वनी |Vani

वनी (vani)…पुण्या पासून जवळच असणारे पिरगाव. अगदी छोटे नाही आणि खूप मोठे नाही असे हे गाव. शांत जिवन, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती हे या गावचे वैशिष्ट्य. त्यामुळे गावात फार भांडण तंटा नाहीच मुळी.

अगदींच किरकोळ प्रकार चालायचे आणि ते वडीलधाऱ्या माणसांमुळे लगेच निवळायचे. अशाच या गावात एक स्त्री रहायची ती म्हणजे “वनी “.”वनी” म्हणजे तसे अवलिया व्यक्तिमत्त्व. लहानपणी पोलिओ झाला आणि त्यात एक पाय अधू झाला. चालताना त्रास होत होता तरीही ती खूप चपळ होती. शरीराचा भार एकाच पायावर देऊन चालत होती.अठरा विश्व दारिद्य्र असलेल्या परिवारात वनीचा जन्म झाला आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणून तिच्या बापाने कपाळाला हात लावला.

वनीची आई लोकांकडे घर कामाला जायची तर वडील अंडा भूर्जीची गाडी लावायचे. त्यातच वनीला एक भाऊ होता त्याचे नावं प्रदीप. पण सगळेच त्याला पद्या म्हणायचे. वनीला आजी होती. ती ही घर काम करायची पण जसे वय वाढले तसे तिने सगळी कामे आपल्या सुनेला म्हणजेच वनीच्या आईला करायला सांगितली.वनी पायाने अधू पण मनाने खूप खंबीर होती. वस्तीत सगळे तिला लंगडी वनी म्हणून चिडवायचे. पण वनी ने कधीच कोणाचे म्हणने मनावर घेतले नाही. ती हसून खेळून सगळ्यांशी बोलायची.

मग लोकांना आपोआप लाज वाटू लागली आणि लोकं तिला पूर्ण नावाने म्हणजेच वनिता म्हणू लागले.वनी खूप धडपडी होती. सगळ्या मुलांच्या बरोबर शाळेत जायची पण सातवी नंतर तिने शाळा सोडली. आई बरोबर कामाला जायची. खूप लोक तिची अवस्था बघून तिला मदत करायचे पण वनी ने फुकटची मदत कोणाची घेतली नाही. धाकट्या भावाने चांगले शिकावे असा तिचा खूप आग्रह असायचा. वेळ प्रसंगी आई वडिलांची भूमिका ती बजवायची आणि त्याला मारायची सुधा त्याने चांगले वागावे म्हणून.वनीचे लग्नाचे वय होऊन गेले. पण अपंग असल्यामूळे लग्न ठरत नव्हते. भाऊ शिकला जेमतेम पण त्याला सरकारी खात्यात शिपाई पदाची नोकरी लागली. शिपाई म्हणुन का होईना सरकारी खात्यात लागला याचा सगळयांना आनंद झाला.

वडील आता थकले. अंडा भुर्जीची गाडी लावणे त्यांनी बंद केले. आईला ही आता फारशी कामे होत नव्हती. पण वनी मदत करायची म्हणून सगळे सुरळीत चालु होते. फावल्या वेळेत वनी बचत गट चालवायची. गावातल्या असंख्य बायकांना एकत्र करून तिने त्यांना स्वावलंबी केले.वनी ने एक संकल्प केला. गावातल्या प्रत्येक घरातील एक तरी बाई कमवती असणार आणि त्यासाठी ती प्रयत्न करत होती.

वनी ने गोधडी विणण्यासाठी बायकांना प्रोत्साहित केले. त्याच प्रमाणे ज्यूट च्या कापडापासून पर्स, पिशवी अशा गोष्टी शिकवल्या. बायका ही फावल्या वेळात गप्पा मारत बसण्यापेक्षा ही कामे करु लागल्या. या मुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास वाढू लागला. घरात सगळे आनंदी रहायला लागले. पुरुष लोकं आपल्या बायकांचे कौतुक करू लागले.

गावातील दारू पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाण कमी होऊ लागले.पुणे शहरात भरणाऱ्या एका मोठ्या प्रदर्शनात वनी आणि तिच्या सख्यांनी बनवलेल्या गोधड्या, पर्सेस, पिशव्या यांचा स्टॉल लावला आणि त्याला भरघोस प्रतिसाद लाभला.त्याचं प्रदर्शनात भेट द्यायला आलेल्या मूळच्या मराठी माणसाने म्हणजेच साने यांनी यांच्या गोधड्या परदेशात विकता याव्यात या साठी प्रयत्न केले आणि त्याला यश मिळाले.अशा कर्तृत्ववान स्त्रियांची प्रगती ही गावाकडून सुरू होते आणि उंच झेप घेऊन गगन भरारी घेते.

अशा अनेक वनिता आज आपल्या अवतीभोवती आहेत. गरज आहे त्यांना एक हात द्यायची. मग जगाच्या नकाशात ही छोटी गावे कधी झळकू लागतील हे कळणार पण नाही.आज वनी मुळे खूप बायकांना स्वतःची अशी ओळख निर्माण झाली. वनी पण तिच्या आई वडिलांबरोबर सुखाने रहात आहे. प्रदीप ने उच्च शिक्षण घेऊन छान नोकरी मिळवली व तो पुण्यात स्थायिक झाला. गावाकडच्या घराची डागडुजी करुन वनी व तिचे आई वडील रहातात. कारण वनी म्हणजे गावाची शान होती.”वनिता”महिला बचत गटाचे नावं आज साता समुद्रापार झळकले होते.

Leave a Comment