खरंतर गोधडी (blanket) हा शब्द काळानुसार लोप पावत चाललेला आहे. अजूनही माझा जीव मात्र त्या गोधडीतच गुंतलेला आहे. दिसायला एकदम साधी तुम्ही म्हणाल त्यात जीव गुंतण्यासारखे असे काय आहे? खरं पाहिलं तर त्या गोधडीच्या धाग्यांमध्येच सगळं काही गुंतलेले असते.
आम्ही छोटे होतो तेव्हा खूप बागायती जमीन असल्यामुळे घरातल्या बायकांना दररोज शेतात काम असे एकही दिवस सुट्टी नसायची. निवांत असे घरात दिवसभर बसायला त्यांना कधीच वेळ मिळत नसे. पावसाळ्यात मात्र कधी कधी पावसाला ह्या बायकांची दया यायची.
अगदी धो धो पाऊस पडल्यानंतर गुडघ्या एवढे पाणी जेव्हा वावरात साठायचे तेव्हा मात्र घरातल्या बायकांना घरात बसायला वेळ असायचा. घरात बसल्यानंतर सुद्धा बायकांना मात्र कधी झोपूशी वाटलं नाही. लगेच सुई आणि दोऱ्याची सोय केली जायची. उजव्या हाताचे मधले बोट चिंधीने गोल गोल गुंडाळून सुई टोचू नये इतपत त्याची गादी तयार केली जायची. जुन्या कपड्यांचे गठूड माळ्यावरून काढले जायचे. त्यात जुन्या साड्या, ब्लाउज,मुलांच्या पॅन्ट शर्ट, धोतर सदरा, मुलींच्या जुन्या फ्रॉक ,झबली अंगडी टोपडी असं काही बाहि असायचं. त्यातून परत अजूनही चांगले आहे घालण्यासारखे असे म्हणून बरेच कपडे परत बाहेर काढले जायचे घालण्यासाठी. कितीही नवीन कपडे किंवा साड्या घेतल्या तरी जुने गाठोडे जेव्हा सोडले जायचे तेव्हा ते जुने कपडेही अगदी नवीन असल्यासारखे वाटायचे. मग ते जुने कपडे अंगावर घेऊन हे गोधडीत टाकू की नको असे वाटून जायचे.
मग सासू सुना मिळून अगदी व्यवस्थितरीत्या विळीने कपडे फाडायच्या… टर्रर्रर्रर्रर्र असा आवाज यायचा हो कापत नसत फाडतच असंत कारण त्यावेळी कैची मात्र कुणाकडे सहसा सापडत नसे. तरीही अगदी व्यवस्थित रित्या कपड्यांचे आकार तयार केले जायचे. मग सगळ्यात खाली साडीचा किंवा धोतराचा थर दिला जायचा.
त्यानंतर चालू व्हायची ते पुढचे थर बारीक कपड्यांचे. ते कपडे अंथरत असताना ही साडी केव्हा घेतली होती किंवा हा शर्ट मुलाला केव्हा घेतला होता ही फ्रॉक मुलीला केव्हा घेतली होती. भावाने घेतली होती आजीने घेतली होती. यावर चर्चा रंगायची. आणि मला ती चर्चा खुप आवडायची. त्यानंतर बारीक सून उठून हरभरे भाजणे चहा करणे अशी लगबगगीने कामे करायची. सासू सुना हसत खेळत चहाचा आस्वाद घ्यायच्या.
खरंच किती सुंदर दिवस होते ते. त्यावेळेस भावाकडे परिस्थिती नसतानाही भावाने घेतलेली साडी बायका अगदी जीवा पलीकडे जपत असतात. काही वर्षांनी जेव्हा ती साडी विरायची तेव्हाच ती गोधडीत घातली जायची. मग गोधडी शिवताना भावाची आठवण काढली जायची भाऊजईची आठवण काढली जायची. आईची एखादी साडी किंवा ब्लाउज आणला असेल तर आईची सुद्धा आठवण निघायची. आणि ह्या सगळ्या आठवणी काढत काढत गोधडीवर थर दिले जायचे. वरती परत मोठी साडी किंवा धोतराचा थर दिला जायचा.
त्यानंतर मग सगळ्यात कठीण काम असायचे ते गोधडीचा काठ मोडणे. काठ मोडणे हे खूप हुशार बाईचे आणि निगुतीचे काम असायचे. चारी बाजूने सर्व लेअर व्यवस्थित मुडकून सुई दोऱ्याने काठ मोडले जायचे. त्यात एखादी सासू तरबेज असे तर एखादी सून. गप्पागोष्टी करत हसत खेळत गोधडी शिवली जायची. मग कधी कपड्यांच्या साह्याने गोधडीवर कापण्या काढल्या जायच्या तर कधी नावे लिहिली जायची, कधी चंद्र काढला जायचा तर कधी चांदण्या.
गप्पा मारत गोधडी चा कार्यक्रम चालत असे. किती छान दिवस होते ते.
गोधडी च्या दोऱ्याच्या प्रत्येक टाच्या बरोबर बाईचे मन आणि आठवणीही त्यात शिवल्या जायच्या. त्या गोधडीतल्या प्रत्येक कपड्याबरोबर त्या बाईचे मनही जोडले जायचे. आणि त्याच गोधडीतल्या चंद्र चांदण्या अंगावर घेऊन रात्री सुखाने झोपुन जायचो.
आत्ता आलेल्या मऊ मऊ रजया गोधडी पुढे अजूनही फिक्क्याच पडतात. आहेत मऊ मऊ पन त्यात मायेचा ओलावा कुठेही नाही.
मला आठवते हिवाळ्यात खूपच थंडी असायची. आणि प्रत्येकीला एक एक सेपरेट गोधडी दिली जायची. कधीकधी थंडी इतकी वाढत असे की अगदी काकडून जायचो. मग आम्ही बहिणी गोधड्या एकत्र एकावर एक टाकून जुळवून घेऊन मग झोपायचो. मग झोपताना एक वेगळाच हशा पिकायचा ती गोष्ट तर वेगळीच. शाळेतील काही विनोद आठवून आठवून आम्ही खूप हसायचो. मग आजी ओरडली की गोधडीच्या आत डोके घालून फिदी फिदी हसत असू.
खाली सारवलेली जमीन त्यावर मायेची उब असणारी अशी गोधडी… कधीच पाठनीला जमीन टोचली नाही. तर अशी हि गोधडी. आम्ही मज्जेने म्हणायचं गोधडी चे स्पेलिंग सांग. मग पुढचा म्हणणार Go…..धडी (जि ओ धडी ) ही इंग्लिश ची टेस्ट तर सगळ्यांनीच घेतलीच असेल. खरंतर गोधडी आहे खूप छोटी पण त्यातल्या आठवणी मात्र खूप मोठ्या आहेत.
गावाकडच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. गोधडीच्या निमित्ताने आजी,आत्या, काकी, मैत्रिणी सगळ्यांचीच आठवण -भेट झाली.
❤️❤️❤️
Thank you.
आमच्या इथं म्हणजे गावात आम्ही अजूनही गोधळ्या शिवतो 😊
गोधडी ची सर कुठल्याच महागड्या ब्लँकेट la येणार नाही…. खूप सुंदर आठवणी, सीमा ताई… प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करणे,.. टाकावू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे,.. हि शिकवण होती… गोधडी पांघरली की,.. आई माय चा हात अंगावर असल्यासारखे वाटते… खूप सुंदर
Khup Chan Seema tai.mastch likhan ast g tuz.tuza gav te Australia ha pravas dekhil mi vachla ahe Mi.