जीवनात उशिरा का होईना पण नवऱ्याची साथ(Support)मिळणे खूप गरजेचे असते. खरं तर बायकांना नवऱ्याने वेळोवेळी फक्त मायेची विचारपूस केली तरी खूप आनंद होतो.त्यात ती पूर्ण आयुष्य काढू शकते.
आज लतिका निवांत कॉफी घेत बसली होती बाल्कनीत. खरे तर रोज घरातले सगळे आवरायचे, मग शाळेत पळायचे आणि पुन्हा घरी येऊन संध्याकाळचे घरात सगळे बघायचेअसं गेली २० वर्ष अखंड सुरु असलेले रूटीन.
खरे तर लग्ना आधीच ती एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. पण ती शाळा खाजगी असल्यामुळे पगार तेवढा नव्हता. मग तिने महानगर पालिकेची जेव्हा शिक्षक भरतीची जाहिरात आली तेव्हा अर्ज केला आणि सुदैवाने तिचा नंबर लागला.सरकारी नोकरी आहे म्हंटल्यावर तिला स्थळ चांगले येऊ लागले त्यातीलच महेश चे स्थळ तिला पसंत पडले. आणि त्यांचे लग्न झाले. महेश पण एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. घरात सासू सासरे दिर आणि हे दोघे असे रहात होते.
सुरुवातीला घरा जवळची शाळा तिला मिळाली तेव्हा तिचे ११ वाजे पर्यंत सगळे आवरून होत होते. नंतरचे थोडे सासू बाई आवरायच्या पण महानगर पालिकेच्या शाळेत असल्यामुळे तिन वर्षांनी तिची बदली होत होती तेव्हा मात्र तिला खूप त्रास होऊ लागला. खरे तर शिक्षक लोकांना फक्त शिकवणे एवढेच काम नसायचे तर त्या बरोबर अनेक उपक्रम आणि त्याचे नियोजन राबवावे लागायचे त्यामुळे तिची खरे तर कसरत होत होती.
अशातच तिला दिवस गेले. पाहिलट करीन असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. सासू बाई काळजी घ्यायच्या पण शाळेत इतक्या लवकर रजा मिळणे मुश्कील होते. होता होता नवव्या महीन्यात ती माहेरी गेली मुलगा झाला आणि दोन महिन्याने सासरी आली. शाळेत रुजू नाही झाली तरी घरातली सगळी कामे तिला करावी लागत होती.
नवरा ऑफीस मधून आला की थकायचा त्याला सगळे हातात द्यायच्या सासू बाई पण हिने शाळेतून येऊन सगळे करायचे खूप थकवा जाणवायचा तिला पण बोलू शकत नव्हती.आता सहा महिन्याची सुट्टी संपवून ती शाळेत रुजू झाली. बाळ ही मोठे झाले. मुलाचे नावं केतन ठेवले. बघता बघता केतन शाळेत जाऊ लागला. त्याच दरम्यान दिराचे लग्न झाले आणि जाऊ बाई घरात आली.. खरे तर आता लतिकाला आराम मिळायला पाहिजे होता पण झाले उलटेच.काही कारणाने एक वर्षाच्या आतच दिर जाऊ वेगळे राहू लागले.
धाकट्या सुनेला बाळ झाले म्हणुन सासू बाई तिच्या मदती साठी गेल्या. आणि लतिकाची जबाबदारी वाढली. केतन ची शाळा, नवऱ्याचे ऑफीस, स्वतःची शाळा आणि सासऱ्यांचे पथ्य सांभाळत तिची नोकरीची वर्ष निघून जात होती.बघता बघता केतन आठरा वर्षाचा झाला.मध्यंतरीच्या काळात सासू सासरे ही गेले.
आता लतिकाला रजोनिवृत्ती चा त्रास जाणवू लागला.धड धड वाढणे , मूड बदलणे, अंगात उष्णता वाढल्या सारखी होणे आणि त्यामुळे सतत ची चिडचिड. खरे तर या गोष्टी सामान्य वाटत असल्या तरी त्या प्रकृतीवर परिणाम करतात हे तिला तिच्या मैत्रिणींनी सांगितले होते.प्रपंचातून आता थोडा स्वतः ला वेळ दे. ज्यात तुला रमावेसे वाटेल त्यात रमून आनंद घे म्हणणाऱ्या मैत्रीणीना पाहिले की लतिकाला त्यांचा हेवा वाटायचा.आजपर्यंत यातले आपण काय केले याचा विचार ती करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले यातले तर काहीच नाही केले आपणं कधी.
नोकरी, संगोपन, नाती गोती आणि जबाबदारी पार पाडण्याशिवय आपणं काय केले आणि तिला अश्रू अनावर झाले.आता हाडे दुखत होती. अती रक्तस्त्राव होऊन रक्त कमी झाले होते. त्यात सात तास शाळेत उभे राहून शिकवणे. परत घरी आले की नवऱ्याला आणि मुलाला ताजे अन्न मिळावे म्हणुन गॅस पुढे उभे रहाणे सुरूच होते.पण आता तिने निर्णय घेतला.संध्याकाळच्या स्वयंपाकाला मावशी लावायची. तुम्हीही आयते खा आणि मी ही खाते. महेश रावांनी नाराजी व्यक्त केली होती पण आता ती तिच्या निर्णयावर ठाम होती.
लेकाला तिने मशिन ला कपडे लावण्याचे काम दिले तर नवऱ्याला आठवड्याचा भाजीपाला आणि दळण आणायला सांगीतले.महिन्यातून एकदा शनिवार रविवार बघुन एका पिकनिक पॉइंट ला जायचे असे ठरवले. त्याला महेश रावांनी मान्यता दिली पण तिला माहिती होते की ते शक्य होणार नाही. मग तिने भिशी ग्रुप जॉईन केला त्यामुळे तिला महिन्यातून एकदा तरी मैत्रिणी भेटू लागल्या. विचारांची देवाण घेवाण होऊ लागली. आता ती मनाने जरा आनंदी राहू लागली. पण हे काहीच दिवस.एक दिवस तिचे पोट खूप दुखू लागले अगदी ऍडमिट केले तेव्हा सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये तिच्या गर्भाशय मधे काही प्रोब्लेम दाखवला. डॉक्टरांनी काही गोळ्यांचा कोर्स दिला. तिचे हिमोग्लोबिन पण खूप कमी झाले आणि कॅल्शियम ची कमतरता जाणवत होती.
त्यावेळी डॉक्टरांनी महेश राव आणि केतन शी चर्चा केली की या वयात स्त्री जातीला कशा पद्धतीने विश्रांतीची गरज असते. तिच्या हार्मोन बदला मुळे तीला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो आणि या गोष्टी आपल्याला दिसत नाही पण तिला सहन कराव्या लागतात.आता महेश रावांना ही पटले. त्यांनी तिला मेडिकल रजा घ्यायला लावली. आणि स्वतःही घेतली. आणि तिला घेऊन ते आठ दिवस कुलू मनालीला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले अरे आपण तर तिला किती गृहीत धरत होतो. रोज आयते ताट समोर यायचे पण तू आज डबा खाल्ला का हे ही कधी विचारलें नाही.
आपला बंगला बांधला त्यावेळी तर तिचे योगदान खूप मोलाचे होते हे आपण कसे विसरलो. पण आता त्यांना त्यांची चूक कळली होती.दोघांनी निसर्गाचा छान आनंद घेतला आणि ते परत आले. आता पुढच्या आठ दिवसात त्यांनी घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी वाटून घेतली तिचा रजोनिवृत्तीच्या काळात आपण साथ दिली पाहिजे हे त्यांना पटले.
लतिका बाल्कनीत बसली होती पण तिला पोह्याचा वास येत होता.. पाचच मिनिटात महेश राव पोह्यांची डिश घेऊन बाल्कनीत आले तर मागून केतन चहाचा ट्रे घेऊन आला. तिघांनी मस्त नाश्ता केला.. चला आता सोमवारी शाळेत जायचे आहे, तयारी करते म्हणत लतिका उठली. मनातून तिने परमात्म्याचे आभार मानले आणि दोन्ही हातात त्या दोघांचे हात घेऊन डोळ्यांनीच त्यांना समजावले की असेच माझ्या बरोबर रहा.