सपान |Dream Part 7

कोपऱ्यात पडलेली हौसाच्या लग्नातली पेटी हौसाने अगदी मायेने जवळ घेतली. (Dream)लाल निळी मोठी मोठी फुल असलेली. हौसाने अलगद पेटीचे झाकण उघडले.

आत मधी असलेल्या प्लास्टिकच्या पिशवी वरून तिने हात फिरवला.“ हौसा सासरी जाशिन तवा सोन नान तर देत्यात पण या पिशवीत जे हाय ते सोन्या नाण्यापेक्षा लई महाग हाय पोरी जपून ठिव. “

सासरी निघताना जेव्हा हौसा तिची पेटी भरत होती तेव्हा हौसाच्या आईने ही पिशवी अलगद तिच्या हातात दिली होती. तिने पिशवीत हात घातला आणि एक कागद बाहेर काढला. बारावी पास झाल्याचे सर्टिफिकेट होते ते. आता मात्र तिने मनाशी ठरवलं आपल्या झालेल्या शिक्षणाचा उपयोग करायचा.

ते पण घर,संसार,पोर यांना सगळ्यांना बघून. पण कसं ते अजून तिला कळेना. कागद पेटीत ठेऊन तिने पेटी परत ठेऊन दिली आणि सपनीच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करू लागली. कधी झोप लागली ते तिला कळालेच नाही.

सपनी मधूनच अंग खाजवत उठत होती. परत झोपत होती.सकाळी हौसाला जाग आली. उठून तिने चूल पेटवली पानी गरम करायला ठेवलं आणि बाहेर झाडून घेतलं कोंबडी बाहेर आणून डालली आंघुळ करून तीन…. सपनीसाठी थोडा गरा केला.

“सपने ऊठ ना बाय माये मी वाड्यात जाऊन येती तवर खाऊन घी आणि आंघुळ कर पानी वतून ठीवलंय बाहीर.”“व्हय” डोळ चोळतच सपनी म्हणाली.हौसा तडा तडा वाड्याकडं निघाली. “हौसा आलीस व्हय ग “ रमा लांबणंच तिला सामोरी गेली.

“काल तुपली सासू कायबाय बोलली व्हय ग तुला मला सगुणानी सांगितलं. काय तिच्या जीभला हाड बीड हाय कां नाय सोन्यासारखी सून तिला समजना व्हय’ रमा रागातच बोलत होती.

“रमा कोण काय बोलल त्याचा नेम नाय. एकटी बाई पायली कि ज्याच्या तोंडाला येईल ते बोलतंय माय….काय करायचं आता. “ हौसाच डोळ एकदम भरून आलं.

“रमा मपल जाऊदे तुपल काय झालं इचारलं कां थोरल्या मालकांला ते चिट्ठीच? हौसान रमाचा हात हातात घेऊन इचारलं.“व्हय इचारलं ते म्हणत्यात ती चिट्ठी मपली नाय “ रमा कधी कधी नीट इचार करून बोलावं ना बाई आली आसल कोणाची तरी चिट्ठी चुकून नायतर मुद्दाम टाकली आसन कोणीतरी. हौसा रमाकड पाहत म्हणाली.

”“काय कळना झालंय हौसा.”रमा चिंतेच्या स्वरात म्हणाली.रमा तात्या गेलं कां ग कालेजला? हौसान रमाला विचारले.तात्या म्हणजे रमाचा धाकला दीर बाजीराव. जो तालुक्याच्या गावाला शिकायला जात होता.“नाय ग हायत अजून. कां ग?रमा आपण दोघीबी बारावी पर्यंत शिकलेल्या हायती. त्यावर पुढं काय शिकता येतंय कां ते इचारलं असत तात्याला.

“बया रमा आता तू शिकनार व्हय ग? लगीन झाल्यावर एक पोरगी झाल्यावर कोण शिकत असतय कां?

“का काय झालं का नाय शिकू शकत बाईने मनात आणलं तर ती जग बी जिंकू शकती.”मागून आवाज आला रमा आणि हौसाने एकदम चमकून मागे पाहिले. रमाची सासू म्हणजेच भागीरथी ताई त्या दोघींचे बोलणे ऐकत होत्या.

त्यांना पाहून हौसाने शेणाचं घमील घेऊन शेण काढायला लागली.“हौसा काल तूपल्या घरात जे झालं ते सगळं आम्हाला कळलं आहे. तोंडात येइन ते लोक बोलत्यात त्यांचं टोण्ड कोण धरील बाई. पण आपण घाबरून जायचं नाय बाय त्यास्नी पुरून उरायचं.

”“तीन तीन पॉर.. वाढल्यात म्या मोठं केल सगळ्यास्नी चांगल शिकवलं मस लॉक.. काय बाय बोलली संशय घेतला पण म्या माग सरली नाय तटून उभी रायली. नांगरणी कोळपणी गड्यांच्या खांद्याला खांदा देऊन केली. काय करणार दुसरं साळतच गेली नव्हती. पण तू शिकलेली हाय हौसा अजून शिक आणि मोठी व्हय माय.

“रमा आणि हौसाला एकदम हायेस वाटलं.मी बाजीरावसानी पाठवती तुला इचार काय इचारायचं आसन ते…मी हाय तुपल्यासंग घाबरू नको.” पाटिलन बाईच हे रूप हौसान पहिल्यांनदा पाहिलं हुत.

रमा जा बाय घरात सयंपाकच बघ तेव्हडं. रमा आणि पाटलीन बाई दोघी आत गेल्या. हौसाला मात्र अजून सपनात असल्यासारखंच वाटत होतं. खरच जमन कां मला. शिकून मी बी कामाला लागण कां? पण आता मी काय शिकू? असे अनेक प्रश्न तिच्या मनात घोंगावत होते.

“हौसा ताई काय कामं होत कां माझ्याकड? बाजीराव गोठ्यात येत म्हणाला. हौसाला काय बोलावं कसं इचरावं तीच कळना. “तात्या मी काय म्हणत हुती लग्ना अगूदर मी बारावी पास झाली हाय तर मला आता पैस कमवायला काय शिकायचं म्हणलं तर शिकता येईन काय घरी राउन.”हौसाने एका दमातच सगळं बोलून टाकले. बाजीराव ला एकदम आश्चर्यच वाटले. कौतुकाने तो हाऊसा कडे पाहत म्हणाला

“ कां नाही शिकता येणार हौसाताई नक्की येईन. मी आज काल कॉलेजमध्ये जाऊन घरी राहून काही शिकण्यासारखे कोर्स असले तर पाहतो नक्की.” ते ऐकून हौसाचे मन उंच भरारी घेऊ लागले. आजचा दिस तिला सणा वारा पेक्षा जास्त भारी वाटला.

क्रमश…..

1 thought on “सपान |Dream Part 7”

Leave a Comment