Responsibility घेणे सुद्धा किती गरजेचे आहे हे मला लक्षात आले ते माझ्या एका मैत्रिणीच्या कॉल वरून. मी काहीच करू शकत नाही ही भावना मनातून निघणे खूप गरजेचे आहे.महिना दीड महिना झाला असेल माझ्या गावाकडच्या एका मैत्रिणीचा फोन आला म्हणजे सासरच्या.
हॅलो सीमाताई…. कामावर आहात का मला बोलायचं होतं तुमच्याबरोबर. मी नुकतीच जॉब वरून घरी आले होते. मी म्हटलं नाही ग, आत्ताच आले , बोल ना. “सीमाताई लै वैताग आला आहे जगायचा सगळ्या बाजूने अडकली आहे मी म्हटले “काय झाले ग उमा? काय सांगू यांना काम नाही धाम नाही. शेतीत कष्ट करतोय तर तिथं मालाला बाजार नाही. खुप responsibility आहे माझ्यावर.दोन-तीन उद्योगधंदे केले त्याच्यात यश नाही. कर्ज वाढत चाललय. पोर गावाकडच्या शाळेत जातात म्हणून तरी खर्च नाही. कधी सुधारणार आम्ही? बैल विकली , ट्रॅक्टर विकला, अजून काय काय इकायला लागणार आहे माहित नाही. असं म्हणून रडू लागली.
उमा शांत हो बर अगं परिस्थिती तुझ्यावरच आली अस नाही. सगळ्यांवर ही परिस्थिती कधी ना कधी येतेच. त्यात आपण खंबीरपणे उभे राहायचे. थोडं फार समजावून मी फोन ठेवून दिला.
उमा तशी माझ्यापेक्षा दहा एक वर्षांनी लहान असेल पण लग्न लवकर झाल्यामुळे मुले शेती यामध्ये ती अडकली. पण खरं सांगू का मैत्रिणींनो अशी परिस्थिती प्रत्येकीवर कधी ना कधी येतेच फक्त परिस्थितीचे स्वरूप वेगळे असते. अशा परिस्थितीत आपण कुजत न बसता. त्यावर उपाय कसा निघेल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. जर आपण कुजत बसलो तर संपूर्ण घराचे वातावरण नकारात्मक होऊन जाते. बरं तुम्ही कुजत बसल्याने आणि रडत बसल्याने परिस्थिती तर सुधारणार नाही मग आपली एनर्जी अशा गोष्टीत का वाया घालवायची ?
आता तुम्ही म्हणाल ताई ज्याचे जळते त्यालाच कळते. अगदी खर आहे ज्यावर जिच्यावर ती परिस्थिती येते ती कोणत्या मानसिकतेतून जाते हे तिलाच माहीत. त्या मानसिकतेतून मी सुद्धा गेलेली आहे. परिस्थिती कशीही असो आपण यातून काहीतरी मार्ग नक्की काढू ही सकारात्मक भूमिका फक्त मनात ठेवा.सतत मनाला सांगत रहा काहीतरी मार्ग सापडेल आणि मग मार्ग आपोआप सापडत जातात. त्यासाठी तुम्हाला कोणतेही पुस्तक वाचायचे किंवा व्हिडिओ बघायची गरज नाही गरज आहे तुम्ही खंबीरपणे उभे राहायचे. घरातली स्त्री जेव्हा परिस्थितीला सामोरे जाते तेव्हा घरातील सर्वजण त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार होतात.
सगळ्यात पहिल्यांदा माझे नशीबच खोटे , काय पाप केलं होतं म्हणून माझ्या नशिबात हे आलं असे म्हणणे सोडून द्या . मी खंबीर आहे, मी ह्या परिस्थितीशी चार हात करू शकते हा विचार डोक्यात आणा आणि मग बघा कसे तुमचे रक्त सळसळते आणि तुम्ही नवीन उमेदीने काहीतरी कराल. संकटात कोणी कामाला येत नाही कोणी आम्हाला पैसे देत नाही आमच्यावर ही परिस्थिती आली म्हणून कोणी आम्हाला मदत करत नाही असे रड गाणे वाजवायचे सोडून द्या.
तुमच्यावर वाईट परिस्थिती आली त्याचे दोष तुम्ही लोकांना देऊ नका. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही तुमच्या मनगटाच्या जोरावर काहीतरी करून दाखवा. खूप छोटे मोठे उद्योगधंदे आहेत. फक्त तुम्हाला ते करायची तयारी असली पाहिजे. कोणताही उद्योग धंदा तो छोटा असो किंवा मोठा असो तो करताना अजिबात लाज बाळगली नाही पाहिजे. मैत्रिणींनो आता आपण नवीन युगातील मुली आहोत. न बोलणाऱ्याचं सोनं विकत नाही आणि बोलण्याऱ्याची मातीही विकते हे लक्षात ठेवा.
काहीतरी करायची मनात जिद्द ठेवाल तेव्हा पर्याय तुमच्यासमोर आपोआप उभे राहतील. घर फक्त पुरुषाने सावरले पाहिजे असे नाही आपण सुद्धा तितक्याच सक्षम आहोत. शिक्षण असो किंवा नसो असे खूप उद्योगधंदे आहे त्याचा तिथे काही फरक पडत नाही. गरज आहे फक्त तुमच्यातील शक्ती ओळखण्याची.
आजकाल घरबसल्या सुद्धा खूप नोकऱ्या मिळत आहेत. आणि तुमच्याकडे शिक्षण नसेलच तर घरबसल्या तुम्ही काहीतरी नवीन उद्योग नक्कीच चालू करू शकता. फक्त तुम्हाला काही दिवस टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे. सुरुवात केल्यानंतर लगेचच तुम्हाला नफा यायला सुरुवात होईल ही अपेक्षा सोडून दिली तर आपण आपला व्यवसाय खूप वरपर्यंत नेऊ शकतो.
माझ्या एका मैत्रिणीने युट्युब वर पाहून पाहून मेहंदी काढायला शिकली . नंतर तिला त्यात एवढी आवड निर्माण झाली की लग्न कार्यामध्ये ती मेहंदी काढण्याच्या ऑर्डर घेऊ लागली. व नंतर तिने मेहंदी क्लासेस चालू केले. आता तिच्याकडे जवळजवळ 17 विद्यार्थिनी शिकण्यासाठी आहेत.
जेव्हा एखादा पुरुष त्याचे कर्तव्य करण्यास असमर्थ ठरतो तेव्हा बायकांनी ते कर्तव्य बजवायला काय हरकत आहे? जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे.
खरं आहे वेळ प्रत्येकावर येते… फक्त ती निभावून आपण बाहेर पडले पाहिजे… उगाच रडत बसू नये… इच्छा तिथे मार्ग असतोच… जिद्द सोडू नये… तुझं लिखाण खूप काही शिकवून जाते बघ… अशीच लिहित रहा.
खुप आभारी आहे ताई.