतरी पूजाने ही गोष्ट सांगितली होती.

आम्ही कॉफी प्यायला एकत्र गेलो होतो त्यावेळेस तिची स्वतंत्र मत असणारी गोष्ट मला मनाला खूप भावली. “आपण घाई करत नाही, पण मी एकदा पूजाशी बोलतो या विषयावर आणि त्याला फार उशीर करायला नको,एवढ्या एक दोन दिवसातच बोलतो” असं म्हणून विनीत तिथून उठला आणि आपल्या रूममध्ये गेला. विनीतनी विचार करायला सुरुवात केली की आपली बहीण एवढी छान शिकलेली आहे छान घरात दिलेली आहे नचिकेचा स्वभावही छान आहे, परंतु बऱ्याच वेळा त्याला आईच्या शब्दाबाहेर जाता येत नाही याचा त्रास आपल्या ताईला कुठेतरी होतोय का असा विचार त्याच्या मनात आला.

आपलं जर पूजा बरोबर लग्न झालं तर आपली आई आणि आपण पूजाला खूप आनंदात ठेवू ,तिच्या स्वतंत्र विचारांना आपण चालना देऊन सपोर्ट करू .तीच जाऊन उद्या तिच्या आईकडे जाऊन सांगेल की अगं माझ्या घरात तर इतकं छान वातावरण आहे आणि तू वहिनीला का असं वागवतेस? असा त्याच्या डोक्यात विचार आला आणि तो योग्यही होता. दोनच दिवसात तो पूजाला भेटला .दोघे एका हॉटेलमध्ये भेटले खूप छान गप्पा झाल्या त्यावेळेस पूजा ही त्याला बोलली की ,”बरोबर आहे तुझं विनीत ,माझी आई चुकते हे मला जाणवतं .मला जिथे जिथे शक्य आहे ना तिथे तिथे मी तिला बोलत असते परंतु आता इतक्या वर्षात ही बदलण्याची गोष्ट घडली नाही ती आता ती सहजासहजी घडणारही नाही हेही मला माहिती आहे.

मी बऱ्याचदा वहिनीला समजवण्याचा प्रयत्न करते वहिनीला समजतही पण ती मनाने हळवी असल्यामुळे काही गोष्टी तिला लागतात. आणि ते नैसर्गिक आहे ,माझी आई आहे म्हणून मी सहन करू शकते खरंच आहे वहिनी परक्या ठिकाणाहून आली आहे म्हटल्यावर तिला त्या गोष्टी थोड्याशा त्रासदायक होतात.” त्यावर विनीतला तिचा स्वभाव खूप आवडला पूजा म्हटली,” मी आई-बाबांशी बोलते आणि तुला नक्की कळवते.”

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी पूजानी स्वतःच्या आई-वडिलांकडे हा विषय काढला .त्यावेळेस नचिकेतला खूप आश्चर्याचा धक्का बसला अरे आपल्या बहिणीने असा काय निर्णय घेतला की विनीत बरोबर मला लग्न करायचंय. खरंतर मधुराला खूप आनंद झाला होता ,कारण तिला पूजाचा स्वभाव माहिती होता. पूजा खूप मनमोकळी होती आणि जेवढी अल्लड वाटत होती तेवढाच समजूतदारपणा तिच्याकडे होता .त्यामुळे तिला नक्की खात्री होती की ती आपल्या आई-बाबांचा सांभाळ आणि आपल्या भावाचा सांभाळ योग्य पद्धतीने करू शकेल. शेवटी पूजाच्या हट्टीपणामुळे आई-बाबांनाही तयार व्हावं लागलं.

खरंतर चांगलीच गोष्ट होती त्यामुळे फार त्यांनी आढेवेढे घेतले नाहीत. ठरल्याप्रमाणे ते मधुराच्या आई-वडिलांकडे गेले. यावेळेस मधुरा खूप आनंदी होती आपलीच नणंद आपली वहिनी म्हणून येणार ह्या एक गोष्टीचा अप्रूप तिला वाटत होते. आपल्याच नणंदे ला घेऊन आपण आपल्या माहेरी जातोय आपल्या भावासाठी ह्या गोष्टीसाठी तिचा खूप आनंद वाटत होता. आणि ते लोक सगळे गेले मधुराच्या माहेरी गेले.आई-बाबांनी सगळ्यांचे छान स्वागत केले.बोलणी झाली आणि यथावकाश आपण अगदीच लवकरात लवकर लग्न करू असं ठरलं . म्हणता म्हणता एक महिन्या नंतरची तारीख धरली आणि लग्न (Marriage) झालं.

आता पूजा मधुराच्या माहेरी विनीतची बायको म्हणून आली आणि सुरू झाला संसार. विनीतच्या आई बाबा स्वभावाने अतिशय मोकळे होते तसाच विनीतही खूप समंजस होता .या गोष्टीचा पूजाला खूप आनंद झाला. तिला असे वाटलेच नाही की आपण माहेरून सासरी आलोय. हळूहळू पूजाच्या आईला पूजा सांगत होती की मी किती छान आहे, विनीतचे आई बाबा किती समजूतदार आहे . आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पूजा ची आई करत होती. आणि मग त्यांना मनातून अतिशय अपराधी भावना आली की आपण मधुरावर उगाच आपला अट्टाहास लादतोय.आपण चुकीचे तर वागत नाही ना ?

ह्या गोष्टीचा त्या विचार करायला लागल्या. आणि मग खरच त्यांना असं वाटलं ज्या घरात आपली मुलगी सुखी आहे त्याच घरातल्या मुलीला आपण सुखी ठेवू शकत नाही का असा विचार त्यांनी केला .त्या दिवसापासून त्यांचे मधुरा बरोबर असलेले संबंध अतिशय छान झाले .आणि मधुरालाही असे वाटले की अरे वा आज आईंमध्ये एवढा बदल कसा झाला ?पण या मागचे गुपित हेच होते की विनीत आणि विनीतचे आई बाबा पूजाला अतिशय प्रेम लावत होते .जिव्हाळ्याने ते सगळे एकत्र राहत होते.

पूजा इकडच्या घराचे छान आनंदी वातावरण आपल्या आईबरोबर शेअर करत होती. हे शेअर करत असताना ती वेळोवेळी आपली आई कुठे चुकते हे नकळत तिला जाणीव करून देत होती. त्यामुळे सहाजिकच नचिकेतच्या आणि नचिकेtच्या आईच्या स्वभावात अमुलाग्र बदल झाला. आणि त्यांचे मधुरा बरोबर चे संबंध अतिशय छान पद्धतीने पार सुरू झाले. खरंतर साटे लोटे हा प्रकार फार क्वचितच घडतो आणि जेव्हा घडतो तेव्हा त्या दोन्ही कुटुंबांना आनंद होतो

कारण दोन्ही कुटुंबांच्या मुली एकमेकांच्या घरी गेलेल्या असतात .त्यामुळे कुठल्या जरी एका मुलीला त्रास झाला तर दुसऱ्या कुटुंबाला त्रास होणार हे गृहीत असतं .त्यामुळे वागताना माणूस खूप प्रेमाने वागतो आणि प्रेमानेच बोलतो… कारण दोन्ही घरच्या लेकी या दोन्ही घरच्या लक्ष्मी असतात.

Leave a Comment