Sharing is Caring

मुलांना किंवा मुलींना परदेशात पाठवताना Sharing is Caring ही संकल्पना शिकवूनच पाठवले पाहिजे.

खरं तर गावाकडे ही संकल्पना शिकवण्याची वेळच येत नाही. कारण यांच्याकडे जायचं नाही ,त्यांच्या घरातलं खायचं नाही किंवा कोणी दिलेलं खायचं नाही हे गावाकडे जास्त चालतच नाही. त्यामुळे तिथल्या मुले आणि मुली मित्राबरोबर जेवण शेअर करणे किंवा मनातल्या काही गोष्टी असतील तर ते शेअर करणे हे खूप लवकरच शिकतात.

मात्र शहराकडच्या मुलांना ह्या बाबतीत खूप बंधने येतात . शक्यतो कोणी कोणाच्या घरी जात नसल्यामुळे जेवण शेअर करणे किंवा मनातल्या काही गोष्टी शेअर करणे गोष्टी थोड्याशा कमीच होतात.

त्यांना मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर राहताना कसे राहायचे कोणत्या गोष्टी शेअर करायच्या त्यांना कसे समजून घ्यायचे हे नक्कीच शिकवले गेले पाहिजे. कधीकधी घरात एकच अपत्य असल्यामुळे त्या अपत्त्याला शेअरिंगची अजिबात सवय नसते. अशा वेळेस जेव्हा हा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी जाते किंवा परदेशात जाते त्यावेळी रूम शेअरिंग मध्ये राहायची वेळ आली तर ही मुले जास्त दिवस टिकत नाहीत. भांडणे ,रडा रडी, रुसवे फुगवे , इथपर्यंत गोष्टी जातात. काही मुले किंवा मुली अतिशय लाडावलेले असतात. बोलताना ,वागताना ,घरात वावरताना अतिशय उर्मटपणे उत्तरे दिली जातात.

जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला समजून घेतात परंतु तेच तुम्ही जेव्हा बाहेर जाता आणि कुणाबरोबर तरी शेअरिंग मध्ये राहता, तेव्हा ह्या गोष्टी खूप त्रासदायक ठरतात. गोष्टी वाटून घेणे हे अचानक शिकवण्यासारखी गोष्ट नाही. लहानपणापासून वळण लावले तर ते खूप छान लागते. आपल्या रूम पार्टनर बरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करता आली पाहिजे. काहींना घोरण्याची सवय असते , काहींना झोपेत बडबडण्याची सवय असते , काहींना हळू वाचायची सवय असते,तर काहींना मोठ्याने वाचायची सवय असते. अशा वेळेस वाद होण्याची खूप शक्यता असते. म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत आपली मुले तग धरतील इतपत तरी आपण त्यांना शिकवलेच पाहिजे.


स्वतंत्र फ्लॅट घेऊन द्यायचा म्हटलं तर त्याचे भाडे परदेशात परवडण्यासारखे नसते. त्यामुळे रूम शेअरिंग हा पर्याय येतोच. एखाद्याला जेवण चांगले बनवता येते तर एखाद्याला घराची स्वच्छता चांगली येते. अशा वेळेस ज्याला जे काम चांगले येते ते जर त्याने केले तर भांडणाचा प्रश्नच उद्भवत नाही. एखाद्या वेळेस आपल्याला जर जास्त काम पडले तर इगो थोडा बाजूला ठेवून ते करणे गरजेचे असते कारण कधीकाळी तुम्हालाही त्याचा उपयोग होऊ शकतो. समजा जर तुम्ही आजारी पडलात किंवा इतर काही कामासाठी बाहेर गेलात तर बाकीचे रूम पार्टनर तुम्हाला नक्कीच समजून घेतील , तुमची कामे ते निश्चित करतील . एवढेच नाही तर तुम्ही त्यांना अधिकाराने ते सांगू शकता पण यासाठी आपण पहिले पाऊल उचलणे गरजेचे असते.असे केल्याने एकमेकांना आपोआप समजून घेतले जाते.

.आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये चार मुली एकत्र राहत होत्या. दररोज बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर माझे थोडे बोलणे चालणे होत असे . त्यातल्या एकीला स्वयंपाक चांगला येत होता आणि बाकीच्या तिघींना स्वयंपाकाचा गंधही नव्हता. ती मुलगी दररोज सकाळ आणि संध्याकाळ स्वयंपाक करत असायची. मग बाकीच्या तिघींनी भांडी घासणे,कपडे वाळत घालणे, रूम स्वच्छ करणे ही कामे करायला हवीच होती. पण तसे होत नव्हते त्या मुली स्वयंपाकही करत नव्हत्या आणि बाकीची कामही व्यवस्थित करत नव्हत्या. अशा वेळेस जी मुलगी स्वयंपाक करत होती तिच्यावर जास्त काम पाडायचे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. पर्यायाने तिने रूम बदलली आणि वेगळीकडे राहायला गेली. आता त्या बाकीच्या तीन मुलींचे काय ? पुढे त्यानंतर त्या मुलींनीही रूम बदलली त्यानंतर काय झाले ते मला कळले नाही.

घरी एकत्र कुटुंब पद्धती असेल तर त्या घरातील मुले किंवा मुली खूप नशीबवान असतात. एकत्र राहणे ,जेवणे ,फिरायला जाणे आणि एकमेकांच्या वस्तू वापरणे हे एकत्र कुटुंब पद्धतीत चालते. प्रत्येक घरातील व्यक्तीला जेव्हा काहीतरी संकट येते किंवा काहीतरी त्यांना सांगायचे असते त्यावेळेस ते घरातल्या सगळ्यांना आपोआपच कळते. त्यामुळे होते काय लहानपणापासूनच मुलांना मोठ्या माणसांनी कसे प्रॉब्लेम हँडल केले हे पाहता येते. त्यानंतर जेव्हा त्यांच्याही बाबतीत काही प्रॉब्लेम येतात तेव्हा ते अगदीच सहजतेने हँडल करतात. घरातील प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक गोष्टी घरातल्या व्यक्तींबरोबर Share करत असतो. जेव्हा अशा घरातील मुले बाहेर जातात तेव्हा शक्यतो त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही , कारण लहानपणापासूनच ते ह्या गोष्टी शिकलेले असतात.

म्हणूनच एकमेकांना समजून घेण्याची सवय लागली पाहिजे. रूम शेअरिंग मध्ये राहताना एकमेकांचा त्रासही सहन केला पाहिजे आणि एकमेकांबरोबर आनंदही वाटला पाहिजे. आपल्याला जे काम चांगले येते ते प्रामाणिकपणे केले तर शेअरिंग मध्ये राहताना काहीच प्रॉब्लेम येत नाहीत. मग ते मुले मुले एकत्र राहत असो किंवा मुली मुली एकत्र राहत असो.
Sharing is Caring हे वाक्य किती महत्त्वाचे आहे हे परदेशात आल्यानंतर किंवा बाहेरगावी गेल्यावर कळते.
परदेशात आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना अजून कोण कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते ते पाहूया पुढील लेखात.

8 thoughts on “Sharing is Caring”

  1. अगदी खरं बोललात ताई,..लहानपणापासून च सगळ्या गोष्टींची सवय असावी मुलांना… तेव्हाच ते बाहेरच्या जगात adjust होतील… पुस्तकी ज्ञान शिकवलं जातं.. व्यवहार ज्ञान जगात फिरताना, जगताना मिळते… गुण दोष सोबत च येतात… दोष सुधारून गुण ओळखायला आले पाहिजे … मिळून मिसळून रहायला हवे…
    असेच सुंदर लेख अजून यायला हवे 😘👍

    Reply
  2. ग्रेट कित्ती सुंदर शब्दात उपयुक्त माहिती, एकत्र कुटुंबाचे फायदे, शेअरिंग चे महत्व…..

    Reply

Leave a Comment