सत्यनारायण पूजा | Satyanarayan Puja

आज देशमाने परिवारात सकाळपासून सनई चे सूर सुरु होते कारण श्रावणी शुक्रवार आणि सत्यनारायण पूजा ( Satyanarayan Puja ) एकत्रितरित्या साजरी होत होती.

गुरुजींनी पूजेची मांडणी केली आणि आवाज दिला,”यजमान आणि त्यांच्या सौभाग्यवती लवकर या”असा. पाच मिनिटात रागिणी तयार होऊन बाहेर आली आणि ज्योती ताई तिच्या कडे बघतच राहील्या.लाल चुटूक नऊवारी साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचे खनाचे ब्लाऊज तिने घातले होते. केसांचा खोपा घालून त्यावर सुंदर असा गजरा माळला होता . कपाळावरची चंद्रकोर तर उठून दिसत होती.

छोटी जिजा पण खनाचे परकर पोलके घालून तयार झाली होती.राजन बाहेर आला आणि त्याने छान गुलाबी रंगाचे सोवळे परिधान केले होते. तो ही रागिणी कडे बघतच राहिला. मनातून खूप खुश झाला होता. दोघेही पाटावर बसण्यापूर्वी त्यांनी ज्योती ताईंचा आशिर्वाद घेतला आणि बाबांच्या फोटोला नमस्कार करून त्यांनी सर्व देवदेवतांना आवाहन केले.

पूजा सुरु झाली आणि ज्योती ताईंच्या डोळ्यापुढे सगळी घटना धावू लागली. जयंतरावांचे तेरावे झाले आणि हॉल मध्ये बैठक बसली होती. जयंत राव म्हणजेच राजन चे बाबा, रागिणी चे सासरे. खरे तर राजन आणि रागिणी सगळ्यांत लहान. राजनला मोठे दोन भाऊ आणि एक बहीण आहे.जयंतरावांची वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी होती. ती विकून त्यांनी शहराच्या उपनगरात एक साडेतीन गुंठयाचा प्लॉट घेतला होता. त्यांनी मोठ्या मुलाला म्हणजेच ललित ला सांगितले की आता ही जागा तू बांध.ललित हो म्हंटला.

पण त्याची बायको जया जरा अती हुशार होती. ती म्हंटली लोन करायचे असेल तर जागा तुमच्या नावावर करून घ्या.त्याने बँकेत लोन साठी अर्ज करतो असे सांगीतले आणि मी त्याचे हफ्ते भरतो असे म्हंटला . जयंत रावांना विश्वास वाटला की आपले स्वाप्न लवकरच पूर्ण होणार आणि आपण सगळे एकत्र रहाणार . म्हणून त्यांनीही त्याच्या नावावर जागा करून दिली. जवळच भाड्याच्या घरात हा परिवार रहात होता. लोन मंजूर झाले आणि बांधकाम सुरु झाले. बोल बोल म्हणता ते पूर्ण ही झाले.वास्तू शांती करून परिवार बंगल्यात रहायला आला.

खरे तर सगळे आनंदात होते. राजन चा दोन नंबर चा भाऊ विवेक. त्याचेही लग्न झाले होते समीक्षाशी. ते ही दोघे नोकरी करत होते. तर राजन ची बहीण स्नेहा लग्न होऊन तिच्या संसारात रममाण झाली होती.जयंत रावांना पहिला प्यारेलीसिस चा झटका आला आणि तिथूनच त्या परिवाराला कोणाची नजर लागली. जयंतराव त्यांच्या कारखान्यात जात होते आणि त्यांच्या जोडीला विवेक जात होता . जयंतरावांनी वकिलाच्या साहाय्याने तो कारखाना विवेक च्या नावावर करून घेतला.जयंतरावांनी दोन्ही मुलांना सांगितले राजन अजून शिकतोय त्याचे शिक्षण पूर्ण झाले की त्यालाही तुमच्या दोघांबरोबर घ्या.

परंतु राजन चे शिक्षण पूर्ण होताच त्याला उत्तम नोकरी मिळाली. दोन वर्षातच त्याचे लग्न रागिणी बरोबर झाले. रागिनी तशी उच्च शिक्षित होती पण तिला संसाराची आवड होती. त्यामुळे तिने बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा घर सांभाळून पार्लर चा कोर्स केला आणि बंगल्यात आऊट हाऊस मध्ये पार्लर सुरु केले. छान बस्तान बसले आणि आता जयंतरावांना दुसरा झटका आला.मात्र या वेळेस ललित आणि विवेक यांनी त्यांची हॉस्पिटल ची जबाबदारी राजन आणि रागिणी वर टाकली.

रागिनिने राजन ला सांगितले,”तुम्ही तुमचे ऑफीस सांभाळा, मी बाबांना बघते”. काही दिवस पार्लर बंद ठेवते. असे म्हणून ती बाबांची सगळ्या प्रकारे काळजी घेत होती.स्नेहा ही अधून मधून माहेरी येत होती बाबांना बघायला. रागिणी त्यांची घेत असलेली काळजी बघुन तिला खूप बरे वाटायचे.

आणि तो दिवस उजाडला. नेहमी प्रमाणे ज्योती ताई चहा घेऊन जयंतरावांच्या रुम मध्ये आल्या आणि त्यांनी आवाज दिला त्यांना. पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे त्यांनी हात लावून पाहिले तर त्यांचे पूर्ण अंग गार पडले होते.राजन ने ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टर आले आणि त्यांनी जाहीर केले कि ते गेले आहेत म्हणुन.

हे ऐकुन एकच टाहो कानी पडत होता. स्नेहा आणि तिच्या परिवाराला कळवले. ते ही लोक आले. आता खरे तर त्या परिवाराचा एक अध्याय संपला.तेरा दिवस झाले आणि जयंत रावांच्या दोन बहिणीनंसमोर बैठक बसली. ललित ने तर घर आपल्या नावावर आहे असे सांगून बाजू भक्कम करून घेतली तर विवेक ने कारखान्याचे व्यवहार मी बघावे आणि त्याचा कारभारही मी बघावा असे बाबांनी वकिलामार्फत लिहून ठेवलेले आहे असे सांगितले.

राहिला प्रश्न राजन आणि स्नेहाचा.आता मात्र रागिणी बोलली की, “ठीक आहे घ्या तुम्ही सगळे, आम्ही बाहेर पडतो घराच्या”पण आमची एवढीच इच्छा आहे हे देवघर आणि ही माऊली आमच्या बरोबर असेल जिने इतक्या माझ्या सुंदर आणि समंजस नवऱ्याला जन्म दिला “”आई, तुमचे सगळे दागिणे स्नेहा ताईंना द्या, कारण त्यांचा हक्क आहे तो “ज्योती ताईंना भरून आले. त्यांनी दागिन्यांचा डबा स्नेहा च्या हाती दिला. स्नेहा खूप रडली ज्योती ताई आणि रागिणी च्या गळ्यात पडून.त्यांच्या बंगल्याच्या जवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला राजनने आणि त्यांचे बिऱ्हाड निघाले.

ज्योती ताईंना घेऊन निघाला खरा, पण आज बाबांच्या ऐवजी देवघर त्यांच्या बरोबर होते.ज्योती ताईंनी त्याची समजूत काढली. सगळं मार्गी लागायला तिन चार महिने गेले. आता रागिणी पार्लर मध्ये जाऊ लागली. सगळे वातावरण पुन्हा पूर्व पदावर येऊ लागले. जीजा पण रुळली. ललित आणि विवेक आईला भेटायला येत होते पण त्यात प्रेम नसायचे . पण रागिणी तिची सगळी कर्तव्य पार पाडत होती. त्यांचे आदरातिथ्य करत होती.आज राजन चा स्वतःचा फ्लॅट झाला. आणि त्या वास्तूत आज श्रावणी शुक्रवार चे हळदी कुंकू आणि सत्यनारायणाची पूजा होती.पूजा सुरु असतानाच स्नेहा आणि जावई आले.

सत्यनारायण पूजा | Satyanarayan Puja

गुरुजींनी सगळयांना आरती साठी उभे राहण्याची विनंती केली… टाळ वाजवून छान आरती झाली आणि घरातील वातावरण प्रसन्नतेने भारावून गेले.संध्याकाळी पुन्हा रागिणी छान तयार झाली. आता बरेचसे नातेवाईक आणि मित्र परिवार येणारं होता. मदतनीस मावशींच्या साहाय्याने रागिणी ने सगळी छान तयारी केली. डिश ठेवली होती. सगळयांनी त्याचा आस्वाद घेतला.

पूजेला ललित विवेक दोघांच्या बायका, मुले सगळेच आले होते. रागिणी ने दोघींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला.ज्योती ताई शांतच होत्या. पण त्यांना रागिणी चे कौतुक वाटत होते. आज खऱ्या अर्थी रागिनीच्या वास्तूत, देवांच्या साक्षीने हळदी कुंकू समारंभ पार पडला. रागिणी ने सगळयांना वाकून नमस्कार केला आणि अखंड सौभाग्यवती भव असा आशिर्वाद घेतला.

Leave a Comment