परदेशात मुलांना पाठवताना | Foreign Education

आजकाल भारतातली बरेच विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी ( Foreign Education ) जात आहेत. यावर्षी हजारोच्या संख्येने ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थी आले आहेत . काही विद्यार्थ्यांना मी अगदी जवळून पाहिले आहे , अनुभवले आहे. भारतातून येताना अनेक स्वप्ने उराशी बाळगून सगळे विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये येतात आणि यायलाही हवेत. भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे . कुठेतरी प्रगतीचे प्रवेशद्वार त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी उघडणार असते .

हे सगळे खरे असले तरी तुम्ही तुमच्या मुलांना परदेशात पाठवताना अगोदर कोणते ट्रेनिंग दिले पाहिजे याविषयी मला येथे लिहायला आवडेल. खरंतर हा प्रश्न मला बऱ्याच पालकांनी विचारला. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की आपल्या मुलीला किंवा मुलाला किमान त्यांना बनवून खाता येईल इतपत तरी जेवण बनवता आले पाहिजे. मी अगदी जवळून काही विद्यार्थी पाहिले आहेत. चहा ,ऑम्लेट ,सँडविच यासारख्या साध्या गोष्टी सुद्धा त्यांना जमत नाहीत. कसे तग धरणार हे विद्यार्थी ? ऑस्ट्रेलियामध्ये दोन वर्ष किंवा तीन वर्ष कशी काढणार?

परदेशात पाठवताय म्हणून मुलांना जेवण करायला शिकवा असे नाही .आजकाल भारतातल्या भारतातही वेगवेगळ्या राज्यात अनेक मुलं आणि मुली शिकायला किंवा जॉब साठी जातात. भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगळे जेवण आहे. आपल्या मुलांना किमान चपाती पोळी, डाळ भात इतका साधा स्वयंपाक तरी शिकवला गेलाच पाहिजे. आपण साधं दक्षिण भारतात गेलो तरी आपली उपासमार होते , कधी एकदाची चपाती आणि भाजी खातो असे होते.

पालकांना आणि मुलांना वाटते परदेशात जाणे म्हणजे सगळ्या सुख सोयी, हिंडणे फिरणे इतकेच,असं अजिबात नाही. भारतात असताना दररोज पोळी भाजी खाणारा माणूस जेव्हा परदेशात यायला निघतो तेव्हा विमानात बसल्यापासूनच हे सगळे बंद होते . बेचव आणि पांचट खाण्याची सुरुवात तेथूनच आपल्याला करावी लागते . काहींना तर असले जेवण अजिबात जमत नाही आणि मग त्यांच्या उपासमारीला येथूनच सुरुवात होते . परदेशात उतरल्यापासून आपण पोळी भाजीला मिस करायला सुरुवात करतो. ..जगण्यासाठी अन्न हे खावेच लागते आणि किती दिवस तुम्ही ते अन्न बाहेरून मागवून खाणार आहात. बाहेरून आणण्याचा पण प्रश्न नाही पण ऑस्ट्रेलिया मधले जेवण आणि भारतातले जेवण अतिशय वेगळे आहे. शाकाहारी असाल तर अजून पंचायत होते .आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवतो किंवा नोकरीसाठी परदेशात पाठवतो म्हणजेच आपण शिक्षण घेतो किंवा नोकरी करतो , कशासाठी तर पोटासाठी आणि ते पोट भरेल एवढे अन्न आपल्याला बनवता येत नसेल तर काय फायदा ?


सगळ्याच पालकांना अतिशय कळकळीची विनंती आहे कीआपल्या मुलांना घर स्वच्छ ठेवण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत घरातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या त्यांना दररोज करायला लावा. त्यांना स्वावलंबी बनवा आणि मगच परदेशात किंवा वेगळ्या राज्यात पाठवा. भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये आलेले बरेच विद्यार्थी अक्षरशः भुकेने कळवळलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. माझ्या डोळ्यासमोर आहेत तेवढ्यांना मी मदत करू शकते पण डोळ्याआड असणारे अनेक विद्यार्थी आहेत त्यांचे काय? भारतातून येताना आई-वडील मुलांच्या बॅगेमध्ये भरपूर फराळाचे आणि खायचे पदार्थ देतात .पण किती दिवस टिकणार आहेत ते खाण्याचे पदार्थ ? ते संपल्यानंतर त्यांना पोट भरण्यासाठी काही ना काही बनवावे तर लागणारच आहे.


मुलगा असो किंवा मुलगी असो स्वयंपाक हा त्यांना आलाच पाहिजे तो जीवनाचा अविभाज्य घटक आहे. नुसता स्वयंपाकच नाही तर त्याबरोबर किचन क्लीनिंग, टॉयलेट बाथरूम क्लीनिंग, बेडशीट बदलणे , झाडू मारणे , कपडे मशीनला लावणे ,कपडे इस्त्री करणे एकंदरीतच संपूर्ण घर कसे स्वच्छ ठेवायचे याचे पुरेपूर ट्रेनिंग दिले पाहिजे. भारतात घरातल्या कामांसाठी मदतनीस मिळतात पण इथे ते मिळत नाहीत हे लक्षात असू द्या आणि मिळालेच तरी त्यांचा पगार आपल्याला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे घरातल्या सर्व कामांची सवय आपल्या मुलांना असलीच पाहिजे.

परदेशात तुम्ही कितीही श्रीमंत असले तरी तुमची गाडी तुम्हाला चालवायला लागते. ड्रायव्हर ठेवणे ही प्रथा परदेशात कमी आहे. भांडी घासण्यासाठी डिश वॉशर, कपड्यांसाठी वॉशिंग मशीन, घर झाडण्यासाठी रोबोट किंवा व्हॅक्युम क्लिनर या गोष्टी असतातच पण परदेशात गेल्या गेल्या तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू घेणे परवडत नाही त्यामुळे काही दिवस का होईना तुमची कामे तुम्हाला स्वतः करावी लागतात.

खरंतर काम करणे या गोष्टी मुलांना शिकवायलाच लागू नये कारण लहानपणापासून आपल्या आई वडील घरात काय करतात हे आपण बारकाईने पाहतच असतो. त्यात जर आई-वडिलांनी पुढाकार घेऊन त्यांना छोटी-छोटी कामाची सवय लावली तर पुढे जाताना मुलांना त्रास होत नाही. परदेशातील मुले मात्र खूप लहानपणापासून घरातील कामे करायला शिकतात. आई वडील दोघेही जर नोकरी करत असतील तर आई वडील घरी यायच्या आत मध्ये मुले घरातील बरेच घरातली उरकून ठेवतात. काही मुलं आठवी नववी नंतर बाहेर पार्ट टाइम काम करायला सुरुवात करतात. मोठ्या सुट्ट्यांमध्ये तर बरीच मुले कामे शोधतात. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी मुलं इकडे काम करतात आणि कोणतेही काम करणे इकडे कमी समजले जात नाही. स्वतःच्या पायावर उभे राहणे ही मुलं खूप लवकर शिकतात .

भारतातून आलेले काही मुले इकडे आल्यानंतर जेव्हा किरकोळ जॉब करतात तेव्हा ते अगदी लवकर थकून जातात. कामाची सवय नसल्यामुळे त्यांना ते खूप कठीण वाटते. इकडे कामचुकारपणा चालत नाही त्यामुळे आहे तो वेळ पूर्णपणे इमानदारीत काम करावे लागते. काही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं शैक्षणिक लोन काढून परदेशात आलेले असतात खर्च भागवण्यासाठी त्यांना जॉब करणे गरजेचे असते . बऱ्याच वेळा शिक्षण बाजूला राहते आणि जगण्यासाठीच त्यांना धडपड करावी लागते, त्यामुळे जॉब न करता सुद्धा शिक्षण घेता येईल एवढी आपली तयारी हवी. जॉब करून शिक्षण घेईल या भरवशावर शक्यतो राहू नये कारण काही कारणामुळे जर जॉब करता आला नाही तर आर्थिक गणित कोलमडू शकते. यामध्ये आजारपण , त्या देशातली आर्थिक मंदी , अभ्यासाचा जास्त लोड असणे , बरेच शोधूनही जॉब न मिळणे ,अशी कारणे असू शकतात.

चांगली आर्थिक परिस्थिती असलेले काही पालक तर, तू तिकडे जाऊन नुसते शिक्षण घे महिन्याला लागणारा शिक्षणाचा खर्च आणि घर भाडे आम्ही इकडून पुरवतो असे सर्रास मुलांना सांगतात. मग काय मुलांची इकडे येऊन शिक्षण कमी आणि मज्जा मस्ती जास्त चाललेली असते. निदान घराचे भाडे आणि खाण्याचा खर्च जाईल इतके पैसे तरी मुलांना त्यांचे त्यांना कमावता आले पाहिजे. कोणतेही काम हे काम असते आणि ते करण्यामध्ये कसलाही कमीपणा नसतो हे आपण परदेशी लोकांकडून शिकतो. एकंदर परदेशातील शिक्षण हे स्वावलंबन आणि जगण्याची कला शिकवते हे मात्र तितकेच खरे आहे.

8 thoughts on “परदेशात मुलांना पाठवताना | Foreign Education”

  1. छान लिहितेस तू! वास्तव किती नेमक्या शब्दात मांडतेस. मी नेहमीच तुझी fan आहे ❤️

    Reply

Leave a Comment