बहिणी | Sisters

बहिणी (Sisters)आज कदमांच्या घरात पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीची सुरुवात झाली होती. हो, कदमांची चार नंबरची मुलगी पुन्हा जाधवांच्या घरात सून म्हणून चालली होती.

म्हणजेच कदमांची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्या दिराशीच कदमांच्या चार नंबरच्या मुलीचे लग्न होणार होते.जिचे नाव सविता .खरेतर सख्ख्या बहिणी सख्या जावा होत असताना वेगळा आनंद असायला हवा.पण तसे मात्र होत नव्हते.

सरीताला ते आवडणारेच नव्हते, की आपली बहीण आपली जाऊ म्हणून यावी .कारण ती जाधवांच्या घरातली मोठी सून होती आणि तिला नेहमी असे वाटायचे की आपल्या धाकट्या जावे वरती आपण रुबाब गाजवला पाहिजे. कारण पहिल्यापासूनच तिचा स्वभाव थोडा हेकेखोर व हट्टी होता . हे खुद्द कदमांनाही माहिती होतं .केवळ तिचे सौंदर्य बघून जाधवांच्या प्रकाशनी तिला पसंत केली होती.

त्यामुळे तिला एक घमेंड होती की माझ्या नवऱ्याची श्रीमंती आणि माझ्या नवऱ्याने मला पसंत केले आहे या गोष्टीचा कुठेतरी तिला अभिमान होता .ती स्वतःला खूप शहाणी समजत होती, पण तिचे जे दीर होते विकास त्यांना मात्र तिची धाकटी बहीण पसंत होती.

त्यांनी आपल्या भावाला म्हणजे मोठ्या दादाला सांगितले की ,”दादा मला सविता पसंत आहे तर तू बोलून बघशील का वहिनीशी “? ही गोष्ट जेव्हा प्रकाशने आपल्या पत्नीशी म्हणजेच सरीताशी चर्चा करायला सुरुवात केली त्यावेळेस सरिताला प्रचंड असा राग आला होता आपल्या दिराचा.

बाकी मुली नाहीत का जगात माझ्या बहिणीबरोबरच काय यांना लग्न करायचे? पण प्रकाशने तिला समजावून सांगितलं की,” अगं बघता क्षणी त्याला ती आवडली, तिचा स्वभाव आवडला तर आपण का नको प्रयत्न करूयात”? खरं तर सरिताला या गोष्टी मान्य नव्हत्याच पण आपल्या नवऱ्याच्या शब्दांखातर तिने हो म्हटले .रीतसर मागणी घातली गेली सविताला आणि खरं म्हणायला गेलं तर कदमांच्या घरात विकास अतिशय आवडायचा .

एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून त्याची अशी एक वेगळीच छाप उठत होती.दोन भावांमध्ये असणारे संबंध अतिशय छान आहे .ते एकमेकांना खूप छान पद्धतीने समजावून घेतात हे कदम परिवाराला माहिती होतं. आपली मोठी मुलगी कशी आहे आणि तिला आपले जावई कशा पद्धतीने व्यवस्थित सांभाळून घेतात ,समजून घेतात हे ही ते पहात होते.त्यामुळे आपल्या धाकट्या मुलीचेही कल्याण होईल जर जाधवांच्या घरात ती लग्न होऊन गेली तर .या गोष्टी त्यांनाही आवडणाऱ्या होत्या .

शेवटी सविता त्या घरात सून म्हणून आली आणि आपलीच बहीण आपली मोठी जाऊ आहे या गोष्टीचा तिला जेवढा आनंद होता तेवढेच दुःख सरिताला होतं .कारण तिला आपली बहीण जाऊ म्हणून मान्य नव्हती. कुठेतरी तिच्या अधिकारवाणीला खंड पडला होता .त्यामुळे ती एकत्र राहत असतानाही सतत धुसफूस करत होती. सरीता माहेरी जायचं टाळायची किंवा सविता जेव्हा जाणार नाही तेव्हा सरिता नुसतीच जाऊन आई-वडिलांना भेटून येत होती .हळूहळू आई-वडिलांनाही तिचा स्वभावाचे आधी माहिती होता आणि आता तर पूर्णपणेच कळला होता.

त्यामुळे जरी ती माहेरी आली तरी तिच्या पुढे पुढे करण्यात त्यांना तसा काही इंटरेस्ट नव्हता जे की सविता दोन्ही घरं खूप समजूतीने सांभाळत होती .सविताचे जाऊ म्हणून येण्याचे सरिताच्या मनात अजिबात नव्हतेच आणि त्याचा राग सतत तिच्या चेहऱ्यावरती दिसत होता. कारण जाधव परिवार तसा अतिशय प्रतिष्ठित होता. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ही खूप सुबत्ता होती .आणि त्या संपूर्ण आर्थिक गोष्टींवरती आपला सर्वस्वी अधिकार असावा अशी सरीताची पहिल्यापासूनच इच्छा होती .पण नियतीच्या मनात काही वेगळेच असावे त्यामुळेच सविता त्या घरात धाकटी सून म्हणून लक्ष्मीच्या रूपात आली.

खरंतर विकास आणि सविता यांची जोडी अतिशय सुंदर होती. दोघही समंजस होते प्रकाशलाही या गोष्टी दिसून येत होत्या .त्याला आपल्या बायकोचा स्वभावही माहिती झाला होता .पण आपणच चूक केली आणि सौंदर्याला भूलून आपण लग्न केलं .तरी ते लग्न आपण निभवायचा आहे कारण आपले संस्कार चांगले आहेत असं म्हणून तो सरीताला वारंवार चांगल्या चार गोष्टी सांगायचा.

खरे तर प्रकाश आणि विकास यांच्या ज्या सख्ख्या बहिणी होत्या म्हणजे सरिता आणि सविताच्या नणंदा या दोघींच्या स्वभावामध्ये अतिशय गोडवा होता .दोघी बहिणी एकमेकींसाठी जीव की प्राण द्यायच्या हे बघून सविताला नेहमी असं वाटायचं की आपल्या ताईनी खूप छान वागाव, खूप छान समजून घ्यावं. आम्ही दोघी सख्ख्या बहिणी असताना ताईच्या मनात असे विचार का यावेत? पण स्वभावाला औषध नाही.

सविता मध्ये खूप समंजसपणा होता. आपल्या नात्यांमध्ये कितीही काही असलं तरी ती सासरी मात्र ताईला ताई या नावानेच बोलायची .पण सरीता कायम तिला धाकटी जाऊ या नजरेनेच बघायची .याचा सविताला खूप त्रास व्हायचा .कालांतराने जाधव परिवारातले वरिष्ठ म्हणजेच भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नी नर्मदा ताई यांनी दोघी सुनांना वेगळा संसार थाटून दिला .आता तरी दोघींमध्ये एकोपा राहील असं त्यांना वाटलं .

पण नाही, वेगळं झाल्यानंतर सरिता आपल्या मूळ पदावर परत आली आणि तिने तिला हवं तसं वागायला सुरुवात केली.एक दिवस दुचाकी वरून जातांना सरीताचा अपघात झाला. तिच्या पायाला जबर दुखापत झाली. डोक्याला ही मार लागला. अतिदक्षता विभागात तिला ठेवण्यात आले. त्या वेळी सविताने आपल्या बहिणीची खूप काळजी घेतली. त्या क्षणी ती जावेचे नाते विसरून बहिणीच्या नात्याने तिचे सगळे करत होती. सरिताच्या पायाचे ऑपरेशन झाले. आणि डोक्याला मार लागल्या मुळे तिला थोडी विस्मृती झाली होती.

पण डॉक्टरांनी सांगितलं घाबरायचे कारण नाही. तिन महिने सलग उपचार केले की त्यांना बरे वाटेल. फक्त त्यांच्या डोक्याला ताण येइल अशा गोष्टी टाळा.सविता ने सगळ्यांना आपल्या घरी रहायला नेले. आपल्या भाच्यांचे आणि मुलांचेही ती व्यवस्थित करत होती. सासू बाई तिला बाकी मदत करायच्या पण सरीताची सगळी काळजी ती घ्यायची.प्रकाश आणि विकास दोघेही भाऊ एकमेकांना आधार देत होते.

हळु हळु सरीता त्यातून सावरली आणि बरी होऊ लागली. आता तिची स्मृतीही सुधारली होती.तिला तिची चूक कळली. तिने मोठ्या मनाने आपल्या लहान बहिणीची आणि दिराची माफी मागितली.आज दोन्ही फ्लॅट विकून जाधव परिवार पुन्हा एकदा नविन बंगल्यात एकत्र नांदत आहे. तर सरीता ची मुले सविताला मावशी म्हणत आहेत. खरच काही चांगले घडण्यासाठी काही वाईट घटनांचा जन्म होत असतो.

Leave a Comment