सपान | Dream part 2

“काय झालं सासुबाई?“(Dream)

रमा हौसा गरीब हाय माहित आहे आम्हाला. पण अस पैस द्यायची सवय लावू नाय बाई. ती आपल्याकडे काम करती त्याच पैस आपण तिला देतो.” आम्हाला ठाव आहे ती तुझ्या माहेरची आहे. म्हणून तुझा जीव तूटतो तिच्यासाठी पण ही अशी वेळोवेळी पैसे देण्याची सवय बरी नव्हती बाई” भागीरथी ताई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या.

“व्हय सासुबाई असली चूक होणार नाही पुन्यानदा. “

पाच रुपये साडीला खोचलेल्या पिशवीत ठेवून. हौसा शेण कुर्र करू लागली. गोठा अगदी लख्ख करून. वाड्यातल्या आतल्या खोल्या झाडू लागली. वाडा खूप मोठा होता. वाड्यात जवळपास आठ ते दहा खोल्या एक मोठे स्वयंपाक घर वाड्यातच मागच्या बाजूला मोठी विहीर आणि आंब्याचा बाग. मुबलक बागायती जमीन आणि जमीन कसायला दोन जोडपी.

मात्र एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त चौघे राहत होते. भागीरथी ताईंना दोन मुले आणि एक मुलगी होती. आनंदराव सगळ्यात मोठे. त्यानंतर बाजीराव आणि मालती. मालतीचेही लग्न झाले होते.आनंदराव आणि रमाचे लग्न होऊन दहा वर्षे झाली होती परंतु रमाची कुस मात्र अजून उजवली नव्हती.

कधी कधी हौसा सपनी ला घेऊन आले की तिचे खूप लाड करायच्या रमाताई. रमाताई वाड्याच्या पुढच्या दरवाज्यात रांगोळी काढत होत्या. दररोज वाड्या पुढची रांगोळी पाहून हौसाचं मन दिवसभरासाठी एकदम प्रसन्न व्हायचं.

“ताईसाहेब जाती मी आता घरी. सगळं काम उरकलं हाय.”हौसा रमाला म्हणाली.

“हौसा तुला किती वेळा सांगितलं मला रमा म्हण मी एकटी आसन तवा. सासूबाई पुढं रमाताई म्हणत जा.” रमा लटकेच रागावली.

“बर बाई “असं म्हणत रामा हसली. हौसाने रमाचा केलेला एकेरी उल्लेख भागीरथी ताईंना अजिबात आवडत नसे.

“थांब थोडं हौसा” असं म्हणत रमाताई स्वयंपाक घरात गेल्या आणि डब्यात थोडसं कालवण भरून हौसा च्या हातात दिलं. “कशाला सयंपाक करनार हाय मी.” असू दे हौसा.. सपनी ला वाटाण्याचं कालवण आवडतं म्हणून दिल. जा बरं तू आता सपनी ला शाळेत जायला उशीर होईन.”

हौसा लगबगीने घरी आली. सपनी चा अभ्यास चालला होता. हौसा घरात आली तशी लगबगीने बटाटा चिरायला घेतला. पाट्यावर घसा घसा लाल मिरच्या आणि लसूण वाटून बटाट्याचं भरीत चुलीवर टाकलं आणि दुसऱ्या चुलीवर भाकरी थापायला घेतल्या. तवर सपनी चा शाळेत जायचा टाईम झाला. एका फडक्यात भाकर आणि त्याच्यावर बटाट्याचं भरीत आवळून बांधत हौसा सपनी ला म्हणाली.

“रमाताईंनी तुपल्यासाठी वाटाण्याचं कालवण दिल हाय साळतून आल्यावर भाकरी संग चुरून खा.” सपनिन मान डोलावली. “आयो गुरुजींनी पैस मागितल्यात”दबकातच सपनी म्हणाली. बारीक असली तरी तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती. रमाताईंनी दिलेला पाच रुपयाचा ठोकळा हौसाने एका पितळेच्या डब्यात ठेवला आणि डब्यातला एक कागद काढून त्यावर काहीतरी लिहिलं आणि डबा परत ठेवून दिला. दुसऱ्या डब्यातला दोन रुपयाचा ठोकळा तीन सपनीला दिला. आनंदाने उड्या मारत सपनी दप्तर घेऊन शाळेत पळाली.

हौशीन वाड्यातून येताना थोडंसं शान आणलं होतं. कोंबडीचं खुराड बाहेर ठेवून हौशीने सरासरा सपार सारवून घेत हुती. जसे काय तिच्या हातातून शेणाचे कारंजे फुलत होते आणि एक प्रकारची नक्षी दिसत होती.सारून घेतल्यावर तिने बाहेर ठेवलेल्या गार पाण्याच्या बादलीने भडाभडा आंघुळ करून घेतली. बाहेरच सपनाच्या देवळीत एक फुटका काचचा तुकडा होता हौसा न त्या काचेच्या तुकड्यात बघत भलं मोठं कुंकू कपाळावर रेखाटलं आणि केसांचा बुचडा बांधला.

रंग सावळा नाकाने थोडी नकटी उंचीपुरी लांबसडक काळे भोर केस आणि हनूवटीवर एक सुंदरसा तीळ. श्रीमंतीलाही लाजवेल असे तोंडावर तेज.दिसायला गोड हुती. दहावी शिकलेली.

पाठीशी एक भाऊ. माहेरची परिस्थिती बक्कळ चांगली. एकच पोर असल्यामुळे लग्न खूप थाटात लावून दिले होते. लग्न करून आली तेव्हा सासरची परिस्थिती सगळ्या गावात खूप चांगली होती. सासू सासरे दोघ भाऊ जावा मुलं बाळ असं सगळं कसं गोकुळ होतं.

दहा एकर जमीन होती.पण धाकल्या दिराच्या व्यसनापायी सगळं व्हत्याच नव्हतं झालं. दारू पिऊन गाडीच्या खाली आला आणि मरता मरता वाचला. हॉस्पिटलमध्ये खूप पैसा गेला.दहा एकर च एका एकरावर आलं.

मला वायल पाये म्हणून भांडला. नाविलाजाने रंग्याने त्याला वाईल दिल. हे सगळं पाहून हळूहळू सासरा खचत गेला. अंथरून धरलं आणि देवा घरी गेले. सासू तशी बरी व्हती. बारक्या जावचा मुलगा चार वर्षाचा त्याला सांभाळण्यासाठी त्या बारक्या जावकडं राहायच्या. हौसाचं माहेर आणि रमाच माहेर एकच.

दोघीही एका शाळेत होत्या. रमाताईंच्या एक वर्ष अगोदर हौसाच लगीन झालं होतं. आणि हौसाच्या ओळखीवरच रमाचे लग्न झालं होतं.

“ताई…. मागून आवाज आला.तशी हौसाने चमकून मागे पाहिलं.

क्रमश……

Leave a Comment