साथ | Support

उतारवयात एकमेकांना दिलेली साथ (Support)

श्रीपत राव खरं तर मनाने खूप खचले होते, कारण ही तसेच होते सुगंधा बाईंची तब्येत आताशा खूप खराब झाली होती. गावातल्या सगळ्या डॉक्टरांना दाखवून झाले पण निदान होत नव्हते.

आता सुनील पण म्हंटला “दादा आता आईला आपणं तालुक्याच्या गावाला घेऊन जाऊ”..आज दुपारची जेवणं झाली, आणि श्रीपत राव सुगंधा बाईंच्या बेड जवळ बसले. सुगंधा बाईंनी अगदी दोन घास वरण भात खाल्ला होता.श्रीपत रावांनी त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवला व त्यांचा हात हातात घेऊन म्हंटले,”सुगे, खूप कष्ट केले ग तू आपल्या कुटुंबासाठी, शेतात म्हणू नको गोठ्यात म्हणू नको, माझ्या खांद्याला खांदा लावुन उभी राहिलीस. कधी कंटाळा नाही केला.”सुगंधा बाईंच्या चेहेऱ्यावर थोडेसे स्फुट हसू उमटले. त्यांनी श्रीपत रावांचा हात घट्ट धरला. “नका हो असं काही म्हणू. स्त्री जातीचे ते कर्तव्यच होते. आणि खरं सांगू आत्या बाईंनी मला खूप समजून घेतले म्हणून कधी त्या कष्टाचा त्रास नाही झाला”.श्रीपत रावांच्या नजरे पुढून तो सगळा काळ गेला.

आई वडिलांच्या आज्ञेत रहाणारे श्रीपत राव कायम शिस्तीत राहिले. पहिलवानकी करणारा देह होता. त्यामुळे शरीरयष्टी तर सुदृढ होतीच पण आवाजात आणि स्वभावातही करारीपणा होता. एक वेळ अशी आली की त्यांचे आई वडीलपण त्यांना थोडे घाबरून रहात होते.ज्या वेळी निंबळकरांच्या सुगंधाचे स्थळ आले, तेव्हा त्यांनी मुलिकडच्या लोकांना एकच सांगितले की भले लग्नाला सहा महिने उशीर होऊ दे पण तुमच्या मुलीला सगळे शिकवूनच पाठवा.आमचे एकत्र कुटुंब आहे आणि एकत्रच रहाणार… या सगळ्या गोष्टींची जाणिव त्यांना करून द्या आणि मगच लग्नाची बोलणी करा.रंगाने गोरी गोमटी असणारी सुगंधा आपल्याही वडिलांच्या विचारांपुढे नव्हती .आपल्या वडिलांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल हा विचार करून तिने या स्थळाला पसंती दर्शवली .आणि तो दिवस उगवला ,श्रीपतरावांच्या आयुष्यात सौभाग्यवती म्हणून सुगंधाने पाऊल टाकले.

लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी संपूर्णपणे आपल्या कुटुंबासाठी स्वतःचे जीवन वाहिले गोठा म्हणू नका ,शेत म्हणू नका ,घर म्हणू नका अशा सगळ्या बाजू सावरत सावरत सासू-सासर्‍यांची सेवा करत दिरांची लग्न करत नंदांची लग्न करत संसाराची चाकं फिरत होती .कधीही मान वर करून न बोलणाऱ्या सुगंधाबाई या त्या घरच्या तर लक्ष्मी होत्या पण श्रीपतरावांची खरी अर्धांगिनी होती.सुनील ,सुधाकर सारखे दोन पुत्र जन्माला घातली आणि माधवी सारखी कन्या जन्माला आली. तिन्ही मुलांचे छान संसार मांडून दिले आणि आता खरच सुखाचे दिवस असताना आजारपणाने सुगंधाबाईंना घेरले .श्रीपतरावांना खरं म्हटलं तर मनातून खूप दुःख होत होते की आपण फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी सुगंधाला कधी सुख देऊ शकलो नाही.

तिची हौस मौज पूरवू शकत शकलो नाही .या गोष्टीचा त्यांना अतिशय दुःख होते आणि त्यांनी दिवाळीतच ठरवलं होतं की यंदा पेरणी झाली की मी सुगंधाला घेऊन चारधाम यात्रेला निघणार आहे .आणि या दुखण्याने सुगंधाला घेरलं .खरंच दैव गतीचा सिद्धांतही खूप वेगळा असतो नाही ?करू करू ,होईल होइल म्हणता म्हणता असंख्य गोष्टी राहून जातात कधीच पूर्ण न होण्यासाठी .पण आता नाही, आता दैव कृपेने दोन्ही मुले छान पदावरती काम करत होते. शेतीवाडी सगळं मुबलक प्रमाणात आहे पैसाही आहे आणि खरंच जशा सुना आल्या तशा श्रीपतरावांनी त्यांच्या स्वभावात खूप अमुलाग्र बदल केला. आता त्यांना सुगंधा बाईंची जाणीव खूप खूप व्हायला लागली आणि त्यांचे त्यांच्या आयुष्यातले महत्व ही जाणवायला लागले .त्यामुळे त्यांनी आपली इच्छा आपल्या दोन्ही मुलांना बोलून दाखवली होती की मी आता तुमच्या आईला घेऊन दुनिया फिरणार.मुलांनी त्यांच्या इच्छेला मान दिला आणि म्हटले की हो दादा तुम्ही आता जाऊ शकता पेरणी झाली की आणि श्रीपतराव खूप आनंदात होते. आणि एकाएकी थोडा ताप यायचं निमित्त झालं आणि त्या दिवसापासून सुगंधाबाई ची तब्येत खालावत गेली. बघूया आता तालुक्याच्या गावाला जाऊन डॉक्टर काय म्हणतायेत पण श्रीपतरावांनी त्या परमेश्वराला पहिल्यांदा आपल्या बायकोसाठी तिच्या आरोग्याचे दान मागितले आणि एवढा करारी माणूस सुद्धा आता खूप हळवा झाला .

मला माझ्या बायकोला एकदातरी चार धाम यात्रा पूर्ण करण्याची संधी मिळू दे मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील .ठरल्याप्रमाणे तालुक्याच्या गावाला नेले गेले सुगंधा बाईना. खूप दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले .तब्येत इतक्या लवकर सुधारण्यासारखी नव्हती पण आशेचा किरणही संपलेला नव्हता. त्यामुळे त्यांना शेतातल्या बंगल्यावर ठेवण्यात आले आणि त्यांच्या देखरेखीसाठी तिथे एक जोडपं ठेवण्यात आले.श्रीपतराव आणि सुगंधाबाई काही दिवस शेतातल्या बंगल्यावरती राहायला गेल्या .हळूहळू त्यांच्या तब्येतीत फरक पडत गेला आणि सहा महिन्यांनी त्या बऱ्यापैकी छान झाल्या .आज श्रीपतरावांचा स्वप्न पूर्ण होणार होतं कारण उद्याच्याच विमानाने श्रीपतराव आणि सुगंधाबाई दिल्लीकडे प्रस्थान करणार होते.

Leave a Comment