“ताई “ मागून आवाज आला.तस हौसाने मागे चमकून बघितल. सतीश म्हणजे हौसाचा भाऊ गाडी उभी करत होता.(Dream)
“सतीश… तिचा चेहरा आनंदाने भरून गेला होता. ये ये घरात ये. सतीश च्या हाताला धरून तिने आत आणलं आणि पाण्याचा तांब्या भरून देत ती म्हणाली “आई आणि तात्या कस हायेत र? आणि तू असा अचानक मधी कसा काय आला.
“ सतीश ची नजर मात्र तिच्या संपूर्ण झोपडीत फिरत होती. झोपडी तरी छोटी असली तरी एकदम स्वच्छ आणि नीटनेटकी. “अरे काय म्हणते मी? आई आणि तात्या कस हायत “बर हायती ताई. तू कशी हाय पण. ताईच्या डोळ्याकडे बघत सतीश म्हणाला. “आरं मी पण मस्त हाय बघ.”सपनी शाळत गेली असणं ना? सतीश म्हणाला.“व्हय र” दुपारच्याला येईनं आता ती घरी.
“आईनं गाईचा चिक घेऊन पाठवलं हाय.” पिशवीतला स्टीलचा डबा बाहेर काढत तो म्हणाला. आणि अजून काय बाय दिला आहे ते बघ.”पिशवी त्यानं हौसाकडं दिली. हरबऱ्याची डाळ, हावरी, लोणचं, हुलग्याच पीठ त्यात 10-12 अंडी, भेळ असं बरच काय व्हत.
“काय बया कायला द्यायचं आईनं एव्हडं….मी काय उपाशी बसली व्हय इथं.” हौसा डोळ्यात पानी आणून म्हणली. “सतीश बस तू मी अंडी तळती मग जेव तू”. पिशवीतून अंडी काढीत हौसा म्हणाली. हौसाला वाईट वाटू नये म्हणून सतीश जेवायला तयार झाला.
बहिणीचं लग्न झालं तेव्हा परिस्थिती खूपच चांगली होती. आणि आता आपली बहीण झोपडीत राहत आहे हे पाहून सतीशला मनातून खूपच वाईट वाटत होते. त्याचबरोबर त्याला तिचे कौतुक सुद्धा वाटत होते. वेगळे निघाल्यापासून तो पहिल्यांदाच हौसाच्या घरी आला होता. साध्या झोपडीत राहत असून सुद्धा हौसाने माहेरी कधीच तक्रार केली नव्हती.
“ दाजी परत कधी येणार हाय… सतीश ने हौसा ला विचारलं. पुढच्या महिन्यात येणार असं म्हणाल हुत आता काय माहित. “ताई तुला आणि सपनी ला रात्रीचा भ्या नाय वाटत का? सतीशने काळजीच्या स्वरात बहिणीला विचारले.”नाय र भ्यावं कायच सगळी आपलीच माणसं आहेत इथं. सासुबाई कधी मधी येत्यात रातच्याला. हौसा म्हणाली
“ पुढच्या महिन्यात यात्रा हाय तवा तुला आणि सपनी ला घ्यायला मी परत येईनं.“ सतीश म्हणाला
व्हय व्हय “ हौसांनी पटकन अंड तळलं आणि सतीशला भाकर वाढली. “रमाताईचं बर हाय का. “ रमाताई च्या आईने तिच्या घरी जाऊन यायला सांगितल हाय मला. भाकर खात खात सतीश म्हणाला.
“ व्हय र आनंदात हाय ती.” हौसानं तिच्याकडे कामाला जाते हे सांगणं टाळलं. उगा आईच्या जीवाला वाईट वाटलं म्हणून.
“ताई तुला काही पण मदत लागली तर नक्की सांगा अजिबात लाजायचं नाय. ट्रॅक्टर कामाला लावलाय नाहीतर दाण्याची पोती त्यात टाकून आणणार होतो.” सतीश म्हणाला.
“अरे येडा हाईस का तू …..दान हाय मला. बारक्या च्या घरात ठेवलय.”हौसान वेळ मारून नेली. सतीश जरी तिच्यापेक्षा बारीक असला तरी तो त्याच्या बहिणीला चांगलाच ओळखत होता. खूप स्वाभिमानी होती हौसा. दोघा बहिण भावांना एकमेकांवर खूप प्रेम होत. सतीश पोटभर जेवला आणि हात धुतला.
“बर ताई घरी खूप कामे आहेत. मी निघतो.शेतावर मोलाची माणस आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतय.जाताना शाळेतून सपनी ला भेटून जाईनं तसाच आणि रमाताई चांगली आहे तुझ्याकडून कळलंय आता मी काय तिच्या घरी जात नाही.”सतीश घाईत होता.
“अर थांब वाईच हौसाने पितळाच्या डब्यातून काही नोटा आणि चिल्लर काढली. आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत सतीश च्या हातात दिली.“ सतीश एवढं रमाच्या आईकडे दे. रमान माझ्याकडे दिल दिल हुत. आणि कोणाला सांगू नको राजा सासुरवाशीन हाय ती “
“नाय सांगणार ताई.” रमाच्या माहेरी तशी गरीबीच होती. नवऱ्यान काय कामानिम्मित पैस दिल कि रमा जपून वापरायची आणि शिलकीच पैस हौसाकडं द्यायची. हौसा पण खूप व्यवहारी किती दिल ते लिहून ठिवायची आणि सगळा हीशोब सांगायची.दोघी मैत्रिणी होत्याच तशा खास.
सतीश निघाला. “ताई काळजी घी तुपली काय लागल तर सांग” “व्हय रे राजा “आस म्हणून तीन भावाला मिठी मारली. तिला लई रडायचं हुत पण खूप आवरलं तीनं.“अग ताई इसरलोच…आईनं पिशवीत बी दिलंत कायचतरी उघडून पाय.” एकदम आठवण झाली.व्हय व्हय तू सावकाश जा. गाडी सावकाश चालिव रे. बऱ्याच दूर जाईपर्यंत हौसा तिच्या भावाच्या माघारी पाहत होती.
जसा भाऊ दिसेनासा झाला तसा तिचा बांध फुटला आणि घरामध्ये येऊन ती ओक्सबुकशी रडू लागली. तिला आई वडिलांची खूप आठवण येत होती. थोडी शांत झाल्यावर तिने सतीश ने आणलेल सगळं एका कोपऱ्यात ठेवून देऊ लागली आईने कसलं बी दिला आहे म्हणून तिने पिशवीतल सगळं बाहेर काढलं आणि पाहू लागली.
एक छोटसं कपडाच बोचकं तिला सापडलं. तीन-चार गाठनी मारल्या होत्या. आणि आत उघडून पाहते तर काय. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
क्रमश…….
🥰🥰